महाराष्ट्र

शिर्डीत पराभव झाला नसता तर आजही शरद पवारांसोबत असतो; रामदास आठवले यांची खंत

पवारांसोबत राहिलो असतो तर नुकसान झाले असते; खडसेंच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात जुन्या राजकीय आठवणींना उजाळा

मुक्ताईनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे राजकीय मार्ग सध्या वेगळे असले, तरी दोघांमधील व्यक्तिगत संबंध आजही कायम आहेत. मात्र, शिर्डी लोकसभा मतदारसंघातील पराभवामुळे आपली राजकीय दिशा बदलली आणि शरद पवारांची साथ सुटली, अशी खंत आठवले यांनी व्यक्त केली.

कोथळी (ता. मुक्ताईनगर) येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात रविवारी रामदास आठवले उपस्थित होते. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक वर्षांनंतर शरद पवार, एकनाथ खडसे आणि रामदास आठवले एकाच व्यासपीठावर आले. यावेळी आठवले यांनी आपल्या भाषणातून जुन्या राजकीय आठवणींना उजाळा दिला.

पवारांसोबतचे संबंध आजही कायम

“शरद पवार यांच्यासोबत आपण अनेक वर्षे काम केले आहे. राजकारणात मतभेद असले तरी व्यक्तिगत संबंध तोडण्याची गरज नाही,” असे आठवले म्हणाले. राजकारणात कोणतेही वैर कायम ठेवू नये. लोकशाहीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक मिळून देश चालवतात, असेही त्यांनी नमूद केले.

सध्या आपण नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारमध्ये मंत्री असल्याने पुन्हा शरद पवारांसोबत जाणे शक्य नसल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले. एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, तर आपण वेगळ्या राजकीय आघाडीत असल्याचे त्यांनी सांगितले.

“ज्यांच्या बाजूला जातो, त्यांना सत्ता मिळते”

आपल्या राजकीय प्रवासावर भाष्य करताना आठवले यांनी नेहमीच्या मिश्किल शैलीत, “आपण ज्यांच्या बाजूला जातो, त्यांना नंतर सत्ता मिळते आणि आपल्यालाही मंत्रीपद मिळते,” अशी टिप्पणी केली. मात्र, केवळ मंत्रीपदासाठी आपण कोणत्याही पक्षासोबत जात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आठवले यांच्या या वक्तव्यामुळे कार्यक्रमस्थळी हास्याची लकेर उमटली. शरद पवार यांनीही त्यांच्या भाषणाला हसत दाद दिली.

पँथरच्या चळवळीनंतर पवारांनी दिली मंत्रीपदाची संधी

राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातील आठवणी सांगताना आठवले म्हणाले की, सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये शिक्षण घेत असताना पँथरच्या चळवळीनंतर शरद पवार यांनी आपल्याला पहिल्यांदा मंत्रीपदाची संधी दिली. त्यावेळी समाजकल्याणासह विविध खात्यांची जबाबदारी आपल्याकडे होती, अशी आठवण त्यांनी सांगितली.

शिर्डीचा पराभव ठरला टर्निंग पॉइंट

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील पराभव हा आपल्या राजकीय प्रवासातील महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरल्याचे आठवले यांनी सांगितले. “शिर्डीत पराभव झाला नसता तर कदाचित आजही शरद पवारांसोबत राहिलो असतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.

मात्र, पवारांसोबत राहिलो असतो तर आपले नुकसान झाले असते, अशी मिश्किल पुस्तीही त्यांनी जोडली. कारण त्यानंतर आपल्याला तब्बल १३ वर्षे मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली, असे आठवले म्हणाले.

राज्यसभेची संधीही नाकारली

शरद पवार यांनी आपल्याला राज्यसभेवर पाठविण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, आपण ती संधी स्वीकारण्यास नकार दिला, असेही आठवले यांनी सांगितले.

राजकीय भूमिका वेगळ्या झाल्या असल्या तरी शरद पवार आणि आपले संबंध आजही चांगले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खडसेंच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात आठवले यांनी शेरोशायरीही सादर केली. त्यांच्या मिश्किल वक्तव्यांमुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीसीसी निवडणुकीत भाजपची ताकद वाढणार? सुभाष देशमुखांचा ठराव; शहाजी पवारही मैदानात

सोलापूर: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसी) आगामी संचालक मंडळाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून…

2 तास ago

भावाची प्रकृती पाहण्यासाठी गेले; भेट ठरली अखेरची! एकाच दिवशी सख्ख्या भावांचा मृत्यू

निलंगा : भावाची प्रकृती खालावल्याचे समजताच त्याची विचारपूस करण्यासाठी गेलेल्या धाकट्या भावाची ती भेटच दोघांची…

2 तास ago

पुण्यात मुलाकडून आईची निर्घृण हत्या; घरातच दार बंद करून चाकूने हल्ला, विश्रांतवाडीत खळबळ

पुणे : जन्म देऊन आयुष्यभर सांभाळ करणाऱ्या आईचीच मुलाने हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील विश्रांतवाडी…

2 तास ago

गांधी नकोत, पण गांधींचा चष्मा हवा!

परदेशात ‘ब्रँड इंडिया’, देशात गांधीविरोध; हा राजकारणाचा दुटप्पीपणा की सोयीचा इतिहास? मुंबई: महात्मा गांधींचे नाव…

5 तास ago

गोकुळच्या निवडणुकीआधी महायुतीत धुसफूस; मुश्रीफ-महाडिक गटाचा संघर्ष टोकाला

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसा महायुतीतील अंतर्गत संघर्ष अधिक…

1 दिवस ago

गडचिरोलीच्या विकासाच्या नावाखाली नैसर्गिक संपत्ती लुटण्याचा डाव; वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात

गडचिरोली: उद्योगांच्या माध्यमातून गडचिरोलीचा कायापालट करण्याच्या घोषणा सत्ताधाऱ्यांकडून केल्या जात असल्या, तरी जिल्ह्यातील आरोग्य, शिक्षण, रस्ते,…

2 दिवस ago