महाराष्ट्र

अमित शाहांच्या राजीनाम्याची मागणी म्हणजे निव्वळ राजकीय स्टंट; विरोधकांनी संसदेत चर्चेला यावे; एकनाथ शिंदे

जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांचे आंदोलन संपले, तरी काँग्रेसकडून राजकारण सुरूच; शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीवरून उबाठावरही निशाणा

नवी दिल्ली: जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला. मात्र, आंदोलन संपल्यानंतरही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांच्या आडून काँग्रेस आणि विरोधक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी करत संसदेबाहेर राजकीय स्टंट करत आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर सुमारे तासभर चर्चा झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

यावेळी शिवसेना संसदीय पक्षाचे नेते डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार नरेश म्हस्के, खासदार रवींद्र वायकर, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार संजय देशमुख, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार ज्योती वाघमारे आणि खासदार संजय दिना पाटील उपस्थित होते.

तत्पूर्वी शिवसेनेत नुकताच प्रवेश केलेल्या खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी चहापानासाठी आमंत्रित केले होते. मतदारसंघातील विकासकामांवर लक्ष केंद्रित करा, काळजी करू नका, अशी ग्वाही पंतप्रधानांनी शिवसेना खासदारांना दिल्याचे शिंदे यांनी सांगितले.

‘सरकार चर्चेसाठी तयार, विरोधक मात्र राजकीय स्टंटमध्ये व्यस्त’

सरकार संसदेत चर्चेसाठी तयार आहे. मात्र, विरोधक सभागृहात चर्चा करण्याऐवजी संसदेबाहेर केंद्रीय गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करत आहेत. जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असताना काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी निदर्शने करण्याचा प्रयत्न केला. आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला. त्यानंतर विद्यार्थ्यांचे आंदोलनही संपले आणि विद्यार्थी आपल्या कामात व्यस्त झाले.

विद्यार्थी आणि युवा हे देशाचे उद्याचे भविष्य आहेत. त्यांचा सन्मान राखत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक कठोर निर्णय घेतले असून, त्यांनी युवकांशी संवादही साधला. मात्र, काँग्रेस आणि इतर विरोधक गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. काँग्रेसला संसदेत चर्चेला यायचे नाही, पण संसदेबाहेर राजकीय स्टंट करायचा आहे, असा आरोप शिंदे यांनी केला.

‘कलम ३७० हटवले, नक्षलवादाला आळा घातला म्हणून राजीनामा मागताय का?’

अमित शाह यांनी नक्षलवादाविरोधात कठोर भूमिका घेतली, जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवले आणि पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाविरोधात निर्णायक कारवाई केली. त्यामुळेच काँग्रेस गृहमंत्र्यांचा राजीनामा मागत आहे का, असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला.

गृहमंत्री अमित शाह यांना देशभक्तीचे धडे देण्याची गरज नाही. राजकीय स्टंट करण्यापेक्षा विरोधकांनी सभागृहात येऊन सरकारशी चर्चा करावी. सरकार चर्चेसाठी तयार आहे, असे आवाहनही त्यांनी केले.

महिला आरक्षणासारख्या महत्त्वाच्या विधेयकाला सर्वांनी पाठिंबा द्यायला हवा. मतदारसंघांची पुनर्रचना ही काळाची गरज आहे. या विषयाकडे राजकीय दृष्टिकोनातून न पाहता सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले पाहिजे, असेही शिंदे म्हणाले.

चौकट

‘उबाठाने जुनीच कॅसेट पुन्हा वाजवली!’

‘न्यायालयावर विश्वास आहे की नाही, हे त्यांनी एकदा ठरवावे’ – एकनाथ शिंदे

सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधला. न्यायालयावर विश्वास आहे की नाही, हे त्यांनी एकदा ठरवावे, असा टोला शिंदे यांनी लगावला.

यापूर्वीच्या सुनावणीवेळी पेढे वाटले जात होते आणि सरकार घटनाबाह्य असल्याचा दावा केला जात होता. मात्र, महायुतीचे सरकार कायद्याच्या चौकटीत स्थापन झाले होते. माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनीही सरकार घटनाबाह्य नसल्याचे स्पष्ट केले होते, असा दावा शिंदे यांनी केला.

त्यामुळे पूर्वी जी कॅसेट वाजवली जात होती, तीच कॅसेट आज पुन्हा वाजवली जात आहे, अशी खरमरीत टीका त्यांनी केली. त्या सरकारचा आणि आमदारांचाही कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे आमदारांना अपात्र करा, अशी मागणी करणारे नेमके कुठल्या काळात वावरतात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

‘जनतेच्या न्यायालयात न्याय मागू’ असे सांगणाऱ्यांना जनतेने निवडणुकीत त्यांची जागा दाखवली. जनतेने आम्हाला स्वीकारले. शिवसेनेचे ४० आमदार होते, ते ६० झाले. आम्ही लोकशाही मानणारे आहोत आणि न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर अधिक भाष्य करणार नाही, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मतदार वगळण्यावरून काँग्रेसचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

मुंबई: महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून काँग्रेसने निवडणूक आयोग आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप…

14 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त; सरकार मात्र कागदी घोडे नाचवतंय; हर्षवर्धन सपकाळ

‘गणराया, सरकारला शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची सुबुद्धी दे’; राहुल गांधींवरील फडणवीसांच्या टीकेवरही सपकाळांचा निशाणा मुंबई:…

14 तास ago

घोड पाटबंधारे विभागाची भुमिका संशयास्पद…? पोलिसांना दिलेल्या पत्रात फक्त ठराविक वाळु माफियांची नावं

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या जलाशय परिसरात दिवसाढवळ्या आठ ते नऊ यांत्रिक बोटिंच्या साह्याने बेसुमार…

22 तास ago

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

2 दिवस ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

2 दिवस ago