मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेनेच्या पुढाकाराने ‘उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे विद्यार्थी सहाय्यता आणि समन्वय कक्ष’ तसेच ‘मिशन खाकी – पोलीस भरती योद्धा सहाय्यता अभियान’ सुरू करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात त्यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ झाला.
पोलीस भरतीची तयारी करताना मैदान, सरावासाठी आवश्यक सुविधा, साहित्य, मार्गदर्शन, परीक्षा प्रक्रियेची माहिती किंवा अन्य कोणत्याही अडचणींचा सामना करणाऱ्या उमेदवारांना आता Google Formच्या माध्यमातून थेट आपल्या समस्या मांडता येणार आहेत. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना या सुविधेची लिंक उपलब्ध करून देण्यात आली.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित तरुण-तरुणींशी संवाद साधला. “हा केवळ एका अभियानाचा शुभारंभ नसून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तरुणांच्या भविष्याला आधार देणारा महत्त्वाचा टप्पा आहे. १८ लाखांपेक्षा जास्त उमेदवार पोलीस भरतीसाठी जीवाचे रान करत आहेत. ग्रामीण भागातील मुले पहाटे जग झोपलेले असताना मैदानावर घाम गाळतात. या तरुणांच्या खांद्यावर अभिमानाने हात ठेवणे आणि त्यांच्या अडचणी दूर करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे,” असे शिंदे यांनी सांगितले.
स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी तरुणांचा टक्का वाढवण्याचा प्रयत्न
स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांनी स्पर्धा परीक्षांचे महत्त्व ओळखून ठाण्यात चिंतामणराव देशमुख स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केले होते. या केंद्रातून अनेक अधिकारी घडले. त्याच धर्तीवर स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी तरुणांचा सहभाग आणि यशाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या शिक्षणातील प्रवासाचा उल्लेख करत त्यांनी तरुणांना नवीन गोष्टी शिकण्याची भूक कायम ठेवण्याचे आवाहन केले. “जोपर्यंत आपल्यात नवीन काहीतरी शिकण्याची भूक आहे, तोपर्यंत आपल्याला यशस्वी होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आंदोलनाचे झेंडे नव्हे, रोजगाराच्या संधी द्यायच्या
“शिवसेना २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण मनात ठेवून काम करणारी संघटना आहे. तरुणांच्या हातात आंदोलनाचे झेंडे देण्याऐवजी त्यांच्या हाताला रोजगाराच्या संधी देणे ही आमची भूमिका आहे,” असेही शिंदे म्हणाले.
विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे मेहनत, शिस्त आणि सातत्य कायम ठेवावे. शिवसेना आणि सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या युवक-युवतींना त्यांनी शुभेच्छाही दिल्या.
मैदानापासून निवास-भोजनापर्यंत मदत
‘मिशन खाकी’च्या माध्यमातून पोलीस भरतीच्या तयारीतील उमेदवारांना विविध प्रकारची मदत उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सरावासाठी मैदान उपलब्ध नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी पालिका आणि नगरपालिकांच्या माध्यमातून मैदाने दुरुस्त करून dedicated slots उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याशिवाय रनिंग शूज, अभ्यासाचे साहित्य आणि मार्गदर्शनाची सुविधाही देण्यात येणार आहे.
अनाथ मुले तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी Google Formमध्ये विशेष नोंदणीची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे किंवा अन्य मोठ्या शहरांमध्ये भरती प्रक्रियेसाठी येणाऱ्या उमेदवारांच्या मुक्काम आणि भोजनाची व्यवस्था करण्यासाठीही विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे.
पोलीस भरतीपुरतेच अभियान मर्यादित नाही
एखाद्या परीक्षेत अपयश आले तरी जीवन संपत नाही, या भूमिकेतून केंद्रीय सुरक्षा दल, निमलष्करी दल आणि अन्य सरकारी परीक्षांसाठीही उमेदवारांना मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच विविध स्पर्धा परीक्षांच्या वेळापत्रकांमध्ये परस्पर ‘क्लॅश’ होऊ नये, यासाठी सरकारकडून समन्वय साधण्याची भूमिका घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, गृहराज्यमंत्री योगेश कदम, माजी खासदार राहुल शेवाळे, विद्यार्थी सहाय्य व समन्वय कक्षाचे उद्धव ढवळे आणि श्रीशैल गोटुरी यांच्यासह पोलीस भरतीची तयारी करणारे अनेक तरुण-तरुणी उपस्थित होते.
राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…
संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…
मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…
ठाणे: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येशी माझा आणि माझ्या कुटुंबाचा कोणताही संबंध नाही. केवळ शिवसेना मुख्य नेते…
जळगाव : जळगावच्या पाचोरा तालुक्यातील जारगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत धूर फवारणी यंत्राच्या मुद्द्यावरून वाद झाला. यावेळी…
रांजणगाव गणपती : राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त निर्मलग्राम…