पुणे: पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील अतिदक्षता विभाग (आयसीयू) खासगी संस्थेमार्फत चालवण्यात येत असून, या संस्थेसोबत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सामंजस्य करार करण्यात येणार आहे. या करारानुसार रुग्णालयातील एकूण १७ आयसीयू खाटांपैकी ७ खाटा थेट महानगरपालिकेच्या ताब्यात येणार असून, या खाटांवर दाखल होणाऱ्या रुग्णांना मोफत अतिदक्षता उपचार सेवा दिली जाणार आहे. ही सुविधा फेब्रुवारीअखेर रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहे.
कमला नेहरू रुग्णालय हे राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना (एमजेपीजेएवाय) अंतर्गत संलग्न असल्याने, बहुतांश शस्त्रक्रिया व उपचार मोफत केले जातात. मात्र, आयसीयू सेवा सध्या शुल्क आकारून दिली जात असल्याने अनेक गंभीर व गुंतागुंतीचे रुग्ण ससून रुग्णालयात पाठवावे लागत होते.
सध्या या आयसीयू विभागातील उपचार शुल्क केंद्रीय आरोग्य योजनेच्या दरानुसार आकारले जाते. रुग्णालयातील अंतर्गत रुग्णांना प्रथम प्राधान्य दिले जाते, तसेच परवडणाऱ्या दरात आयसीयू खाटांची गरज असलेल्या इतर रुग्णालयांतील रुग्णांनाही येथे उपचाराची सुविधा उपलब्ध आहे.
महानगरपालिकेच्या ताब्यात ७ आयसीयू खाटा आल्यामुळे संबंधित रुग्णांना मोफत आयसीयू सेवा, आवश्यक साहित्य व उपचार सुविधा मिळणार आहेत. त्यामुळे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया देखील कमला नेहरू रुग्णालयातच करता येणार असल्याची माहिती उप आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत यांनी दिली. रुग्णालयातील अद्ययावत शस्त्रक्रियागृहाचे काम अंतिम टप्प्यात असून, फेब्रुवारीअखेर तेही रुग्णांसाठी खुले होणार आहे.
याच वर्षाअखेरीस महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील पहिली एमबीबीएस विद्यार्थ्यांची तुकडी प्रशिक्षणासाठी रुग्णालयात रुजू होणार असून, त्यामुळे रुग्णालयाची उपचार क्षमता लक्षणीयरीत्या वाढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, आरोग्य विभागप्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी सांगितले की, ७ आयसीयू खाटा महापालिकेच्या नियंत्रणाखाली आल्याने रुग्णांना अधिक दर्जेदार आणि सुलभ सेवा देणे शक्य होणार आहे. अलीकडेच रुग्णालयात १७ तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली असून, संपूर्ण रुग्णालयाच्या अद्ययावतीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे भविष्यात उपचार सेवा अधिक सक्षम होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…