पिंपरी-चिंचवड : वाढत्या पिंपरी-चिंचवड शहराच्या सुरक्षिततेचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला राज्य सरकारने गती दिली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, सक्षम यंत्रणा आणि पोलिसांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या विविध विकास उपक्रमांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा पार पडला.
या कार्यक्रमात ताथवडे येथील पोलीस मुख्यालयाच्या जागेचे हस्तांतरण आणि नवीन पोलीस संकुलाचे भूमिपूजन करण्यात आले. गुन्हे नियंत्रण आणि वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी AI आधारित CCTV नेटवर्क व इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम सुरू करण्यात आली. याशिवाय पोलिसांना ३५० बॉडी-वॉर्न कॅमेरे, चार ड्रोन आणि ६५ नवीन पोलीस वाहने उपलब्ध करून देण्यात आली. पोलिसांसाठी २०० निवासस्थानांच्या कामाचेही भूमिपूजन करण्यात आले.
पोलिसांच्या निवासाचा प्रश्न सोडविण्यासाठी म्हाडा, सिडको, एमएमआरडीए आणि नगरविकास विभागाच्या माध्यमातून कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री या कामांचा सातत्याने आढावा घेत असून, पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांना प्राधान्य दिले जात असल्याचे सांगण्यात आले.
हेल्पलाइनचा प्रतिसाद नऊ मिनिटांवरून तीन मिनिटांवर
पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांच्या हेल्पलाइनचा प्रतिसाद देण्याचा कालावधी पूर्वी नऊ मिनिटे होता. आधुनिक यंत्रणेमुळे तो आता अवघ्या तीन मिनिटांवर आणण्यात आला आहे. AI तंत्रज्ञान आणि आधुनिक उपकरणांमुळे गुन्हे उघडकीस आणणे, तपासात पारदर्शकता राखणे आणि दोषसिद्धीचे प्रमाण वाढविणे अधिक सुलभ होणार आहे.
पोलीस ठाणे हे सामान्य नागरिकांसाठी भीतीचे नव्हे, तर मदतीचे ठिकाण बनले पाहिजे. त्यासाठी पोलीस आणि नागरिकांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण करण्यावर शासनाचा भर असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
‘ड्रग फ्री महाराष्ट्र’ अभियानाला बळ
अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याविरोधात ‘ड्रग फ्री महाराष्ट्र’ आणि ‘ड्रग फ्री पिंपरी-चिंचवड’ अभियान राबविण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या ‘ड्रग फ्री इंडिया’ संकल्पनेच्या दिशेने महाराष्ट्र पोलीस काम करत आहेत. या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांशी व्हर्च्युअल संवादही साधण्यात आला.
दुष्काळग्रस्तांसाठी पोलिसांची एक कोटींची मदत
कर्तव्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी एका दिवसाचा पगार देत तब्बल एक कोटी रुपयांची मदत केली. पोलिसांच्या या संवेदनशीलतेचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले. नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचे निवास, आरोग्य आणि भविष्य सुरक्षित ठेवणे ही शासनाची जबाबदारी असून, सरकार पोलिसांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही देण्यात आली.
या कार्यक्रमाला सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, गृहराज्यमंत्री योगेश कदम, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवींद्र लांडगे, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, आमदार चेतन तुपे, शंकर जगताप, विक्रम काकडे, शरद सोनवणे, उमा खापरे, सुनील कांबळे, भीमराव तापकीर, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्यासह लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…
१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…
लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…
नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…
चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…
राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवनात पक्षप्रवेश सोहळा…