क्राईम

शिरुरमध्ये ५६ ग्रॅम एमडीसह दोघे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची आठवड्यातील तिसरी कारवाई

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ‘एमडी’ अंमली पदार्थाची बेकायदेशीर विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५६ ग्रॅम वजनाचा प्रतिबंधित एमडी अंमली पदार्थ, मोटारसायकल आणि दोन मोबाईल फोन असा एकूण ११ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे, स्थानिक गुन्हे शाखेने मागील आठवड्यात अंमली पदार्थांविरोधात केलेली ही तिसरी कारवाई आहे.

नशामुक्त भारत अभियान तसेच ‘ड्रग्स फ्री महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत पुणे ग्रामीण पोलीस दलाने अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक आणि सेवन रोखण्यासाठी कारवाईला प्राधान्य दिले आहे. त्यानुसार विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, रंजन कुमार शर्मा आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी अंमली पदार्थ जवळ बाळगणाऱ्या व त्याची विक्री करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांना दिल्या होत्या.

या सूचनांनुसार स्थानिक गुन्हे शाखेची पथके तयार करुन शिरुर परिसरात गस्त, माहिती संकलन आणि संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. मागील कारवायांच्या तपासादरम्यान अंमली पदार्थ पुरवठा करणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या व्यक्तींबाबत माहिती मिळाल्यानंतर त्याआधारे सलग कारवाया करण्यात आल्या.

दरम्यान, २६ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शिरुर परिसरात गस्त घालत असताना न्हावरा-तळेगाव रोडवर एमडीची बेकायदेशीर देवाणघेवाण होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन शिरुर उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भासले यांचे आदेश घेण्यात आले. पंच व आवश्यक कारवाईचे साहित्य घेऊन पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला.

या कारवाईत प्रदीप विठ्ठल कोरेकर (रा. न्हावरा, ता. शिरुर, जि. पुणे) आणि साईनाथ जनार्दन भोसेकर, (वय ३५ वर्षे, रा. कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून ५६ ग्रॅम एमडी अंमली पदार्थाची किंमत ११ लाख २० हजार रुपये, ३० हजार रुपयांची मोटारसायकल व दोन मोबाईल फोन असा एकूण ११ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी शिरुर पोलीस स्टेशन एनडीपीएस कायदा कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापूर्वी १८ ऑगस्ट २०२६ रोजी केलेल्या कारवाईत सुरेंदसिंह भैरुसिंह राठोड उर्फ राजपुत (वय २४ वर्षे, सध्या रा. मनिष शिरोळे फार्म हाऊस, मलठण, ता. शिरूर, जि. पुणे, मूळ रा. गोगादेव की ढाणी, बांकियावास खुर्द, ता. कल्याणपूर, जि. बाडमेर, राजस्थान) आणि श्रवण तेजाराम बिष्नोई (वय ३१ वर्षे, रा. मनिष शिरोळे फार्म हाऊस, मलठण, ता. शिरूर, जि. पुणे, मूळ रा. बांकियावास खुर्द, ता. कल्याणपूर, जि. बाडमेर, राजस्थान) यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्या ताब्यातून ११० ग्रॅम एमडी अंमली पदार्थ व मोटारसायकल असा २२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या प्रकरणी एनडीपीएस कायदा कलमाप्रमाणे गुन्हा दाखल आहे.

तसेच १९ ऑगस्ट २०२६ रोजी केलेल्या कारवाईत दादा बबन धावडे (वय २७ वर्षे, रा. कोल्हेवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) आणि अमोल राजाराम पोटावळे (वय ३५ वर्षे, रा. राजापूर, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून २० ग्रॅम एमडी अंमली पदार्थ व स्कॉर्पिओ कार असा ९ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी शिरुर पोलीस स्टेशन येथे एनडीपीएस कायदाप्रमाणे गुन्हा दाखल आहे.

दरम्यान, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी नागरिक व पालकांना अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. तरुण पिढीला ड्रग्जच्या विळख्यातून वाचविण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असून, अंमली पदार्थांची विक्री किंवा वाहतूक करणाऱ्या व्यक्तींची माहिती नागरिकांनी पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्या नागरिकाची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांच्या एका गुप्त माहितीमुळे एखाद्या तरुणाचे भविष्य आणि कुटुंबाचे आरोग्य वाचू शकते, असेही त्यांनी सांगितले.

हि कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलीस निरीक्षक विनोद पाटील, शिरुर पोलीस स्टेशन, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत दिवटे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश डोंगरे, सागर शेळके, स्थनिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार सहायक फौजदार संजय पड्याळ, पोलिस हवालदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजू मोमीन, विकास पाटील, पोलिस शिपाई सागर धुमाळ तसेच शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार बाळू भवर, गिराम व चितारे यांनी केली.

या प्रकरणांचा पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतरपणे सुरू आहे. सलग तीन कारवायांमधून मोठ्या प्रमाणात एमडी जप्त झाल्याने शिरूर परिसरातील अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर साखळीवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुरमधील घरफोडीचा छडा; तीन चोर जेरबंद १२१ ग्रॅम सोन्यासह २०० ग्रॅम चांदीचे दागिने हस्तगत

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या घरफोडी चोरीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने…

3 तास ago

शिरुरमध्ये गोळीबार करुन दहशत माजविणाऱ्या कुख्यात टोळीवर मोक्का; ११ जणांचा सहभाग, २२ गंभीर गुन्ह्यांची नोंद

शिरूर (तेजस फडके): शिरुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर अग्निशस्त्रांचा वापर करुन गोळीबार, खून, खुनाचा प्रयत्न,…

3 तास ago

पत्रकारीतेच्या बोगसगिरीवर दिल्ली उच्च न्यायालयाचा घणाघात; सगळीकडे ‘बोगस’ पत्रकारांचा सुळसुळाट…?

दिल्ली (विशेष प्रतिनिधी) हातात मोबाईल अन माईक आणि खिशात बनावट ओळखपत्र घेतलं की पत्रकार होता…

6 तास ago

अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यूवर वडेट्टीवार आक्रमक; आठ दिवसांत चौकशी अहवाल जाहीर करण्याची मागणी

अमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागाला लागलेल्या भीषण आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू…

8 तास ago

चाकणच्या समस्यांवर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; ३१ ऑगस्टपर्यंत खड्डे बुजविण्याचे निर्देश

पुणे : चाकण परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खड्डे, अतिक्रमणे, कचरा व्यवस्थापन, पार्किंग आणि सुरक्षेच्या…

8 तास ago

मंदिराच्या गर्भगृहात जाण्यावरून वाद; भाजप आमदाराच्या मुलीने महिला PSI ला मारली कानशिलात

मांड्या : कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यातील श्रीरंगपट्टण येथील उक्कड मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाजप आमदाराच्या मुलीचा कर्तव्यावर…

8 तास ago