प्री-कास्ट रस्ते, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर करण्याचे एकनाथ शिंदेंचे निर्देश; १४ विभागांचा कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना
मुंबई: चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात. पावसाळ्यातही रस्ते दुरुस्तीची कामे वेगाने करता यावीत यासाठी प्री-कास्ट रस्ते आणि जिओ पॉलिमर टेक्नो पॅच यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या विविध अडचणी जाणून घेण्यासाठी आयोजित बैठकीत शिंदे यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार डॉ. अमोल कोल्हे, विधान परिषद सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार बाबाजी काळे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि उद्योजक उपस्थित होते.
१४ विभागांचा समन्वय; जिल्हाधिकारी नोडल अधिकारी
चाकण-तळेगाव परिसरातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या समन्वयाने १४ विभागांनी एकत्रितपणे काम करावे. जिल्हाधिकाऱ्यांनी दर शुक्रवारी संबंधित विभागांची बैठक घेऊन कामांना गती द्यावी, असे निर्देश शिंदे यांनी दिले.
चाकण औद्योगिक क्षेत्रात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांचा आढावा घेऊन ती कामे तातडीने पूर्ण करावीत. कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अंतर्गत रस्ते, पर्यायी मार्ग आणि उड्डाणपुलांचे नियोजन
चाकण शहरातील रस्त्यांच्या कडेला पडलेले खड्डे बुजविण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या. गरजेनुसार नवीन अंतर्गत रस्ते, पर्यायी मार्ग तसेच उड्डाणपुलांचे नियोजन करण्याचे निर्देशही देण्यात आले.
मलनिस्सारण, घनकचरा व्यवस्थापन, पाणी, रस्ते आणि वीज या परस्परांशी संबंधित सुविधांचा सर्वसमावेशक आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही शिंदे यांनी सांगितले.
चाकणचा विकास आराखडा तातडीने मंजूर करणार
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला चाकण शहराचा विकास आराखडा तातडीने मंजूर करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, पोलीस ठाणे, अग्निशमन केंद्र, रुग्णालये आणि नवीन विद्युत उपकेंद्रासाठी एमआयडीसीकडून आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
वीजपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी महापारेषणकडून ३१ ऑगस्टपर्यंत नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नवीन उपकेंद्रासाठी एमआयडीसी जागा उपलब्ध करून देणार आहे.
डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमुळे उद्योगांना चालना
छत्रपती संभाजीनगर, रांजणगाव आणि चाकण एमआयडीसीला जोडणारा डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर, तसेच उरण-कर्जत-राजगुरुनगर-शिरूर-पुणे या नवीन महामार्गामुळे चाकण परिसरातील औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळेल. यामुळे भविष्यातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
“महाराष्ट्र हे देशाचे औद्योगिक इंजिन आहे आणि या इंजिनाची खरी ताकद चाकण-तळेगावसारख्या औद्योगिक पट्ट्यांमध्ये आहे. त्यामुळे उद्योगांना दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि उद्योजक तसेच स्थानिक नागरिकांना वाहतूक कोंडी व खड्ड्यांच्या समस्येतून दिलासा देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे,” असे शिंदे यांनी सांगितले.
पुणे : पुण्यातील पुनावळे परिसरात वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. कोणतीही…
मुंबई : महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा प्रश्न हा केवळ राजकीय आरक्षणाचा विषय राहिलेला नसून सामाजिक न्याय,…
पुणे: "दादांनी तुम्हाला आणि मला दिलेला विकासाचा वारसा अर्ध्यावर सोडणे त्यांच्या शिकवणीत बसत नाही. दादांनी…
पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत राजकीय…
शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): स्वप्नांना वयाचे बंधन नसते, हे दाखवून देणारा भावनिक आणि प्रेरणादायी प्रसंग शिरूर…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीचा थेट फटका रांजणगाव…