शिक्रापूर (तेजस फडके): सणसवाडी (ता. शिरुर) औद्योगिक वसाहतीमध्ये कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सणसवाडी येथील फोसेको इंडिया लिमिटेड कंपनीमध्ये पल्पर मशीनच्या साफसफाईचे काम करताना मशीनमध्ये अडकून एका परप्रांतीय मजुराला गंभीर दुखापत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
विशेष म्हणजे, संबंधित कामाचा कोणताही अनुभव नसल्याचे सांगूनही कंत्राटदाराने जबरदस्तीने धोकादायक मशीनमध्ये काम करण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप जखमी कामगाराने केला आहे. या अपघातात कामगाराच्या डाव्या हातासह पाय, खुबा आणि गुडघ्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागल्या आहेत.
कोमल सिंग मुरलीधर (वय ५०, मूळ रा. जैसरिकाला, तहसील ओराई, जिल्हा जालौन, उत्तर प्रदेश) असे जखमी कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी कंत्राटदार सुनील मावळे (पूर्ण नाव माहीत नाही, रा. लाखेवाडी, मलठण, ता. शिरूर) आणि फोसेको इंडिया लिमिटेड कंपनीतील एक जबाबदार व्यक्ती यांच्याविरोधात शिक्रापुर पोलिस ठाण्यात कायदेशीर तक्रार करण्यात आली आहे.
मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, कोमल सिंग हे कामाच्या शोधात सणसवाडी येथे आले होते. रोजंदारीवर काम मिळावे यासाठी ते सणसवाडी चौकातील मजूर नाक्यावर उभे राहत होते. दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ते कामाच्या प्रतीक्षेत असताना स्वरा एंटरप्रायजेसचे कंत्राटदार सुनील मावळे यांनी त्यांना फोसेको इंडिया कंपनीमध्ये साफसफाई व हेल्परचे काम असल्याचे सांगून ८०० रुपये रोजंदारीने कामावर नेले. सकाळी नऊ वाजता कंपनीत पोहोचल्यानंतर मात्र त्यांना साफसफाईऐवजी मोठे ब्लेड आणि कटर असलेल्या पल्पर मशीनमध्ये काम करण्यास सांगण्यात आले. या कामाचा कोणताही अनुभव नसल्याचे त्यांनी कंत्राटदाराला स्पष्ट केले होते. तरीही त्यांना मशीनमध्ये उतरुन ब्लेड आणि कटर साफ करण्यास सांगितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
दरम्यान, दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास मशीनचे ब्लेड साफ करत असताना अचानक मशीन सुरु झाली. त्यामुळे कोमल सिंग हे मशीनच्या ब्लेडमध्ये अडकले आणि गंभीर जखमी झाले. त्यांच्या डाव्या हाताला, पायाला, खुब्याला आणि गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर ते बेशुद्ध पडले. कंपनीतील कामगारांनी त्यांना खासगी वाहनातून सणसवाडी येथील भक्ती हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्यांच्या डाव्या पायाच्या घोट्याचे व खुब्याचे ऑपरेशन करण्यात आले. दि. १३ फेब्रुवारी रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळी रुग्णालयाचे बिल कंत्राटदार सुनील मावळे यांनी भरल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णवाहिकेतून मूळ गावी पाठविण्यात आले. मात्र, गावाकडे गेल्यानंतर डाव्या हाताच्या कोपराच्या ऑपरेशनची वेळ आली असता कंत्राटदाराने खर्च देण्याचे आश्वासन पाळले नाही. रुग्णालयाचे बिल भरण्यासाठी संपर्क साधला असता त्यांनी पैसे दिले नसल्याचा आरोप जखमी कामगाराने केला आहे. त्यामुळे अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारांच्या खर्चाची जबाबदारीही स्वतःवर पडल्याने या मजुराची आर्थिक व मानसिक परवड होत आहे.
कामगारांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची…?
या घटनेमुळे सणसवाडी औद्योगिक परिसरातील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. साफसफाईसाठी कामावर घेतलेल्या कामगाराला कोणतेही प्रशिक्षण न देता धोकादायक पल्पर मशीनमध्ये उतरविण्यात आले का…? मशीनची साफसफाई सुरु असताना वीजपुरवठा बंद ठेवण्याची आणि मशीन सुरक्षित करण्याची प्रक्रिया पाळली होती का…? संबंधित कामगाराला आवश्यक सुरक्षा साधने आणि प्रशिक्षण देण्यात आले होते का…? अपघाताच्या वेळी कंपनी प्रशासनाची सुरक्षा यंत्रणा नेमकी काय करत होती…? असे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. केवळ कंत्राटदाराच्या भरवशावर कामगारांना धोकादायक यंत्रांमध्ये कामाला लावले जात असेल, तर औद्योगिक सुरक्षेच्या नियमांचे पालन नेमके कोण करणार…? एखादा कामगार गंभीर जखमी झाल्यानंतर त्याच्या उपचारांची आणि पुढील आयुष्याची जबाबदारी कोण घेणार…?
या प्रकरणात कंत्राटदार सुनील मावळे आणि फोसेको इंडिया लिमिटेड कंपनीतील जबाबदार व्यक्तींच्या भूमिकेची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. संबंधित मशीनची तांत्रिक तपासणी, सुरक्षा उपाययोजनांची पडताळणी आणि कामगाराला योग्य प्रशिक्षण देण्यात आले होते की नाही, याची तपासणी करुन दोषींवर कारवाई करण्याची गरज आहे.
औद्योगिक विकासाच्या झगमगाटात कामगारांचे आयुष्य मात्र असुरक्षित राहणार असेल, तर अशा विकासाचा उपयोग काय…? या घटनेतून उपस्थित झालेल्या प्रश्नांची उत्तरे आता संबंधित कंपनी व्यवस्थापन, कंत्राटदार आणि कामगार सुरक्षा विभागाने देणे आवश्यक आहे.
चाकणसाठी स्वतंत्र औद्योगिक नगरी; फडणवीसांची मोठी घोषणा
रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये ठेकेदारांकडुन कामगारांची होतेय आर्थिक फसवणुक
करडे औद्योगिक वसाहतीत कामाच्या ठेक्यावरुन दोघांना बेदम मारहाण; आठ जणांवर गुन्हा दाखल
पंचतारांकित रांजणगाव औद्योगिक वसाहतीत ठेकेदारांकडुन फेकला जातोय कँटीनचा राडरोडा…
मुंबई : महाराष्ट्रातील सत्ताधारी सरकारच्या कारभारावर आता विरोधकच नव्हे, तर खुद्द सत्ताधारी पक्षातील ज्येष्ठ नेतेही नाराजी…
महिला शेतकऱ्यांची यवतमाळ ते नागपूर भव्य पदयात्रा काढणार; केंद्र-राज्य सरकारच्या शेतकरी मदतीची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची…
मुंबई : झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांमध्ये या आठवड्यात अनेक रंजक, भावनिक आणि नाट्यमय घडामोडी…
महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयांमधील तब्बल ३४ हजार कर्मचारी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी संपावर जाण्याची वेळ येणे, ही…
चालणे, योगासन करणे आणि जास्त हालचालींचे बहुतेक प्रकार शरीराला ग्लुकोजचे चांगले नियमन करण्यास मदत करतात.…
सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात आपण आरोग्याकडे आणि आहाराकडे दुर्लक्ष करतो, त्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या वाढताना दिसत…