मुंबई : दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियान प्रकरणावर अभिनेता सूरज पांचोलीने सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट करत आपली भूमिका मांडली आहे. “माझं इन्स्टाग्राम अकाऊंट ब्लॉक होण्यापूर्वी मला हे स्पष्ट करायचं आहे,” असं म्हणत त्याने गेल्या काही वर्षांपासून या प्रकरणात आपलं नाव घेतलं जात असल्याबाबत भाष्य केलं आहे.
सूरज पांचोलीने पुन्हा एकदा दिशा सालियान आणि आदित्य ठाकरे यांना आपण कधीही भेटलो नसल्याचा दावा केला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणाशी कोणताही संबंध नसतानाही त्याला ऑनलाइन शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत.
“मी घाबरलो नाही. ज्या गोष्टींशी माझा काही संबंधच नाही, अशा प्रकरणांमध्ये माझं नाव गोवल्याचं गेल्या अनेक वर्षांपासून पाहत आलो आहे,” असं सूरजने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. आपलं नाव आणि भविष्य पुन्हा उभं करण्याचा प्रयत्न करत असताना आता शांत बसणार नसल्याचंही त्याने स्पष्ट केलं.
थेट मुलाखतीची मागणी
या प्रकरणावर आपली बाजू सविस्तर मांडण्यासाठी सुशिक्षित आणि जबाबदार पत्रकार किंवा मुलाखतकाराने समोर बसून थेट प्रश्न विचारावेत, अशी इच्छा सूरजने व्यक्त केली आहे. प्रश्न कठीण किंवा अस्वस्थ करणारे असले तरी त्यांची उत्तरं देण्यास आपली तयारी असल्याचं त्याने म्हटलं आहे.
मात्र, संवाद तथ्यांच्या आधारे आणि पत्रकारितेची तसेच माणुसकीची जाणीव ठेवून व्हावा, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली. कॅमेऱ्यामागे लपून प्रश्न विचारणे, प्रतिक्रिया मिळवण्यासाठी पाठलाग करणे किंवा एखाद्याच्या आयुष्याचं तमाशात रूपांतर करणे आपल्याला मान्य नसल्याचं त्याने म्हटलं आहे.
“माझा संबंध असल्याचा पुरावा मिळाला तर शिक्षा स्वीकारेन”
सूरज पांचोलीने तपास यंत्रणांना या प्रकरणाचा सखोल आणि निष्पक्ष तपास करण्याची विनंती केली आहे. आपल्या सहभागाचा अगदी छोटासा पुरावाही समोर आला, तर कायद्यानुसार होणारी शिक्षा स्वीकारण्यास तयार असल्याचं त्याने म्हटलं आहे.त्याचवेळी तपासात आपला या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट झाल्यास, ही बाबही माध्यमांनी आणि तपास यंत्रणांनी तितक्याच स्पष्टपणे जनतेसमोर मांडावी, अशी मागणी त्याने केली.
“माझा कोणताही राजकीय अजेंडा नाही”
आपलं नाव या प्रकरणात ओढण्यामागे कुटुंबातील काही सदस्यांशी संबंधित वाद किंवा इतर प्रश्न कारणीभूत असल्याचा दावा सूरजने केला आहे. मात्र, कोणाशीही आपलं वैयक्तिक वैर नसल्याचं सांगत त्याने आपली कोणतीही राजकीय जवळीक किंवा राजकीय अजेंडा नसल्याचं स्पष्ट केलं.
“माझ्याकडे लपवण्यासारखं काहीही नाही. मी तपासात पूर्ण सहकार्य केलं आहे, प्रश्नांची उत्तरं दिली आहेत आणि चौकशीसाठी स्वतःला उपलब्ध करून दिलं आहे,” असं त्याने पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे.
“मला फक्त एवढंच हवं आहे की सत्य निष्पक्षपणे आणि योग्य पद्धतीने लोकांसमोर यावं. आणि जर सत्य हेच असेल की माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, तर कृपया मला शेवटी माझं आयुष्य पुन्हा जगू द्या,” अशी भूमिका सूरज पांचोलीने मांडली आहे.
मुंबई: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ आणि विद्यार्थी परिषद निवडणुकांसाठी लागू असलेल्या एकरूप परिनियमांच्या अनुषंगाने विद्यार्थी…
नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसमधील पक्षचिन्हाच्या वादावर गुरुवारी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान शिवसेना पक्षातील वादाचा…
तेलंगणातील भद्राद्री कोठगुडेम जिल्ह्यात खळबळ; शरीरावर जखमांच्या खुणा, शेजाऱ्यावर संशय; पोलिसांकडून सखोल तपास सुरू तेलंगणा:…
बारामती: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती दौऱ्याची तारीख अखेर निश्चित…
मुंबई : आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकणाऱ्या उत्पादनांच्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवर महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने…
मुंबई: देशातील कोट्यवधी घरगुती एलपीजी ग्राहकांसाठी १ ऑक्टोबर २०२६ पासून महत्त्वाचा बदल लागू होणार आहे.…