नवी मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागांतर्गत अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयामार्फत राज्यात प्रथमच राबविण्यात येणाऱ्या नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (PLFS) आणि असंघटित क्षेत्रातील उद्यमांचे वार्षिक सर्वेक्षण (ASUSE) या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था (NIPHT) येथे आयोजित विभागीय प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच यशस्वीरीत्या पार पडली.
कोकण व पुणे विभागातील क्षेत्रीय कामासाठी नियुक्त अन्वेषक आणि पर्यवेक्षकांसाठी ५ ते १० जून २०२६ या कालावधीत पाच दिवसीय निवासी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयाच्या आयुक्त डॉ. ज्योत्स्ना पडियार (भा.प्र.से.) यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले.
एप्रिल २०२६ ते मार्च २०२७ या कालावधीत राज्यभर एकूण ६ हजार ८२८ नमुना घटकांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्यासाठी २७६ अन्वेषक व निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोकण आणि पुणे विभागात शहरी व ग्रामीण भाग मिळून २ हजार ९५६ नमुना घटकांचे सर्वेक्षण केले जाणार असून, हे काम ७५ अन्वेषक आणि २८ पर्यवेक्षकांमार्फत पूर्ण केले जाणार आहे.
उद्घाटन प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील यांनी ऑनलाइन मार्गदर्शन करताना सांगितले की, या सर्वेक्षणातून मिळणारी आकडेवारी ग्राम, जिल्हा आणि विभागस्तरावरील विकास व कल्याणकारी योजनांच्या नियोजनासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्वेक्षण पथकांना अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO-FOD), पुणे येथील सहसंचालक डॉ. रुही कुलकर्णी यांनी ‘विकसित भारत @ २०४७’च्या उद्दिष्टपूर्तीसाठी पुराव्यांवर आधारित माहिती संकलनाचे महत्त्व अधोरेखित केले. तर सेवानिवृत्त अतिरिक्त महासंचालक अशोक टोपराणी यांनी देशाच्या आर्थिक प्रगतीचे मोजमाप करण्यासाठी या सर्वेक्षणांचे महत्त्व स्पष्ट केले.
आयुक्त डॉ. ज्योत्स्ना पडियार यांनी सांगितले की, जिल्हास्तरावरील रोजगार-बेरोजगारी, असंघटित क्षेत्रातील उद्योगांची संख्या आणि रोजगारनिर्मिती यांसारखी महत्त्वाची सांख्यिकीय माहिती या सर्वेक्षणातून उपलब्ध होणार आहे. यामुळे जिल्हा व राज्याच्या उत्पन्नाचा अंदाज बांधणे तसेच विकासाभिमुख धोरणे आखणे अधिक सुलभ होईल.
प्रशिक्षणादरम्यान Ipsos Research Pvt. Ltd., Mumbai या संस्थेमार्फत नियुक्त प्रगणक आणि पर्यवेक्षकांना रोजगार, कामगार सहभाग दर, असंघटित उद्योगांची रचना, आर्थिक स्थिती, उत्पन्न-खर्च आदी विषयांचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले. तसेच CAPI तंत्रज्ञानाद्वारे टॅबलेटवर माहिती नोंदणीचे प्रात्यक्षिक प्रशिक्षणही देण्यात आले.
कार्यक्रमाला सहआयुक्त भीष्म बिरादार, सहआयुक्त (नियोजन) संजय मरकळे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, उपआयुक्त प्रियांका बोकील, तसेच इप्सॉसच्या संचालक तृप्ती शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहआयुक्त जयसिंग मेहेत्रे यांनी केले, तर आभार प्रदर्शन वृषाली माकर यांनी केले.
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…