आरोग्य

पचन तंत्राच्या कोणत्या चार मार्गांत प्रामुख्याने पचनक्रिया होते…

मुख:- पचन तंत्राचे मुख हे सुरुवातीचे द्वार असून त्यात अन्नाचे चर्वण प्रामुख्याने होते. त्याशिवाय लाला ग्रंथींचा स्राव (लाल) येथेच मिसळत असल्यामुळे अन्नाचा गिळण्यास सुलभ असा घास बनतो. लाळेत जी एंझाइमे असतात ती अन्नातील कार्बोहायड्रेट घटकांच्या विघटनास सुरुवात करतात. अन्नातील पॉलिसॅकॅराइडांपासून डेक्स्ट्रीन व माल्टोज ही मोनोसॅकॅराइडे या एंझाइमांच्या क्रियेमुळे तयार होतात . सेवन केलेल्या मिश्र अन्नातील एकूण कार्बोहायड्रेटांपैकी ४०% भाग जेवणानंतर एका तासात अपघटित होतो. लाळमिश्रित गिळलेला घास जठरात उतरल्यानंतर घासात तेथील अम्ल पूर्णपणे भिनेपर्यंत लाळेचे कार्य तेथेही चालूच असते.

जठर:- हा पचन तंत्राचा सर्वांत अधिक फुगीर भाग असून त्याची धारणक्षमता सु. ९५० घ. सेंमी. असते. त्याचा सर्वसाधारण आकार इंग्रजी J अक्षरासारखा असून तो व्यक्तिशः निरनिराळा व त्यामधील साठ्याप्रमाणे बदलतो. जठरभित्ती अरेखित (ज्यावर उभ्या रेषा नाहीत अशा अनैच्छिक) स्नायूंच्या उभ्या गोलाकार आणि तिरप्या रचलेल्या स्नायुकोशिकांच्या बनलेल्या असल्यामुळे त्यांची हालचाल अन्न घुसळून घुसळून जठररसात मिसळविते. जठराच्या आतील भागाचे अस्तर जाडसर श्लेष्मकरेचे बनलेले असते. जठर जेव्हा रिकामे असते तेव्हा या श्लेष्मकलास्तरावर अनेक छोट्या छोट्या वळ्या पडलेल्या असतात. वळ्यांच्या उंच भागावर लहान लहान खड्डे असतात व त्यांना जठर खळगे म्हणतात. या प्रत्येक खळग्यात एक जठर ग्रंथीचे तोंड असते. जठराच्या निरनिराळ्या भागांत जठर ग्रंथी निरनिराळ्या प्रकारच्या असतात.

अम्लस्रावीएंझाइमजनक आणि श्लेष्मास्रावी हायड्रोक्लोरिक अम्ल, पेप्सीन आणि श्लेष्मा या त्यांच्या स्राव मिश्रणापासून जठररस तयार होतो. यांशिवाय जठररसात इतरही काही पदार्थ असतात. हायड्रोक्लेरिक अम्ल पेप्सिनाच्या प्रथिनावरील योग्य क्रियेस मदत करते. जठर-लायपेज नावाचे आणखी एक एंझाइम लोणी व अंड्याच्या पीतकातिल वसा भागाच्या पचनास मदत करते. जठररसाचे उत्पादन अहोरात्र चालूच असते व चोवीस तासांत २ ते ३ लि. जठररस तयार होतो. या उत्पादनावर तंत्रिकांचे (मज्जांचे) व रासायनिक प्रक्रियांचे नियंत्रण असते.

अन्नसेवन करावयास लागताच जठररसाचे उत्पादन वाढते. उत्पादनाचे तीन टप्पे असून त्यांना अनुक्रमे मस्तिष्क टप्पा, जठर टप्पा आणि आंत्र टप्पा अशी नावे आहेत. अन्नाचे दर्शन, अन्नाचा सुवास आणि आवडत्या अन्नपदार्थांचा विचार या गोष्टी मेंदूवरील प्रतिक्षेपी क्रियांपासून जठररस उत्पादन वाढवतात व म्हणून या टप्प्याला मस्तिष्क टप्पा म्हणतात. या उत्पादनावर राग, भीती, काळजी आदी भावना परिणाम करतात. अन्नातील काही प्रकार जठरनिर्गमकोटर भागातील जठर ग्रंथींना चेतावणी देऊन गॅस्ट्रिन नावाचे हॉर्मोन उत्पन्न करतात. हे हॉर्मोन रक्तातून जठराच्या इतर भागातील जठर ग्रंथींना पोहोचताच त्यांचा स्राव वाढतो. या दुसऱ्या टप्प्याला जठर टप्पा म्हणतात. जठरातील अर्धवट पचलेली प्रथिने तेथी ल श्लेष्मकलास्तरातील ग्रंथीपासून आंत्रगॅस्ट्रिन नावाचे हॉर्मोन तयार करतात. हे हॉर्मोन रक्तप्रवाहातून जठर ग्रंथींपर्यंत पोहोचून त्यांचे उत्पादन वाढविते. या तिसऱ्या टप्प्याला आंत्र टप्पा म्हणतात.

जठरातील पचनक्रिया चालू असताना अन्नापासून जो सारखी दृढता असलेला अर्धद्रव पदार्थ तयार होतो, त्याला‘आमरस (काइम) म्हणतात. हा आमरस ग्रहणीत जठरद्वारा कपाटातून (झडपेतून) थोड्या थोड्या प्रमाणात सोडला जातो. एका वेळी सेवन केलेल्या अन्नाचे पचन करून पुन्हा पूर्ण रिकामे होण्यास जठरास सर्वसाधारणपणे सहा तास लागतात. अन्नप्रकार व भावनिक परिस्थिती यांचा या कालावर परिणाम होतो. कार्बोहायड्रेटे प्रथिनांपेक्षा अधिक लवकर ग्रहणीत उतरतात, तर वसायुक्त पदार्थांना सर्वांत जास्त वेळ लागतो. भीती, राग यांसारख्या भावना कधीकधी हा काल चोवीस तासांपर्यंत वाढवितात.

लघ्वांत्र:- लघ्वांत्रात सर्वांत महत्त्वाच्या पचनक्रिया होतात व तेथेच बहुतेक सर्व अन्नाचे अभिशोषणाही होते. जठरातून आमरस जसजसा खाली ग्रहणी व लघ्वांत्रात उतरतो तसतसे त्याचे अग्निपिंडरस, पित्त आणि आंत्ररस यांच्याबरोबर मिश्रण बनते. अग्निपिंडरसात ट्रिप्सीन, कायमोट्रिप्सीन आणि कार्‌बॉक्सिपेप्टिडेज ही प्रथिन-विच्छेदक ऐंझाइमे असतात. यांशिवाय त्यात अग्निपिंड-अमिलेज नावाचे लाळेतील टायलीन एंझाइमासारखी क्रियाशीलता असणारे कार्बोहायड्रेटांचे जलीय विच्छेदनाने (पाण्याच्या विक्रियेने रेणूचे तुकडे पाडण्याच्या क्रियेने) माल्टोज बनविणारे एंझाइमही असते व ते अधिक क्रियाशील असते. माल्टेज नावाचे आणखी एक एंझाइम माल्टोजाचे ग्लुकोजात रूपांतर करते.

आंत्ररसात प्रथिने, कार्बोहायड्रेटे आणि वसा या तिन्ही प्रमुख अन्नघटकांवर विच्छेदक क्रिया करणारी असतात. यांशिवाय एंटरोकायनेज नावाचे त्यामधील एंझाइम अग्निपिंडरसातील निष्क्रिय ट्रिप्सिनोजेनापासून क्रियाशील ट्रिप्सीन बनविण्याचेच कार्य करते. आंत्ररसाचे उत्पादन आंत्रभित्तीवरील आमरसाचा यांत्रिक परिणाम तसेच त्यामघील काही रासायनिक पदार्थ यांवर अवलंबून असते. आंत्रश्लेष्मकलेतून एंटरोक्रिनीन नावाचे हॉर्मोन स्रवत असावे व तेही या उत्पादनास चेतावणी देत असावे. ग्रहणीतील आमरसातच यकृतात तयार होणारे पित्त येऊन मिळते. वसा-विच्छेदक एंझाइमांच्या क्रियेकरिता पित्त हा एक अत्यावश्यक पदार्थ असतो. लघ्वांत्राची अवकाशिका (वेज) आंत्रमार्गाच्या इतर भागापेक्षा लहान असते म्हणून त्यास लहान आतडे म्हटले असले, तरी ते सु. ६.६ मी. लांब असते. त्याच्या श्लेष्मकलास्तरावर असंख्य वळ्या पडलेल्या असतात आणि त्यामुळे त्याचा अभिशोषणक्षम पृष्ठभाग सु. ९.३ चौ. मी. एवढा बनतो. लघ्वांत्राची वेटोळी क्रमसंकोचामुळे सतत चालू असते.

बृहदांत्र:- लघ्वांत्रातून अन्न बृहदांत्राच्या सुरुवातीच्या ज्या भागात शिरते, त्याला उंडुक म्हणतात. ही दोन्ही म्हणचे लघ्वांत्र् व उंडुक जेथे जुळतात त्या ठिकाणी झडपेसारखी स्नायुरचना असते व तिला शेषांत्रउंडुक झडप म्हणतात. या झडपेमुळे एकदा उंडुकात उतरलेले अन्न परत लघ्वांत्रात जाऊ शकत नाही सेवन केलेल्या अन्नाचा जो भाग उंडुकात येतो, त्यावरील पचनक्रिया पूर्ण झालेल्या असतात. बृहदांत्राच्या श्लेष्मास्तरातील ग्रंथीचा स्राव श्लेष्माच असतो आणि त्यात एंझाइमे वगैरे पदार्थ नसतात. हा स्त्राव काहीसा घट्ट असतो व तो त्याच्या मिश्रणामुळे उरलेले अन्न बुळबुळीत करतो. वा स्रावामुळे श्लेष्मास्तरास इजा होण्यापासून संरक्षणही मिळते. बृहदांत्रात आलेले बहुतेक सर्वच अन्नभाग त्याज्य असतात. तरीदेखील त्यांमधील पुष्कळसे पाणी व लवणे बृहदांत्राच्या सुरुवातीच्या भागातच अभिशोषिली जातात. या कार्याकरिता योग्य अशीच बृहदांत्राची रचना असते. त्याचा उजवा भाग अभिशोषणास मदत करणारा असून त्यातून सोडियमाचे पुनरभिशोषण होते, तर त्याच्या पोकळीत पोटॅशियम व बायकार्बोनेटे स्रवली जातात. सु. ४००-५०० मिलि. पाणी तेथे अभिशोषिले जाते. बृहदांत्राचे हे कार्य फार महत्त्वाचे असते, कारण त्यामुळे शरीराचे जलसंतुलन योग्य ठेवले जाते. बृहदांत्राची अभिशोषणक्षमता थेट गुदांत्रापर्यंत असते व म्हणून या मार्गाने म्हणचे गुदद्वारातून बस्तीद्वारे लवणयुक्त द्रव्ये, औषधे आणि ग्लुकोजही देता येते. बृहदांत्रात आलेल्या अन्नातील टाकाऊ पदार्थ जवळजवळ ३६ तास त्यात राहतात व त्या भागात नेहमी असणाऱ्या सूक्ष्मजंतूच्या क्रियेमुळे हायड्रोजन, कार्बन डाय-ऑक्साइड आणि मिथेन हे वायू तयार होतात. शेवटी मलोत्सर्जनातून टाकाऊ पदार्थांपासून मल बाहेर टाकला जातो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नारी शक्ती वंदन की सत्ता शक्ती वंदन? महिला आरक्षणावरून भाजपवर टीका

मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…

1 तास ago

मुंबई युवक काँग्रेसचा SIR प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न; ‘गिग वर्कर्स न्याय अभियान’ पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…

1 तास ago

मोदींच्या भाषणावर वडेट्टीवारांचा हल्लाबोल; महिला आरक्षणावर भाजपवर ‘इव्हेंटबाजी’चा आरोप

नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…

2 तास ago

महिला आरक्षण विधेयकावरून देशात राजकीय गदारोळ

मुंबई: महिला आरक्षण विधेयकाच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकारण तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची जोरदार मालिका…

2 तास ago

वाघाळे येथे अक्षय तृतीयेनिमित्त कृषी पूजनाने संस्कृतीचा जागर; बैलगाडीची भव्य शोभायात्रा…

शिरूर : शिरूर तालुक्यातील वाघाळे येथे १९ तारखेला पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या प्रेरणेतून कार्यरत स्वाध्याय…

4 तास ago

वाघोलीत घडली हृदयद्रावक घटना; उच्चशिक्षित महिलेने संपवलं आयुष्य…

वाघोली : वाघोलीतील 'रविनंदा कॉयलाईट' सोसायटीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. माहेरहून १० लाख रुपये…

5 तास ago