निवडणूक प्रक्रिया रद्द करून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी; चौकशी पुर्ण होईपर्यंत निकाल व पुढील प्रक्रिया स्थगित ठेवण्याची विनंती
शिरुर (तेजस फडके) घोडनदी बार असोसिएशनच्या सन २०२६-२०२७ या वर्षासाठी झालेल्या निवडणुकीच्या वैधतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. निवडणूक प्रक्रिया कोणतीही अधिकृत बैठक, ठराव, नोटीस अथवा जाहीर मतदार यादी न प्रसिद्ध करता बेकायदेशीर आणि बोगस पद्धतीने राबविण्यात आल्याचा आरोप अँड सुमित देविदास पोटे यांनी केला आहे. निवडणुकीदरम्यान मतदारांना वेगवेगळी प्रलोभन दाखविण्यात आल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला असून, संपुर्ण निवडणूक रद्द करुन निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्याकडे केली आहे.
निमोणे (ता.शिरुर) येथील रहिवासी आणि घोडनदी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात वकिली व्यवसाय करणारे अँड सुमित पोटे यांनी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे चेअरमन आणि सचिव यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज केला आहे. पोटे हे घोडनदी बार असोसिएशनचे कायदेशीर सभासद असून त्यांनी या निवडणुकीत सचिवपदासाठी उमेदवारी दाखल केली होती.
पोटे यांच्या तक्रार अर्जानुसार, घोडनदी बार असोसिएशनची निवडणूक घेण्यापुर्वी कार्यकारिणी अथवा सर्वसाधारण सभेची कोणतीही अधिकृत बैठक घेण्यात आली नाही. निवडणूक घेण्यासंदर्भातील ठरावही मंजूर करण्यात आला नसल्याचा दावा पोटे यांनी केला आहे. निवडणुकीबाबत बार असोसिएशनच्या सभासदांना कोणतीही लेखी नोटीस किंवा अधिकृत सूचना देण्यात आली नाही. तसेच निवडणूक कार्यक्रमाचा अजेंडाही प्रसिद्ध करण्यात आला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या निवडणुकीपुर्वी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करुन त्यावर सभासदांकडून हरकती आणि सूचना मागविणे अपेक्षित असताना अशी कोणतीही प्रक्रिया राबविण्यात आली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मागील वर्षात नव्याने समाविष्ट झालेल्या सुमारे ४९ वकिलांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली. मात्र त्यासाठी कार्यकारिणीचा कोणताही ठराव घेण्यात आला नसल्याचा दावाही अर्जदार पोटे यांनी केला आहे.
या निवडणुकीत ‘वन बार, वन वोट’ या तत्त्वाचे उल्लंघन झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे. पुणे बार असोसिएशन आणि दौंड बार असोसिएशनच्या निवडणुकीत मतदान केलेल्या अंदाजे ७० वकिलांनी घोडनदी बार असोसिएशनच्या निवडणुकीतही मतदान केल्याचा दावा पोटे यांनी केला आहे. संबंधित मतदारांना ‘वन बार, वन वोट’ नियमाची माहिती असूनही त्यांनी जाणीवपूर्वक मतदान केल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे मतदार यादीची स्वतंत्र आणि सखोल पडताळणी करणे आवश्यक असल्याची मागणीही करण्यात आली आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरही तक्रारदाराने आक्षेप घेतला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांच्या सहकारी पथकाची नियुक्ती करण्यासाठी कोणताही ठराव घेण्यात आला नाही. त्यांना लेखी नियुक्तीपत्रही देण्यात आले नसल्याने त्यांनी राबविलेली निवडणूक प्रक्रिया कायदेशीरदृष्ट्या संशयास्पद आणि बेकायदेशीर ठरत असल्याचा दावा पोटे यांनी केला आहे.
सर्वांत गंभीर बाब म्हणजे मतदान प्रक्रियेदरम्यान काही मतदारांना वेगवेगळी प्रलोभने दाखवत विशिष्ट उमेदवाराच्या बाजूने मतदान करण्यास सांगितले गेल्याचा आल्याचा आरोप तक्रार अर्जात करण्यात आला आहे. या प्रकाराबाबत आक्षेप नोंदविल्यानंतरही निवडणूक निर्णय अधिकारी तसेच विद्यमान अध्यक्ष आणि सचिव यांनी कोणतीही कार्यवाही केली नसल्याचे पोटे यांनी म्हटले आहे.
संपूर्ण निवडणुक प्रक्रिया ठरावीक उमेदवारांना फायदा मिळवून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात आल्याचा संशय व्यक्त करत, बार कौन्सिलने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत निवडणुकीचा निकाल, पदग्रहण आणि पुढील प्रशासकीय प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे आदेश द्यावेत, तसेच आरोप सिद्ध झाल्यास संपूर्ण निवडणूक रद्द करून पारदर्शक पद्धतीने नव्याने निवडणूक घ्यावी, अशी विनंती अर्जदाराने केली आहे. या तक्रार अर्जाची प्रत घोडनदी बार असोसिएशनचे निवडणूक निर्णय अधिकारी तसेच अध्यक्ष आणि सचिव यांनाही माहितीस्तव देण्यात आली आहे.
दरम्यान, या गंभीर आरोपांबाबत बोलताना घोडनदी बार असोशियनचे अध्यक्ष अँड उदय सरोदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, निवडणूक प्रकिया पार पडल्यानंतर त्यांना न्यायालयात रिट दाखल करावी लागेल. निवडणुक प्रकिया पार पडल्यानंतर ती निवडणूक रद्द करण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य असेल.
कोल्हापुरात पार्थिवाचे घेतले अंतिम दर्शन; शिक्षण, समाजसेवा आणि वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाला भावपूर्ण श्रद्धांजली कोल्हापूर :…
६० दिवसांत अहवाल सादर होणार; ९ ऑगस्टचे जनआंदोलन नियोजितप्रमाणेच होणार मुंबई: पुणे–नाशिक सरळ रेल्वे प्रकल्पाच्या…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदी ॲड. चिन्मय गाढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय…
'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर रिक्त घरांची विक्री; शिरूर, खराबवाडी, दापोडी, म्हाळुंगे-इंगळे आणि सांगलीतील प्रकल्पांना…
कोरेगाव भीमा येथे पूर्वीही एसीबीची कारवाई; आता पुण्यात १० लाखांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा, देखरेखीवर…
शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या हद्दीतील बाबुरावनगर परिसरात गेल्या आठ दिवसांपासून निर्माण झालेल्या सांडपाण्याच्या…