महाराष्ट्र

ग्रामीण विकासासाठी शिवसेनेला पाठबळ द्या; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

खेडमधील प्रचारसभेत विकास कामांसह योजनांचाही वाचला पाढा

राजगुरुनगर: ग्रामीण विकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना सक्षम करणे गरजेचे असून शिवसेनेच्या उमेदवारांना पाठबळ द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांची खेड-राजगुरुनगर येथे जाहीर प्रचारसभा पार पडली. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

कार्यकर्तेच खासदार-आमदार घडवतात, ही कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याने शिवसेना उमेदवारांना पाठबळ द्यावे, असे आवाहन त्यांनी करत ७ तारखेला होणाऱ्या मतदानासाठी मतदारांनी सावधपणे निर्णय घ्यावा, असे सांगितले.

लोकसभा-विधानसभा निवडणुकांप्रमाणे ग्रामीण विकासासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती महत्त्वाच्या असून राज्यात थांबलेला विकास पुढे नेण्याचे काम सरकारने केले असल्याचे ते म्हणाले.

अडीच वर्षांत राज्यभर फिरून लोकाभिमुख निर्णय घेतल्याचा दावा करत त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, लेक लाडकी लखपती योजना, एसटी प्रवासात ५० टक्के सवलत, मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण, नावासमोर आईचे नाव लावण्याचा निर्णय यांचा उल्लेख केला. महिलांना स्वतः सही करून पैसे काढण्याचा अधिकार दिल्याने त्यांचा सन्मान वाढला असून अनेक महिलांनी छोटा-मोठा व्यवसाय सुरू करून अर्थव्यवस्थेला चालना दिल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण फीच्या भीतीने विद्यार्थिनीने आत्महत्या केलेल्या घटनेनंतर सरकारने ५० ऐवजी १०० टक्के फी माफीचा निर्णय घेतल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

शेतकरी हा केंद्रबिंदू असल्याचे सांगत शिंदे म्हणाले, शेतकरी सन्मान योजनेत वार्षिक सहा हजार रुपये, पिकविमा व नुकसानभरपाई निकष सुलभ, अतिवृष्टी मदत एनडीआरएफच्या दुप्पट, दोनऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत, सततच्या पावसामुळे होणारे नुकसान भरपाईत समाविष्ट करण्यात आले. ३२ हजार कोटींचे पॅकेज देण्यात आले असून शेतकरी कर्जमाफीसाठी समिती स्थापन केली आहे, योग्य वेळी निर्णय घेतला जाईल. राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार शेतकऱ्यांचा असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.

सरकारने “शासन आपल्या दारी”नंतर “आरोग्य आपल्या दारी” उपक्रम सुरू केला असून महात्मा जोतिबा फुले आरोग्य विमा मर्यादा पाच लाखांपर्यंत वाढवली, १६२ ग्रामपंचायती पेपरलेस केल्या व १३ सेवा ऑनलाइन उपलब्ध केल्याचे त्यांनी सांगितले. घरकुल योजनांमध्ये खेड तालुका आघाडीवर असून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत हजारो घरे मंजूर केली आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

स्थानिक विकासकामांचा उल्लेख करत त्यांनी चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी १५६ कोटींचे रस्ते, पाणीपुरवठा योजना, राजगुरुनगर-भीमाशंकर रस्ता, बुडीत बंधारे, सिंचन प्रकल्प, ३० गावांतील ९०८८ हेक्टर जमिनींचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले. नगरपरिषदांना निधी कमी पडू देणार नाही, समिती इमारतीसाठी १४ कोटी मंजूर केले असून स्मारकासाठी २५४ कोटींचा आराखडा तयार केल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

लाडकी बहिण योजना कधीही बंद होणार नसून ती निवडणुकीपुरती घोषणा नसल्याचा पुनरुच्चार करत खोटी आश्वासने देणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन त्यांनी केले. ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या विचारावर शिवसेना काम करत असल्याचे सांगून सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करत त्यांनी सभेचा समारोप केला.

यावेळी आमदार शरद सोनावणे, शिवसेना सचिव राम रेपाळे, शिरूर लोकसभा संपर्कप्रमुख विकास रेपाळे आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते, शिवसेनेचे सर्व उमेदवार आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

12 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

20 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago