प्रवीण तरडे यांचा ‘चित्रपताका’तील परिसंवादात विश्वास; मराठी चित्रपटांच्या मार्केटिंग, निर्मिती आणि प्रेक्षकांशी तुटलेल्या नात्यावर मंथन
मुंबई: मराठी चित्रपट आज हाऊसफुल होत असले, तरी मराठी सिनेमाची खरी बाजारपेठ केवळ पुणे आणि मुंबईपुरती मर्यादित नाही. ग्रामीण आणि निमशहरी महाराष्ट्रातही मोठा प्रेक्षकवर्ग असून, त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचण्याची गरज आहे. योग्य नियोजन, आक्रमक मार्केटिंग आणि प्रेक्षकांशी थेट संवाद साधल्यास मराठी चित्रपटसृष्टी ५०० कोटी रुपयांचा व्यवसाय करू शकते, असा ठाम विश्वास दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीने आयोजित ‘चित्रपताका’ मराठी चित्रपट महोत्सवात ‘आजचा मराठी सिनेमा’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलात हा चार दिवसीय महोत्सव सुरू आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिसंवादात सिनेकर्मी अमृता राव, दिग्दर्शक आदित्य सरपोतदार, सुहृद गोडबोले आणि प्रवीण तरडे सहभागी झाले होते. सिनेपत्रकार सौमित्र पोटे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. मराठी चित्रपटांचा आशय, निर्मितीचा दर्जा, बदलती प्रेक्षकांची मानसिकता, मार्केटिंगची आव्हाने, बंद पडलेली चित्रपटगृहे आणि मराठी सिनेमाची ग्रामीण भागातील बाजारपेठ अशा विविध मुद्द्यांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली.
गावोगावी पोहोचल्याशिवाय मराठी सिनेमाची बाजारपेठ वाढणार नाही!
चित्रपटांच्या प्रमोशनसाठी मोठ्या जाहिरात माध्यमांवर किंवा वाहिन्यांवर अवलंबून न राहता गावोगावी जाऊन प्रचार करण्याचा अनुभव सांगताना प्रवीण तरडे यांनी ग्रामीण आणि निमशहरी भागाचे महत्त्व अधोरेखित केले. मराठी चित्रपटांची बाजारपेठ विस्तारायची असेल, तर पुणे-मुंबईच्या पलीकडे असलेल्या प्रेक्षकांचा विचार करून मार्केटिंगचे नियोजन करावे लागेल. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मराठी चित्रपट पोहोचविण्याची क्षमता निर्माण झाली, तर ५०० कोटींच्या व्यवसायाचे उद्दिष्ट अशक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
बदलत्या प्रेक्षकांच्या अपेक्षा ओळखणे गरजेचे!
आजचा मराठी सिनेमा आशय आणि निर्मितीच्या बाबतीत उत्कृष्ट असला, तरी प्रेक्षकांच्या आवडीनिवडी आणि अपेक्षा सातत्याने बदलत आहेत. त्यामुळे चित्रपट निर्मिती करताना या बदलांचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक असल्याचे मत अमृता राव यांनी मांडले. हिंदी चित्रपटसृष्टीचे वाढते वर्चस्व मराठी चित्रपटांसाठी अडचणीचे ठरत असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदवले.
प्रत्येक चित्रपट प्रत्येक प्रेक्षकाला आवडेलच असे नाही!
दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी चित्रपटांच्या मार्केटिंगमध्ये प्रेक्षकांच्या आवडीनिवडी समजून घेण्यावर भर दिला. प्रत्येक चित्रपट सर्वच भागांत आणि प्रत्येक प्रेक्षकवर्गात यशस्वी होईल, अशी अपेक्षा ठेवणे योग्य नाही. वेगवेगळ्या भागांतील प्रेक्षकांची आवड, चित्रपट पाहण्याची पद्धत आणि अपेक्षा लक्षात घेऊन चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याची स्वतंत्र रणनीती आखली पाहिजे, असे ते म्हणाले.
प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहांकडे वळविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. नव्या पिढीतील दिग्दर्शकांच्या प्रयोगशीलतेतून मराठी सिनेमाला नवी दिशा मिळत असून, ही सकारात्मक बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.
चांगले चित्रपट सातत्याने आले तरच प्रेक्षकांचा विश्वास वाढेल!
मराठी चित्रपट बनविण्यापेक्षा त्याचे योग्य मार्केटिंग करणे अधिक आव्हानात्मक असल्याचे मत सुहृद गोडबोले यांनी व्यक्त केले. मराठी चित्रपटसृष्टीची सामान्य प्रेक्षकांशी तुटलेली नाळ पुन्हा जोडण्याची गरज आहे. चित्रपटांच्या व्यावसायिक बाजूवर चर्चा करणे चुकीचे नसून, निर्मिती आणि व्यवसाय यांचा परस्पर संबंध समजून घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
मराठी चित्रपटसृष्टीत दर्जेदार चित्रपटांच्या निर्मितीमध्ये सातत्याचा अभाव असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. वर्षातून एखादा चांगला चित्रपट प्रदर्शित होऊन चालणार नाही, तर दर महिन्याला दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांसमोर आले पाहिजेत. सातत्याने चांगले चित्रपट प्रदर्शित झाले, तर प्रेक्षकांचा मराठी चित्रपटसृष्टीवरील विश्वास वाढेल आणि चित्रपटगृहांशी त्यांचे नाते अधिक घट्ट होईल, असे गोडबोले यांनी सांगितले.
एकूणच, मराठी चित्रपटसृष्टीसमोर केवळ उत्तम चित्रपट निर्माण करण्याचेच नव्हे, तर त्यांची व्यापक बाजारपेठ निर्माण करण्याचे आव्हान आहे. दर्जेदार निर्मिती, प्रभावी मार्केटिंग, ग्रामीण महाराष्ट्रापर्यंत पोहोच आणि सातत्यपूर्ण चित्रपट प्रदर्शन या चार बाबींवर मराठी सिनेमाचे भवितव्य अवलंबून असल्याचा सूर या परिसंवादातून उमटला.
आपले मन आणि शरीर निरोगी असणं फार गरजेचे आहे. शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्य जपायला हवे.…
पाणी हे संपूर्ण आहारातील अतिशय महत्त्वाचा घटक असतो. शरीराचा ७० टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला…
अमित शाह यांच्यावरील टीकेला शिंदेंचे प्रत्युत्तर; शेतकरी प्रश्नांवरूनही विरोधकांना सुनावले मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह…
‘क्वीन ऑफ द कॉमेडी... गप्पा शुभा खोटेंशी!’ या विशेष मुलाखतीत उलगडला हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णकाळ; मेहमूद,…
मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे पशुधनासाठी निर्माण होणारी चारा टंचाई दूर करण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.…
राहुल गांधींच्या आंदोलनाचा परिणाम; आशिष शेलारांनी आधी माहिती घ्यावी, ॲड. संदेश कोंडविलकरांचा पलटवार मुंबई: लोकसभेतील…