महाराष्ट्र

आरोग्यसेवा हीच ईश्वरसेवा; महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार उपचार पोहोचवणार; एकनाथ शिंदे

मुंबई: “हे सरकार केवळ आदेश देणारे नाही, तर जनतेच्या दारात जाऊन प्रश्न सोडवणारे सरकार आहे. आरोग्य हीच खरी संपत्ती आणि आरोग्यसेवा हीच ईश्वरसेवा मानून महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार उपचार पोहोचवत आहोत,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आरोग्य विभागाच्या वतीने राज्यभरातील १२४ नवीन आरोग्य संस्था, रुग्णालये आणि उन्नतीकरण झालेल्या आरोग्य सुविधांचे ऑनलाईन लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी राज्य सरकारकडून सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना शिंदे म्हणाले की, मंत्री आणि अधिकारी केवळ कार्यालयात बसून काम न करता मेळघाट, गडचिरोली यांसारख्या दुर्गम भागात प्रत्यक्ष जाऊन रुग्णालयांची पाहणी करत आहेत. प्रत्यक्ष क्षेत्रावर गेल्यानंतरच आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी लक्षात येतात. छोटे प्रश्न तातडीने, तर मध्यम आणि दीर्घकालीन प्रश्न नियोजनबद्ध पद्धतीने सोडवता येतात, असे त्यांनी नमूद केले.

महिलांच्या आरोग्य तपासणीवर भर

आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात अडीच ते तीन कोटी महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. लवकर कर्करोग निदानामुळे हजारो महिलांवर वेळेत उपचार करणे शक्य झाले. आपल्या वाढदिवसानिमित्त आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या मॅमोग्राफी व्हॅनच्या माध्यमातून स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान राज्यभर अधिक व्यापक केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

५०० मुलांच्या कॉक्लिअर इम्प्लांटला मदत

नुकत्याच झालेल्या ५०० मुलांच्या कॉक्लिअर इम्प्लांट कार्यक्रमाचा उल्लेख करताना शिंदे यांनी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अशा मुलांना आर्थिक मदत सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले. भविष्यात जनुकीय निदानाच्या माध्यमातून पुढील पिढी सुरक्षित करण्यासाठी शासन विशेष सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठाण्यात ९०० खाटांचे सिव्हिल रुग्णालय

ठाण्यातील ९०० खाटांचे अत्याधुनिक सिव्हिल रुग्णालय वर्षाअखेरीस सुरू होईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. या प्रकल्पात २०० खाटांचे महिला-बाल रुग्णालय, २०० खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि एअर ॲम्बुलन्ससाठी हेलिपॅडची सुविधाही उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना दिलासा

कोरोना काळात उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर शासनाने निर्णय घेतला आहे. अधिसंख्य पदनिर्मिती करून या कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

विविध आरोग्य अभियानांना गती

सिकल सेलमुक्त महाराष्ट्र, क्षयरोग निर्मूलन, ‘स्वस्थ नारी–सशक्त परिवार’, अरुणोदय मोहीम, मातृ-शिशु आरोग्य तसेच ग्रामीण आरोग्य बळकटीकरणाच्या माध्यमातून राज्याची आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

समारोपात शिंदे म्हणाले, “रुग्णालये ही समाजाची पवित्र मंदिरे आहेत. डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचारी हे देवदूत आहेत. आपण उत्तम सुविधा उभ्या करतो; मात्र त्या वापरण्याची वेळ कुणावरही येऊ नये. प्रत्येक नागरिक ठणठणीत आणि निरोगी राहावा, हीच स्वातंत्र्यदिनानिमित्त माझी सदिच्छा आहे.”

या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार किसन कथोरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार दौलत दरोडा, आमदार हरिश्चंद्र भोईर, आमदार शरद सोनवणे, आमदार प्रकाश सोळंके, नगराध्यक्ष अमोल पाटील, प्रधान सचिव निपुण विनायक, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच राज्यभरातील लोकप्रतिनिधी, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अल्पवयीन मुलांना ऑनलाइन जाळ्यात ओढून ब्लॅकमेलिंग; नीलम गोऱ्हेंचे राज्यपालांना निवेदन

मुंबई: राज्यातील अल्पवयीन मुला-मुलींना ऑनलाईन गेमिंग, सोशल मीडिया आणि चॅटिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जाळ्यात ओढून ब्लॅकमेलिंग, लैंगिक…

6 मिनिटे ago

वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल; जातनिहाय जनगणना, ओबीसी आरक्षण आणि कुंभमेळ्याच्या खर्चावरून निशाणा

मुंबई: काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जातनिहाय जनगणना, ओबीसी आरक्षण, मनोहर भिडे यांच्या वक्तव्यांसह…

10 मिनिटे ago

शिंदेसेनेला भाजपाची धास्ती? राऊतांचा फडणवीसांना इशारा; मुंडेंच्या काँग्रेस प्रवेशाचा गौप्यस्फोट ते सपकाळांची टीका

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत मतभेदांपासून विरोधकांच्या सरकारवरील टीकेपर्यंत विविध मुद्द्यांवरून राजकीय…

23 मिनिटे ago

महाराष्ट्रातील 10 प्रमुख MIDC; पुणे ठरतेय औद्योगिक केंद्र, उद्योजकांच्या स्थलांतराने राजकारण तापले

मुंबई : महाराष्ट्रातील औद्योगिक विकासाचा विचार केला तर पुणे जिल्ह्याचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. पुण्याला…

27 मिनिटे ago

उरळगावात दोन शेतकऱ्यांच्या बोअरमधील मोटारींसह केबलची चोरी; १७ हजारांचा मुद्देमाल लंपास

न्हावरे (अक्षय टेमगिरे): उरळगाव (ता. शिरुर) येथील गट क्रं १६५ मधील दोन बोअरवेलमधून अज्ञात चोरट्याने…

29 मिनिटे ago

सलग 25 वेळा तिरंगा फडकावत मोदींच्या नावावर नवा विक्रम; विकसित भारतासाठी ‘सप्तधारा’चा संकल्प

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासनप्रमुख म्हणून सलग 25 वेळा राष्ट्रध्वज फडकावण्याचा नवा…

7 तास ago