महाराष्ट्र

साताऱ्याच्या विकासाला वेग देत पर्यटन-शेतीच्या बळावर आर्थिक क्रांती घडवणार

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार या त्रिसूत्रीवर आधारित सर्वसमावेशक विकासाचा ठोस रोडमॅप मांडला असून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी पर्यटनाला चालना देत शेतकऱ्यांना बळ देणे आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणे हे सरकारचे धोरण असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

‘कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2026’ चा भव्य सांगता सोहळा विकासकामांच्या उद्घाटन, भूमिपूजन आणि सांस्कृतिक जल्लोषात दिमाखात पार पडला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संग्रामपूर व पाटण मतदारसंघातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे उद्घाटन झाल्याने जिल्ह्याच्या विकासाचा नवा अध्याय सुरू झाला.

यावेळी कोयना नदीवरील सांगवड येथील मोठ्या पुलाचे, दौलत नगर येथील शिवदौलत स्टेडियम आणि महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकातील संगीत कारंजे आणि लेझर शोचे, तसेच स्वर्गीय शिवाजीराव देसाई स्मृती भवनाचे उद्घाटन संपन्न झाले. तसेच पाथर्डी येथील जलपर्यटन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, प्रभारी पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, पर्यटन विभागाचे संचालक बी. एन. पाटील,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, लोकनेते बाळासाहेब सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोयना, सह्याद्री पर्वतरांग, कास पठार, महाबळेश्वर-पाचगणी या नैसर्गिक संपत्तीमुळे साताऱ्यात पर्यटनाची प्रचंड क्षमता असून पर्यटनातून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यटनामुळे स्थानिक युवकांना रोजगार, शेतमालाला बाजारपेठ आणि महिला बचत गटांना उत्पन्न मिळणार असून “पर्यटन म्हणजे थेट आर्थिक क्रांती” असे त्यांनी स्पष्ट केले. नवीन महाबळेश्वर हा साडेपाचशेहून अधिक गावांचा पर्यावरणपूरक विकास करणारा ‘नवीन महाबळेश्वर’ प्रकल्प हा महत्त्वाचा प्रकल्प ठरणार असून या माध्यमातून स्थानिकांचे जीवनमान उंचावणार, रोजगार वाढणार आणि आर्थिक प्रगती साधली जाणार आहे. याचबरोबर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडणारे पूल, 105 गावांना जोडणारी कनेक्टिव्हिटी, घाट आणि पर्यटन सुविधा यामुळे विकासाला वेग मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवत त्यांनी स्पष्टपणे जाहीर केले की “शेतकऱ्याची एकही इंच जमीन सरकार घेणार नाही” तसेच शेतकऱ्यांनी आपली जमीन विकू नये कारण भविष्यात तिचे सोनं होणार आहे. “महाराष्ट्राच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकऱ्याचा आहे” असे सांगत त्यांनी शेती आणि पर्यटन यांच्या संगमातून दुहेरी उत्पन्नाचा मार्ग दाखवला.

क्लस्टर शेती, कॉफी, सफरचंद, आंबा, चंदन यांसारख्या पिकांचे प्रयोग, तसेच 8000 एकरवर बांबू लागवड यांचा उल्लेख करत त्यांनी शेतीतील नावीन्यपूर्ण प्रयोगांना चालना दिली. बांबू उद्योग मोठा आर्थिक स्रोत ठरू शकतो असे सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे या क्षेत्राला चालना मिळाल्याचे नमूद केले. तसेच AI तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती अधिक उत्पादक करण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार देण्यावर सरकारचा भर असून होम स्टे, अ‍ॅग्रो टुरिझम, बेड अँड ब्रेकफास्ट यांसारख्या योजनांद्वारे गावातच रोजगार उपलब्ध होत आहे. महिला बचत गटांचे स्टॉल, हस्तकला प्रदर्शन यामुळे महिलांनाही आर्थिक संधी निर्माण होत आहेत.

कोयना महोत्सवात यंदा लावणी, भजन, पोवाडे, कृषी व पशुपक्षी प्रदर्शन, तसेच आधुनिक AI आधारित कृषी प्रदर्शन अशा विविध उपक्रमांमुळे परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम दिसून आला. जिल्ह्यात आता आरोग्य क्षेत्रात नॅचरोपॅथी सेंटर आणि हेल्थ अँड वेलनेस सेंटर उभारण्यात येत असून पर्यटनासोबत आरोग्य सुविधांनाही चालना दिली जात आहे. याचबरोबर परवडणारी घरे आणि स्थानिकांसाठी गृहनिर्माण योजना राबवून ग्रामीण भागात आधुनिक जीवनमान निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

आपत्तीच्या काळातही निर्णयक्षम नेतृत्व दाखवत एमएमआरडीएकडून 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घरबांधणी केली असल्याचे त्यांनी सांगितले आणि “माणूस महत्त्वाचा” हा संदेश दिला. विकासाचे आकडे मांडताना त्यांनी 8000 एकर बांबू लागवड, 175 पेक्षा अधिक सिंचन प्रकल्प, 15 लाखांवरून 37 लाखांपर्यंत वाढलेले पर्यटक, तसेच 450 कोटी रुपयांची मदत यांचा उल्लेख करत राज्यात वेगाने विकास होत असल्याचे सांगितले. “मी आरोपांना उत्तर देत नाही, माझं कामच उत्तर देतं” आणि “एकदा शब्द दिला की तो पूर्ण करतो” असे ठाम विधान करत त्यांनी आपल्या नेतृत्वाची भूमिका स्पष्ट केली.

शेवटी “माझ्यासाठी सर्वात मोठं पद म्हणजे लाडक्या बहिणींनी दिलेली ‘लाडक्या भावाची’ ओळख” असे सांगत त्यांनी जनतेशी असलेले नाते अधोरेखित केले. कोयना दौलत डोंगरी महोत्सव हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नसून पर्यटन, शेती, रोजगार आणि पायाभूत सुविधांचा संगम असलेला सर्वांगीण विकासाचा मॉडेल असल्याचे स्पष्ट करत साताऱ्याला पर्यटन हब बनवण्याचा निर्धार शिंदे यांनी यावेळी पुन्हा एकदा व्यक्त केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणातील वाळूमाफियांचे इंस्टाग्राम स्टेटसद्वारे प्रशासनाला खुले आव्हान; पुणे जिल्हाधिकाऱ्यांसह शिरूरच्या यंत्रणेचे नेमके चाललेय तरी काय?

शिरूर (तेजस फडके) : शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जीवनदायिनी ठरलेल्या घोड धरणातील वाळू उपशाचा…

14 तास ago

शिरुर तालुक्यात किरकोळ कारणांवरुन मारहाणीच्या दोन वेगवेगळ्या घटना; १६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात किरकोळ कारणांवरुन झालेल्या वादाचे रुपांतर थेट मारहाणीत होत असल्याच्या दोन…

17 तास ago

शिक्रापूर पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी झाली दूर…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : दिवाळी म्हटले की खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी आणि नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक…

6 दिवस ago

शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र चोरट्यांच्या निशाण्यावर; रोहित्र फोडले अन्…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…

1 आठवडा ago

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सत्तेचा खेळ? संचालकांना परराज्यात नेल्याने वडेट्टीवार संतप्त

१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…

1 आठवडा ago

संसार दोघांचा, त्याग मात्र एकटीचाच का? कुंकवाचा मान राखता, मग स्त्रीच्या भावनांचा सन्मान कुठे

लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…

1 आठवडा ago