77 व्या प्रजासत्ताक दिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
ठाणे: सत्तासंघर्ष आणि राजकारणापेक्षा देश, राज्य आणि समाज मोठा असतो. धर्माच्या पलीकडे जाऊन कोणावरही अन्याय न होऊ देता सर्व समाजघटकांना सोबत घेऊन कल्याणकारी स्वराज्याची निर्मिती करणे हेच आपले ध्येय असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
77 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे पोलीस क्रीडा संकुलातील साकेत मैदान येथे भव्य राष्ट्रध्वजवंदन व संचलन सोहळा पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित केले.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आजचा दिवस हा आपल्या लोकशाहीचा उत्सव आहे. संविधानाने प्रत्येक नागरिकाला न्याय, अधिकार आणि स्वातंत्र्य दिले आहे. ‘प्रजासत्ताक’ या शब्दात आधी प्रजा म्हणजे नागरिक आणि नंतर सत्ता येते, हे कधीही विसरता कामा नये. सत्तासंघर्षापेक्षा देश, राज्य आणि समाज मोठा आहे, हीच शिकवण संविधान देते.
यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व थोर स्वातंत्र्यसैनिक व समाजसुधारकांना अभिवादन केले.
मराठी माणसाचा आवाज बुलंद करणारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पुढील वर्षभर सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय उपक्रम राबवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मिता जपण्याचे काम सरकार प्रामाणिकपणे करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ठाणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासावर भर देत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडीमुक्त प्रवास, उद्योग-व्यवसायांना चालना आणि रोजगारनिर्मिती यावर सरकारचे विशेष लक्ष असल्याचे स्पष्ट केले. परवडणारी व पर्यावरणपूरक घरे, रखडलेले पुनर्विकास प्रकल्प, एसआरए व क्लस्टर प्रकल्पांना गती देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 30 लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार झाले असून त्यातून सुमारे 40 लाख रोजगारनिर्मिती होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम देशात विक्रमी ठरला असून ठाणे जिल्ह्यात 431 ग्रामपंचायतींमध्ये डोअरस्टेप सेवा सुरू आहे. मोबाईल मेडिकल युनिटमध्ये ठाणे जिल्हा राज्यात अव्वल ठरला असून ‘मायका’ हे मराठीतील पहिले मानसिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले आहे.
‘लाडकी बहीण’ योजनेतून हजारो महिलांना आर्थिक सहाय्य मिळत असून जिल्ह्यातील 47 हजारांहून अधिक महिला लखपती झाल्याचा उल्लेखही त्यांनी केला. आदिवासी न्याय महाअभियानांतर्गत कातकरी समाजासाठी मोठ्या प्रमाणात घरकुले मंजूर करण्यात आली आहेत.
मेट्रो-4 व मेट्रो-4A लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार असून मेट्रो-5 मुळे ठाणे, भिवंडी, कल्याण आणि नवी मुंबई जोडली जाणार आहेत. तसेच रेल्वे, रस्ते, बोगदे व पाणीपुरवठा प्रकल्प वेगाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
2047 पर्यंत भारताला आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनवण्याच्या दिशेने महाराष्ट्र ग्रोथ इंजिन ठरेल आणि त्यात ठाणे जिल्ह्याचा मोठा वाटा असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, ठाणे महापालिकेच्या ‘स्वच्छ ठाणे, हरित ठाणे’ या संकल्पनेवरील ‘स्वच्छ ठाणे दिनदर्शिका 2026’ तसेच जिल्हा प्रशासनाच्या ‘ई-संजीवन’ प्रकल्पाच्या वेबसाईट क्यूआर कोडचे अनावरण उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कोल्हापुरात पार्थिवाचे घेतले अंतिम दर्शन; शिक्षण, समाजसेवा आणि वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाला भावपूर्ण श्रद्धांजली कोल्हापूर :…
६० दिवसांत अहवाल सादर होणार; ९ ऑगस्टचे जनआंदोलन नियोजितप्रमाणेच होणार मुंबई: पुणे–नाशिक सरळ रेल्वे प्रकल्पाच्या…
निवडणूक प्रक्रिया रद्द करून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी; चौकशी पुर्ण होईपर्यंत निकाल व पुढील प्रक्रिया…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदी ॲड. चिन्मय गाढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय…
'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर रिक्त घरांची विक्री; शिरूर, खराबवाडी, दापोडी, म्हाळुंगे-इंगळे आणि सांगलीतील प्रकल्पांना…
कोरेगाव भीमा येथे पूर्वीही एसीबीची कारवाई; आता पुण्यात १० लाखांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा, देखरेखीवर…