महाराष्ट्र

अजित पवारांच्या प्रयत्नांमुळे दोन जिल्ह्याला दोन नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यास मान्यता

अजितदादांच्या घोषणेनंतर महिन्याभरातंच मंजूरी

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री असलेल्या पुणे आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांमध्ये दोन नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. मागील जानेवारी महिन्यात बारामती येथे आयोजित ‘कृषिक-2025’ प्रदर्शनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बारामती आणि बीड जिल्ह्यात परळी येथे नवीन कृषी महाविद्यालय स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर महिन्याभरातच सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन त्या प्रस्तावांना आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रशासकीय कौशल्य आणि कामाचा झपाटा पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला.

महाराष्ट्र शेतीप्रधान राज्य असून शेतीच्या बरोबरीनं पशुधनाचा विकासही महत्वाचा आहे. आज मंजूरी मिळालेल्या बारामती आणि परळी येथे नवीन शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयांमुळे पशुपालकांना अत्याधुनिक, दर्जेदार पशुवैद्यकीय सेवा मिळणार असून, राज्यात प्रशिक्षित पशुवैद्यकांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे. राज्यातील पशुधनाच्या आरोग्याची काळजी आणि विकासासाठी ही पशुवैद्यकीय महाविद्यालये महत्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त करण्यात येत आहे.

बारामती ‘कृषिक 2025’ प्रदर्शनातील घोषणा महिनाभरात पूर्ण

बारामती येथे जानेवारी 2025 महिन्यात आयोजित ‘कृषिक-2025’ कृषी प्रदर्शनात, शेतकरी आणि पशुपालकांनी बारामतीमध्ये पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याची मागणी केली होती. या मागणीला तातडीने प्रतिसाद देत ही महाविद्यालये स्थापन करण्यात येतील, अशी घोषणा अजितदादांनी सभेत केली होती. त्यानंतर महिन्यातच अजितदादांनी मंत्रिमंडळाची मंजुरी मिळवून दिली. बारामतीतील कऱ्हावागज येथे 82 एकर आणि परळीच्या लोणी येथे 75 एकर जागेवर ही शासकीय महाविद्यालये उभारली जाणार आहेत.

पशुपालन क्षेत्राला मोठी चालना मिळणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरवर नेण्याचे ध्येय ठेवले आहे. यासाठी शेती आणि शेतीपुरक व्यवसायांना चालना देण्याची गरज ओळखून, पशुपालन आणि दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सध्या राज्यात पशुवैद्यकीय सेवा आणि पशुवैद्यकांची मोठ्या प्रमाणावर गरज असून, नवीन महाविद्यालयांमुळे प्रशिक्षित पशुवैद्यकांची संख्या वाढेल आणि राज्यभर पशुसंवर्धन सेवा अधिक भक्कम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

प्रत्येकी 234 नियमित, 42 मानधनावरील पदांना मान्यता

या शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयांसाठी मोठ्या प्रमाणात पदनिर्मिती करण्यात आली आहे. प्रत्येक महाविद्यालयासाठी शिक्षक संवर्गात 96, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी 138 नियमित पदे मंजूर करण्यात आली आहेत. त्याशिवाय, बाह्यस्त्रोतांद्वारे प्रत्येकी 42 पदे मानधन तत्त्वावर भरण्यासही मान्यता देण्यात आली आहे.

महाविद्यालयांसाठी 1129 कोटींची आर्थिक तरतूद

बारामती आणि परळी येथील महाविद्यालयांसाठी एकूण 1129.16 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रत्येक महाविद्यालयासाठी 564.58 कोटी रुपये खर्च होणार असून, या निधीतून प्रगत संशोधन केंद्रे, अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि आधुनिक सुविधा उभारल्या जातील.

पशुपालकांचा आनंद, राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत

या निर्णयामुळे राज्यातील पशुपालकांना मोठा दिलासा मिळणार असून, अत्याधुनिक पशुवैद्यकीय सुविधा अधिक सुलभ होतील. विशेषतः, बारामती आणि परळी परिसरातील शेतकरी व पशुपालकांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. हा निर्णय कृषिपूरक व्यवसायांना चालना देईल आणि राज्यातील पशुधन संगोपनासाठी नव्या संशोधन आणि तंत्रज्ञानाचा मार्ग मोकळा करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

अजितदादांची आणखी एक महत्वपूर्ण कामगिरी

राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री तसेच पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिन्याभराच्या अतिशय कमी वेळात हा लोकोपयोगी निर्णय मंजूर करून घेतला. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखालील पुणे व बीड जिल्ह्यासह राज्याच्या विकासाला चालना मिळणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शाळा-महाविद्यालयांच्या दारातच नशेचा बाजार; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात

राजगुरूनगर: राजगुरुनगर शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा, मावा, सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम…

8 तास ago

दरडग्रस्त भागांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मुंबई: मुंबई उपनगरातील घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप परिसरातील डोंगराळ भागांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात घडणाऱ्या दरड कोसळण्याच्या घटनांमुळे…

10 तास ago

डिजिटल परिवर्तनामुळे तंत्रशिक्षण प्रशासन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम; ई-गव्हर्नन्स पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई: राज्यातील तंत्रशिक्षण क्षेत्रात प्रशासन अधिक पारदर्शक, कार्यक्षम, उत्तरदायी आणि डेटा-आधारित करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात…

10 तास ago

शिरुर तालुक्यात सामाईक इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या भावाकडून मारहाण

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील गुनाट गावात सामाईक वापरातील इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या…

13 तास ago

शिरुर तालुक्यातील भीषण अपघातात पत्नीच्या मृत्यू प्रकरणी; पतीवर गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील न्हावरे-निर्वी अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण कार अपघातात एका महिलेचा मृत्यू…

14 तास ago

भाजलेल्या हरभऱ्याचे फायदे

चणे हा प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे. रोज भाजलेले हरभऱ्याचे सेवन केल्यास शरीराला अनेक आरोग्य समस्यांपासून…

17 तास ago