महिला शेतकऱ्यांची यवतमाळ ते नागपूर भव्य पदयात्रा काढणार; केंद्र-राज्य सरकारच्या शेतकरी मदतीची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची मागणी
मुंबई: काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘Belonging: A Journey of Love’ या पुस्तकातील पान क्रमांक २०१ फाडून निषेध नोंदवण्याचा प्रकार म्हणजे वैचारिक दिवाळखोरीचे दर्शन असल्याची घणाघाती टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. पुस्तकातील विचार पटत नसतील तर लोकशाही मार्गाने विरोध करा, स्वतःचे विचार मांडा; मात्र पुस्तकाची पाने फाडून विचारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणे हा अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर घाला आहे. पुस्तकाची पाने फाडून इतिहास किंवा सत्य पुसता येत नाही, अशा शब्दांत त्यांनी या प्रकाराचा निषेध केला.
सोनिया गांधी यांनी भारताला आपला देश मानून येथील जनतेशी अतूट नाते निर्माण केले. सार्वजनिक जीवनात अनेक संकटांचा सामना करत त्यांनी देशासाठी संघर्ष केला. त्यांचा त्याग, संघर्ष आणि समर्पणाचा प्रवास पुस्तकातून समोर येत असताना त्याची पाने फाडून अपमान करण्याचा प्रयत्न दुर्दैवी आहे. संजय निरुपम यांच्यासारख्या नेत्यांनी सत्तेसाठी संघाच्या विचारधारेपुढे लोटांगण घालण्याऐवजी लोकशाही आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करावा. आमच्या विचारांशी मतभेद असतील तर त्याला विचारांनी उत्तर देण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हानही वडेट्टीवार यांनी दिले.
या निषेधादरम्यान शायना एन. सी. यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्रही फाडल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. विरोध करताना आपण नेमके काय बोलतो आणि कसे वागतो, याचे भान शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी ठेवले पाहिजे, असेही त्यांनी सुनावले.
दोन आठवड्यांच्या अधिवेशनावर सरकारला धारेवर
राज्यातील शेतकरी, बेरोजगार, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर विधिमंडळात सविस्तर चर्चा व्हावी, यासाठी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत काँग्रेसने तीन आठवड्यांचे अधिवेशन घेण्याची मागणी केली होती. मात्र सरकारने केवळ दोन आठवड्यांचे अधिवेशन निश्चित केले. राज्यासमोर गंभीर प्रश्न असताना त्यावर चर्चा करण्यासाठी पुरेसा वेळ देण्याची सरकारची तयारी नसल्याचे यातून स्पष्ट होते, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून शेतकऱ्यांचा छळ
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्जवसुली करू नये, असे सरकारचे आदेश असतानाही मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून शेतकऱ्यांची छळवणूक सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. लातूर जिल्ह्यात कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना फोनवरून शिवीगाळ आणि धमक्या दिल्या जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. सरकारच्या आदेशांना या कंपन्या केराची टोपली दाखवत असून व्याज आणि वसुलीच्या नावाखाली शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक व मानसिक छळ केला जात आहे. अशा कंपन्यांविरोधात सरकारने तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
नैसर्गिक संकटांमुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जवसुलीच्या नावाखाली धमकावणे आणि अपमानास्पद वागणूक देणे सहन केले जाणार नाही. बेकायदेशीर वसुली करणाऱ्या प्रतिनिधींना सरकारने वेळीच रोखले पाहिजे. सरकार नेमके शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे की मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या, याचे स्पष्ट उत्तर द्यावे, असेही वडेट्टीवार म्हणाले.
शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी ठोस आर्थिक व्यवस्था हवी
राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. अनेक महिलांवर वैधव्याचे संकट ओढवले आहे. अशा परिस्थितीत केवळ तात्पुरती आर्थिक मदत जाहीर करून प्रश्न सुटणार नाहीत. शेतकऱ्यांच्या आर्थिक पुनर्वसनासाठी आणि पुढील वर्षभर त्यांना आधार देण्यासाठी ठोस आर्थिक व संस्थात्मक व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील शेतकरी गंभीर संकटात असताना केंद्र सरकारकडून राज्याला अपेक्षित मदत मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्य सरकारने केंद्राकडे नेमकी किती मदत मागितली, त्यापैकी किती मंजूर झाली आणि प्रत्यक्षात किती निधी मिळाला, याचा तपशील जनतेसमोर यावा. केंद्र आणि राज्य सरकारने शेतकरी मदतीबाबत श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अशी मागणी त्यांनी केली.
महिला शेतकऱ्यांचा यवतमाळ ते नागपूर मोर्चा
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने ठोस निर्णय घेतले नाहीत, तर यवतमाळ ते नागपूर अशी महिला शेतकऱ्यांची भव्य पदयात्रा काढण्यात येईल, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला. या पदयात्रेत हजारो महिला शेतकरी सहभागी होतील. नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनादरम्यान महिला शेतकऱ्यांचा मोर्चा सरकारला जाब विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या संकटाची सर्वाधिक झळ त्यांच्या कुटुंबांना आणि विशेषतः महिलांना सहन करावी लागते. त्यामुळे महिला शेतकरी आता स्वतःच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून विधानभवनावर धडक देतील. शेतकऱ्यांच्या वेदना आणि महिलांचा आक्रोश सरकारला ऐकावाच लागेल. सरकारने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी तीव्र संघर्ष उभारला जाईल, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला.
मुंबई : महाराष्ट्रातील सत्ताधारी सरकारच्या कारभारावर आता विरोधकच नव्हे, तर खुद्द सत्ताधारी पक्षातील ज्येष्ठ नेतेही नाराजी…
मुंबई : झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांमध्ये या आठवड्यात अनेक रंजक, भावनिक आणि नाट्यमय घडामोडी…
महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयांमधील तब्बल ३४ हजार कर्मचारी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी संपावर जाण्याची वेळ येणे, ही…
चालणे, योगासन करणे आणि जास्त हालचालींचे बहुतेक प्रकार शरीराला ग्लुकोजचे चांगले नियमन करण्यास मदत करतात.…
सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात आपण आरोग्याकडे आणि आहाराकडे दुर्लक्ष करतो, त्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या वाढताना दिसत…
आपले मन आणि शरीर निरोगी असणं फार गरजेचे आहे. शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्य जपायला हवे.…