शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यात सध्या चर्चेत असलेल्या कथित ‘सुलभ’ भिशी घोटाळ्याने दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण केले असून या प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. नागरिकांकडून तक्रार अर्ज दाखल होऊनही अद्याप गुन्हा नोंदवला गेलेला नसल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी निष्पक्षपणे होणार का? असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक आणि गुंतवणूकदारांकडून उपस्थित केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेने “सुलभ भिशी”च्या नावाखाली अनेक वर्षांपासून भिशी चालवत असल्याची चर्चा आहे. सुरुवातीच्या काळात लहान रकमा घेऊन वेळेवर परतावा देत विश्वास संपादन करण्यात या महिलेला यश आले. त्यामुळे अनेकांनी तिला विश्वासाने पैसे देण्यास सुरुवात केली. काहींना वेळेवर पैसे मिळाल्यामुळे तिच्यावर विश्वास वाढत गेला आणि हळूहळू भिशीचे व्यवहार लाखोंच्या घरातून कोट्यवधी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे संबंधित महिलेची काही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी असलेली जवळीक. कारेगाव पोलीस ठाण्यात तिची सततची ये-जा आणि पोलिसांशी असलेले संबंध यामुळे अनेकांना ती “विश्वासार्ह” असल्याची प्रतिमा निर्माण झाली होती. याच विश्वासाच्या जोरावर अनेक नागरिकांनी तसेच काही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही या भिशीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याची चर्चा सध्या जोरात आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कारेगाव पोलीस ठाण्यातील जवळपास ७० टक्के अधिकारी व कर्मचारी या भिशीत थेट किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी असल्याची चर्चा आहे. काहींनी स्वतःच्या बचतीतून तर काहींनी कर्ज काढून या महिलेवर विश्वास ठेवून पैसे दिल्याचे बोलले जात आहे. इतकेच नव्हे तर काही अधिकाऱ्यांनी मोठ्या रकमा गुंतवल्याचीही चर्चा सुरू असून एका महिला अधिकाऱ्यांनी तब्बल ५० लाख रुपये दिल्याचे बोलले जात आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
यामुळे आता आणखी एक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. या गुंतवणुकीसाठी एवढ्या मोठ्या रकमा नेमक्या कुठून आल्या? काहींनी कर्ज काढून पैसे दिल्याचे सांगितले जात असले तरी काही पोलिसांनी “काळा पैसा” गुंतवला असल्याच्या चर्चाही राजकीय व सामाजिक वर्तुळात सुरू आहेत. त्यामुळे या प्रकरणात केवळ फसवणूकच नव्हे तर आर्थिक व्यवहारांचीही सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
दरम्यान, आतापर्यंत सुमारे ३० नागरिकांनी संबंधित महिलेविरोधात कारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केल्याची माहिती मिळत आहे. या तक्रारींमध्ये लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, तक्रारी दाखल होऊनही अद्याप गुन्हा नोंदवण्यात आलेला नसल्याने तक्रारदारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “तक्रार दिल्यानंतरही कारवाई होत नसेल तर न्याय कुणाकडे मागायचा?” असा सवाल काही गुंतवणूकदारांनी उपस्थित केला आहे.
याच पार्श्वभूमीवर काही तक्रारदारांनी या प्रकरणाची चौकशी जिल्हा पोलीस अधीक्षक स्तरावरून करण्याची मागणी केली आहे. स्थानिक पोलीस ठाण्याऐवजी बाहेरील स्वतंत्र अधिकाऱ्याकडे तपास सोपवण्यात यावा, अशीही मागणी पुढे येत आहे. कारण या प्रकरणात काही पोलिसांचेच नाव चर्चेत असल्याने निष्पक्ष चौकशीसाठी स्वतंत्र तपास यंत्रणा आवश्यक असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
फसवणुकीची नेमकी रक्कम किती आहे, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसली तरी काही सूत्रांच्या मते हा आकडा ३० कोटी रुपयांच्या आसपास असू शकतो, अशी चर्चा रंगत आहे. काही गुंतवणूकदारांनी रोख स्वरूपात तर काहींनी बँक व्यवहारातून पैसे दिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या व्यवहारांचे आर्थिक तपशील तपासणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
या प्रकरणात आणखी किती लोकांची नावे समोर येणार? गुंतवणूकदारांची एकूण संख्या किती आहे? आणि या कथित भिशी घोटाळ्याचे जाळे नेमके किती मोठे आहे? याबाबत अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करून सत्य समोर आणण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन अनधिकृत भिशी चालवणाऱ्या महिलेबरोबरच या व्यवहारात सहभागी असलेल्या सर्व संबंधितांची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या तपासातूनच या प्रकरणातील खरी रक्कम, गुंतवणूकदारांची संख्या आणि संपूर्ण घोटाळ्याचा आवाका स्पष्ट होणार आहे. या प्रकरणातील आणखी धक्कादायक तपशील, गुंतवणूकदारांची खरी संख्या आणि या कथित भिशी घोटाळ्याचे जाळे नेमके किती मोठे आहे, याचा उलगडा पुढील भागात…
(क्रमशः)
भिशीच्या नावाखाली आर्थिक फसवणूक केल्याबाबत अनेक नागरिकांचे तक्रारी अर्ज प्राप्त झाले असून, याबाबत सखोल चौकशी करून लवकरच गुन्हा दाखल केला जाईल.
– प्रशांत ढोले, पोलीस उपविभागीय अधिकारी शिरूर
शिरूर! सुलभ भिशीच्या नावाखाली पोलीस व नागरिकांना तब्बल ३० कोटींचा गंडा?
शिरूर तालुक्यात भिसीच्या नावाखाली अनेक पोलिसांनाच गंडा; लाखो रुपयांचा व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात
शिरूर तालुक्यात हायटेक ‘गर्भलिंग निदान’ रॅकेट; नामांकित डॉक्टर सामील…?
IVF केंद्रांवर लगाम घालण्यासाठी जिल्हानिहाय समितीची मागणी; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई: श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसराचा धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या शाश्वत विकास साधण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या ‘भीमाशंकर हेरिटेज…
मुंबई: भारत महासत्ता होण्याच्या स्वप्नाचे ढोल मोठ्या आवाजात वाजत आहेत. उद्योग, गुंतवणूक, स्टार्टअप, विकास... या…
मुंबई: देशासमोर गंभीर आर्थिक व राजकीय संकट उभे असून त्यातून बाहेर काढण्याची क्षमता मोदी सरकारमध्ये…
जेजुरी: जेजुरी देवस्थानच्या प्रगती व सर्वांगीण विकासासाठी राज्य स्तरावर अनेक बैठका घेण्यात आल्या असून, श्रद्धेला…
शिंदोडी (तेजस फडके) शिंदोडी (ता.शिरुर) येथे 11 के व्ही ए विद्युत तार अचानक तुटून ऊसाच्या…
पाबळ (सुनील जिते) : शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई परिसरातील गारकोलवाडी हे गाव अत्यंत दुष्काळी व…