बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात शेतीपंपांसाठी वीजपुरवठ्याचे सध्याचे वेळापत्रक शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत असून, त्यातच तालुक्यात विविध भागांत बिबट्याचा वावर वाढल्याने रात्रीच्या वेळी शेतात जाणे शेतकऱ्यांसाठी जीवघेणे ठरण्याची भीती निर्माण झाली आहे. शेती पंपासाठी एका आठवड्यात दिवसा सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत आठ तास, तर दुसऱ्या आठवड्यात रात्री ९.४५ ते पहाटे ३.४५ या वेळेत सहा तास वीजपुरवठा केला जात आहे. रात्रीच्या सहा तासांच्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना अंधारात, बिबट्याच्या भीतीच्या सावटाखाली शेतीपंप सुरु करण्यासाठी शेतात जावे लागत आहे. त्यामुळे शेतीपंपांच्या रात्रीच्या वीजपुरवठ्याचे वेळापत्रक तातडीने बदलावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरु लागली आहे.
शिरुर तालुका हा मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून असलेला तालुका आहे. खरीप हंगामातील पिकांसह फळबागा, भाजीपाला, ऊस तसेच इतर पिकांसाठी नियमित पाणी देणे आवश्यक असते. मात्र, वीजपुरवठा शेतकऱ्यांच्या सोयीच्या वेळेत उपलब्ध होत नसल्याने सिंचनाचे नियोजन करणे कठीण झाले आहे.
सध्या दिवसा सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत वीज उपलब्ध होत असल्याने काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळतो. मात्र, रात्री ९.४५ ते पहाटे ३.४५ या वेळेत होणारा वीजपुरवठा शेतकऱ्यांसाठी मोठी समस्या बनला आहे. रात्रीच्या वेळी शेतात मोटार सुरु करण्यासाठी किंवा पाण्याचा प्रवाह तपासण्यासाठी शेतकऱ्यांना घराबाहेर पडावे लागते. अनेक ठिकाणी शेतरस्त्यांवर पुरेसा प्रकाश नसतो. परिसरात बिबट्याचा वावर असल्याने प्रत्येक पाऊल टाकताना शेतकऱ्यांना जीव मुठीत धरावा लागत आहे.
विशेषतः शेतालगत असलेल्या ऊस, झुडपे, गवत आणि दाट पिकांच्या परिसरात बिबट्या लपून बसण्याची शक्यता असल्याने रात्रीच्या वेळी शेतात जाणे धोकादायक ठरु शकते. अनेक शेतकरी एकटेच मोटार सुरु करण्यासाठी जातात. त्यामुळे बिबट्याचा अचानक हल्ला झाल्यास काय होईल, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
‘वीज हवी, पण जीव धोक्यात नको’…
काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, शेतीपंपांना वीज देणे आवश्यक आहे; मात्र वीजपुरवठ्याचे वेळापत्रक ठरविताना शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचाही विचार होणे गरजेचे आहे. बिबट्याच्या वाढत्या वावराच्या पार्श्वभुमीवर रात्रीची वीज शक्यतो टाळून दिवसा अधिक वेळ वीजपुरवठा करण्यात यावा. अथवा रात्रीची वीज अशी वेळेत द्यावी की, शेतकऱ्यांना मध्यरात्री आणि पहाटेच्या अंधारात शेतात जाण्याची वेळ येणार नाही, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा गांभीर्याने विचार करावा…
शेतीपंपाच्या वीज वेळापत्रकाबाबत शेतकऱ्यांनी अनेकदा अडचणी मांडल्या आहेत. मात्र आता प्रश्न केवळ सिंचनाचा राहिलेला नसून शेतकऱ्यांच्या जीवित सुरक्षेशी संबंधित झाला आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे रात्री शेतात जाण्यास शेतकरी धजावत नसले तरी पिकांना पाणी देणेही तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि शेतीपंपांच्या रात्रीच्या वीजपुरवठ्याच्या वेळेत बदल करावा, अशी मागणी होत आहे.
पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सिंचन आवश्यक असले तरी त्यासाठी शेतकऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालणे योग्य नाही. त्यामुळे प्रशासन, वीज वितरण कंपनी आणि संबंधित यंत्रणांनी शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत वीजपुरवठ्याचे वेळापत्रक अधिक शेतकरीपूरक करावे, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.याबाबत जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, शेतीपंपाच्या विजेचे वेळापत्रक हे वरिष्ठ कार्यालयातुनच ठरते आणि संपुर्ण राज्यात ते एकच असते. याबाबत काही ठिकाणी अपवाद असु शकतो. त्यामुळे विजेचे वेळापत्रक बदलणे आमच्या हातात नाही. त्यासाठी आम्ही वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करणार आहोत.
लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…
ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…
चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…
पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…
मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…
पुणे : भाविकांना भीमाशंकर येथे दर्शनासाठी घेऊन आलेल्या २५ वर्षीय तरुण कारचालकाचा अचानक हृदयविकाराचा झटका…