क्राईम

शिरुरमध्ये गोळीबार करुन दहशत माजविणाऱ्या कुख्यात टोळीवर मोक्का; ११ जणांचा सहभाग, २२ गंभीर गुन्ह्यांची नोंद

शिरूर (तेजस फडके): शिरुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर अग्निशस्त्रांचा वापर करुन गोळीबार, खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, जबरी चोरी आणि संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून दहशत निर्माण करणाऱ्या इशप्पा ऊर्फ विशाल जगन्नाथ पंदी (वय २४, रा. वाघोली, ता. हवेली, जि. पुणे) याच्या नेतृत्वाखालील ११ जणांच्या टोळीविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाईला विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे या टोळीवर पोलिसांनी आता कायद्याचा फास अधिक घट्ट केला आहे.

दि १ जून २०२६ रोजी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास सरदवाडी हद्दीतील करडे घाट येथील राजस्थान ढाब्याजवळ न्हावरा फाटा-करडे रस्त्यावर हा थरार घडला. फिर्यादी उमेश अनिल जगदाळे हे मित्रांसह टोयाटो टायझरमधून शिरुरकडे जात असताना लाल रंगाच्या किया सोनेटने त्यांच्या वाहनाला धडक दिली. त्यानंतर वाहनातून पाच जण आणि मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी मिळून पूर्वीच्या पैशांच्या व्यवहाराच्या वादातून हल्ला केला.

या हल्ल्यात विशाल सुनील काळे (वय ३१, रा. ढोरआळी, शिरुर) याच्यावर गोळीबार तसेच दगडांनी हल्ला करुन त्याचा खून करण्यात आला. केदार चंद्रकांत झाडगे (वय २५, रा. कुंभारआळी, शिरूर) याच्या डोक्यात घातक हत्याराने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच फिर्यादीच्या दिशेनेही बंदुकीतून गोळीबार करुन त्याच्या जीवाला धोका निर्माण करण्यात आला.

या प्रकरणाचा तपास शिरुर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांनी संयुक्तपणे सुरु केला. तपासादरम्यान या गुन्ह्यात एकूण ११ आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला. टोळीप्रमुख इशप्पा ऊर्फ विशाल जगन्नाथ पंदी याच्यासह अमन ऊर्फ मुन्ना दस्तगीर पटेल, सनी संजय यादव, आदित्य बापुसो ऊर्फ बापू शिंदे, आदित्य दीपक कांबळे, पांडुरंग बालाजी कांबळे, अभिषेक ऊर्फ घ्या हनुमान मिसाळ, सिद्धेश ऊर्फ सिद्धार्थ ऊर्फ बाल्या तुकाराम शिंदे, सुरज ऊर्फ नन्या संतोष मोरे आणि देवानंद शिवाजी चव्हाण यांना अटक करण्यात आली असून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. गोपाळ संजय यादव हा फरारी आहे.

या टोळीविरोधात शिरुर, लोणीकंद, वाघोली, फुरसुंगी, सांगवी, तळेगाव दाभाडे आणि अहिल्यानगर एमआयडीसी पोलीस ठाण्यांमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, जबरी चोरी, सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला, घातक हत्यारांचा वापर, बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणे, अपहरण, दरोडा आणि संघटित गुन्हेगारीसह तब्बल २२ गंभीर गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले.

या टोळीची वाढती दहशत, संघटित पद्धतीने गुन्हे करण्याची प्रवृत्ती आणि परिसरातील शांतता व सार्वजनिक सुव्यवस्थेला निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन पुणे ग्रामीण पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला. विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी कागदपत्रांची पडताळणी करुन मोक्का कायद्यांतर्गत कलमांची वाढ करण्यास कायदेशीर मंजुरी दिली. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास शिरुर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, सहायक पोलीस फौजदार महेश बनकर, रामदास बाबर, गणेश धनवे, वैभव सावंत यांनी केली.

तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस हवालदार तुषार पंदारे, राजू मोमीन, जनार्दन शेळके, संजू जाधव, पोलीस कॉन्स्टेबल सागर धुमाळ, शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार राहुल भवर, शरद वारे, पोलीस अंमलदार सचिन भोई, विजय शिंदे, गणेश गोसावी, रोहित बाचल, वैभव शेलार तसेच तत्कालीन पोलीस हवालदार परसराम सांगळे आणि नितीन सुद्रिक यांनी या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वय वाढल्यामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो असा परिणाम

आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…

5 तास ago

हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस!

आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…

5 तास ago

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; एकनाथ शिंदेंचा निर्धार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

5 तास ago

ओबीसींच्या स्वतंत्र जनगणना कॉलमसाठी वडेट्टीवारांचा एल्गार! २ नोव्हेंबरला भारत बंद, १५ नोव्हेंबरला दिल्लीत शक्तिप्रदर्शन

नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…

5 तास ago

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क; सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांना मतदानाचे आवाहन

बारामती: श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा…

5 तास ago

शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटारी चोरीला; गुन्हा दाखल…

न्हावरे (तेजस फडके): इनामगाव (ता.शिरुर) येथे शेतजमिनीतून दोन विद्युत मोटारी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली…

10 तास ago