मुख्य बातम्या

बेट भागात प्रथमच फुलले कमळ; दिलीप वळसे पाटील, देवदत्त निकम यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

राष्ट्रवादीच्या अंतर्गत नाराजीचा भाजपला लाभ

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील बेट भागात झालेली चौरंगी जिल्हा परिषद निवडणूक अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरली. वर्षानुवर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या भागात प्रथमच ‘कमळ’ फुलले आहे. भाजपचे उमेदवार राजेंद्र गावडे यांनी विजय मिळवत पंचायत समितीच्या दोन्ही जागांवर कमळाचा झेंडा रोवला. या निकालामुळे गावडे घराण्याची प्रतिष्ठा राखली गेली असून माजी आमदार पोपटराव गावडे यांनी याला “स्वाभिमानाची लढाई” असे संबोधले.

राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामागे स्थानिक पातळीवरील अंतर्गत मतभेद आणि नेतृत्वातील विसंवाद कारणीभूत ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आंबेगावचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी या निवडणुकीत अपेक्षित सक्रियता दाखवली नसल्याची टीका होत आहे. तिकीट वाटपातील अचानक बदल आणि स्थानिक कार्यकर्त्यांना योग्य दिशा न दिल्यामुळे पक्षाला फटका बसल्याचे बोलले जात आहे.

राजेंद्र गावडे यांचे राष्ट्रवादीकडून तिकीट कापण्यात आल्यानंतर बेट भागातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली. गावडे समर्थकांमध्ये निर्माण झालेली नाराजी मतदानात स्पष्टपणे दिसून आली. दुसरीकडे दामूअण्णा घोडे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली. या निर्णयात खासदार अमोल कोल्हे यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले जाते. मात्र या प्रक्रियेत वळसे पाटील यांना विश्वासात घेतले गेले नसल्याची चर्चा आहे. परिणामी संघटनात्मक पातळीवर आवश्यक ते बळ मिळाले नाही, असा आरोप घोडे गटाकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, तुतारी गटाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांच्या भूमिकेबाबतही विविध चर्चा रंगल्या आहेत. विधानसभा निवडणुकीपासून सुरू असलेल्या मतभेदांचा परिणाम या निवडणुकीवर झाल्याचे सांगितले जाते. डॉ. सुभाष पोकळे यांनी शिवसेनेकडून उमेदवारी घेत निवडणूक लढवली; मात्र अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाल्याने त्यांच्या गटात नाराजी पसरली आहे. काही स्थानिक सूत्रांच्या मते, मतदानाच्या अंतिम टप्प्यात मतदारांच्या कलात झालेला बदल निर्णायक ठरला.

बाळासाहेब डांगे यांनी ‘मशाल’ चिन्हावर निवडणूक लढवत मराठा समाजाच्या मुद्द्यावर प्रचार केला. मात्र मतांची विभागणी झाल्याचा परिणाम एकूण समीकरणांवर झाला. विशेष म्हणजे, डांगे आणि पोकळे यांच्या एकत्रित मतांएवढीच मते दामूअण्णा घोडे यांना मिळाल्याचे चित्र दिसून आले.

या सर्व राजकीय घडामोडींचा सर्वाधिक फायदा भाजप उमेदवार राजेंद्र गावडे यांना झाला. राष्ट्रवादीकडून तिकीट कापल्यानंतर गावडे घराण्याने भावनिक भूमिका घेत जनतेसमोर आपली बाजू मांडली. त्यासोबतच बूथनिहाय नियोजन, कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे आणि विविध गटांतील मतांची सांगड घालण्यात त्यांनी यश मिळवले. परिणामी, बेट भागातील राष्ट्रवादीचा अभेद्य किल्ला भेदला गेला.

या निकालामुळे दिलीप वळसे पाटील आणि देवदत्त निकम यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आगामी निवडणुकांमध्ये त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. स्थानिक पातळीवरील गटबाजी, समन्वयाचा अभाव आणि नाराज कार्यकर्त्यांची भूमिका यामुळे राष्ट्रवादीला मोठी किंमत मोजावी लागल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

एकूणच, बेट भागातील हा निकाल केवळ एका जागेचा पराभव नसून अंतर्गत विसंवादाचे प्रतिबिंब असल्याचे मानले जात आहे. आगामी काळात राष्ट्रवादी नेतृत्व कोणती भूमिका घेते आणि संघटनात्मक पातळीवर कोणते बदल करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

MPSC विद्यार्थ्यांचा अपमान केल्याबद्दल माफी मागा’; भाजप प्रवक्त्यांवर अमोल मातेलेंचा हल्लाबोल

पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…

6 तास ago

महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला; सच्चा, दिलदार मित्र गमावला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…

8 तास ago

नाना केवळ महान अभिनेते नव्हते, तर सामान्यांच्या दुःखाशी जोडलेला संवेदनशील माणूस होते

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली  मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…

8 तास ago

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाने हरहुन्नरी कलाकार गमावला; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…

8 तास ago

व्होट चोर ज्ञानेश कुमारला महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

आला तर तोंडाला काळे फासणार; निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचा आक्रमक इशारा मुंबई: देशाचे मुख्य निवडणूक…

24 तास ago

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

2 दिवस ago