महाराष्ट्र

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ या प्रतिष्ठेच्या सन्मानाने गौरविण्यात आले. विशेष म्हणजे, पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भाषणाची सुरुवात शिंदे यांनी ‘नमस्कार-जय महाराष्ट्र’ अशी मराठीतून केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाची वाटचाल, सर्वसामान्यांसाठी राबविलेल्या योजना आणि भारत-ब्रिटन संबंधांवर भाष्य केले.

यूके एशियन बिझनेस कौन्सिल आणि ‘कॅनव्हास फॉर केअर क्रिएटिव्ह आर्ट कॅम्पस’ यांच्या संयुक्त विद्यमाने हाऊस ऑफ लॉर्ड्स येथे हा सोहळा पार पडला. उत्तर आयर्लंडच्या माजी फर्स्ट मिनिस्टर बॅरोनेस आर्लेन फॉस्टर, यूके एशियन बिझनेस कौन्सिलचे चेअरमन अँड्र्यू ग्रोकॉक, उपाध्यक्ष सुदीप सकाळे यांच्यासह ब्रिटनचे वरिष्ठ मंत्री, महापौर, विविध देशांचे राजदूत, संसद सदस्य, जागतिक उद्योजक आणि कॉमनवेल्थ देशांतील मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून नागरिक-केंद्री, पारदर्शक आणि नाविन्यपूर्ण प्रशासनासाठी शिंदे यांना हा सन्मान देण्यात आला. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, नागरिकांना शासकीय सेवा थेट घरापर्यंत पोहोचविणारा ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम यांसह सामाजिक आणि लोककल्याणकारी योजनांचा विशेष उल्लेख त्यांच्या मानपत्रात करण्यात आला.

हा पुरस्कार महाराष्ट्रातील जनतेच्या कष्टांचा गौरव’

छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची संकल्पना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक न्यायाचा विचार आणि सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवणारे प्रशासन या त्रिसूत्रीवर महाराष्ट्राची विकासयात्रा उभी असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

हा पुरस्कार केवळ माझा वैयक्तिक सन्मान नसून महाराष्ट्रातील जनतेच्या कष्टांचा, त्यांच्या आकांक्षांचा आणि राज्याच्या विकासाच्या वाटचालीचा गौरव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी त्यांनी कवी सुरेश भट यांच्या ‘लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी…’ या प्रसिद्ध ओळींचा उल्लेख करत मातृभाषेतून महाराष्ट्राची ओळख जगासमोर मांडली.

आई आणि पत्नीच्या कष्टांनी घडली विचारसरणी

आपल्या संघर्षमय प्रवासाचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की, आपला जन्म कोणत्याही सुखवस्तू किंवा मोठ्या घराण्यात झालेला नाही. लहानशा शेतकरी कुटुंबातून आपली सुरुवात झाली. आई आणि पत्नीला दिवसरात्र कोणतीही तक्रार न करता कष्ट करताना पाहिले. त्यामुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यातील अश्रू आणि त्यांच्या अडचणी आपल्याला जवळून माहिती आहेत.याच अनुभवातून सर्वसामान्यांसाठी काम करण्याची विचारसरणी घडल्याचे त्यांनी सांगितले.

‘मला माझी एक बहीण आहे; पण लाडकी बहीण योजनेमुळे मला करोडो बहिणी मिळाल्या आहेत,’ असे शिंदे यांनी सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळत असून त्याचा सकारात्मक परिणाम कुटुंबाचे आरोग्य, पोषण आणि मुलांच्या शिक्षणावर होत असल्याचे त्यांनी सांगितले.

शासन आपल्या दारी’चा लंडनमध्येही उल्लेख

‘शासन आपल्या दारी’च्या माध्यमातून राज्यातील गावागावांत सरकारी सेवा पोहोचविण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. या उपक्रमातून पाच कोटींहून अधिक नागरिकांना विविध कागदपत्रे, प्रमाणपत्रे आणि कल्याणकारी योजनांचे लाभ मिळाल्याचा दावा त्यांनी केला.दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग, ट्रान्सजेंडर धोरण, मुलींच्या उच्च शिक्षणासाठी मदत आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून गरजू नागरिकांना मदत अशा उपक्रमांचाही त्यांनी उल्लेख केला.

विकास म्हणजे केवळ रस्ते, पूल किंवा मेट्रो नव्हे’

विकासाची व्याख्या स्पष्ट करताना शिंदे म्हणाले की, विकास म्हणजे केवळ रस्ते, पूल, मेट्रो किंवा उंच इमारती नव्हेत. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत संधी पोहोचवणे आणि प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगता येणे म्हणजे खरा विकास आहे.याच उद्देशाने महिला, मुली, दिव्यांग, ट्रान्सजेंडर आणि गरजू नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

‘महाराष्ट्र भारताचे औद्योगिक आणि आर्थिक पॉवरहाऊस’

महाराष्ट्र हे भारताचे औद्योगिक आणि आर्थिक पॉवरहाऊस असल्याचे सांगताना शिंदे यांनी राज्याचा भारताच्या जीडीपीमध्ये सुमारे १४ टक्के वाटा असल्याचे नमूद केले. देशातील थेट परकीय गुंतवणुकीपैकी ३० टक्क्यांहून अधिक गुंतवणूक महाराष्ट्र आकर्षित करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

वाढवण बंदर, समृद्धी महामार्ग, अटल कोस्टल रोड आणि मुंबई कोस्टल रोड यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा उल्लेख करत महाराष्ट्र वेगाने पुढे जात असल्याचे त्यांनी सांगितले. २०३० पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरची करण्याचे लक्ष्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ब्रिटिश उद्योगांना महाराष्ट्रात गुंतवणुकीचे निमंत्रण

मुंबई आणि लंडन ही दोन्ही महत्त्वाची वित्तीय केंद्रे असल्याचे सांगत शिंदे यांनी ब्रिटिश उद्योगांना महाराष्ट्रात गुंतवणुकीचे निमंत्रण दिले. फिनटेक, ग्रीन एनर्जी, ग्रीन हायड्रोजन, सस्टेनेबल इन्फ्रास्ट्रक्चर, डीप-टेक, शिक्षण आणि कौशल्य विकास या क्षेत्रांत महाराष्ट्र आणि ब्रिटनमध्ये सहकार्याची मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले.

‘मोदी भारताचे व्हिजनरी आणि डायनॅमिक लीडर’

भारताच्या विकासाचा उल्लेख करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचेही शिंदे यांनी कौतुक केले. नरेंद्र मोदी हे भारताचे ‘व्हिजनरी आणि डायनॅमिक लीडर’ असल्याचे सांगत त्यांच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक नेतृत्वाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.मोदी यांना जगातील ३६ हून अधिक देशांनी सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी सन्मानित केले असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

‘भारत-ब्रिटन संबंध नव्या सुवर्णयुगात’

भारत आणि ब्रिटनचे संबंध नव्या सुवर्णयुगात प्रवेश करीत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी मांडलेल्या ‘वसुधैव कुटुंबकम्’च्या विचारधारेचा उल्लेख करत दोन्ही देशांतील संबंध अधिक मजबूत होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

ब्रिटनमध्ये राहणारे ७० हजारांहून अधिक महाराष्ट्रीय नागरिक हे भारत-ब्रिटन संबंधांमधील महत्त्वाचा मानवी दुवा असल्याचेही त्यांनी सांगितले.‘मी मुख्यमंत्री नाही, मी एक सामान्य माणूस आहे’, हा मुख्यमंत्रीपदाच्या काळातील दृष्टिकोन आजही कायम असल्याचे सांगत सर्वसामान्यांसाठी काम करण्याची बांधिलकी शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

8 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

8 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

8 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

8 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

12 तास ago

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

1 दिवस ago