मुख्य बातम्या

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक स्थळावरच जर दर्शनासाठी ‘ओळख’ आणि ‘व्हीआयपी’ संस्कृतीला प्राधान्य मिळत असेल, तर सर्वसामान्य भाविकांनी प्रश्न विचारायचे कुणाला…? असा संतप्त सवाल श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात भाद्रपद गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी उपस्थित झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

अष्टविनायकांपैकी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या रांजणगाव येथे शनिवार (दि. १२ सप्टेंबरपासून) भाद्रपद गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. १२ ते १७ सप्टेंबरदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाच्या पहिल्याच दिवशी पहाटेपासून महागणपतीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी मंदिराकडे धाव घेतली. दूरवरुन आलेल्या भाविकांमध्ये दर्शनाचा उत्साह असतानाच प्रत्यक्ष दर्शन व्यवस्थेतील भेदभावामुळे अनेकांचा उत्साह संतापात बदलल्याचे दिसून आले. पहिल्या दिवसापासुनच काही विश्वस्तांचे, नातेवाईक, मित्रमंडळींना ‘व्हीआयपी’ रांगेतून प्रवेश दिल्याच्या तक्रारी भाविकांनी केल्या.

मुक्तद्वार दर्शन; पण रांगेतच ‘भेदभाव’…?
देवस्थान ट्रस्टने १२ ते १४ सप्टेंबर या कालावधीत मुक्तद्वार दर्शन व्यवस्था केली होती. या व्यवस्थेमुळे भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश करुन महागणपतीच्या मुर्तीला स्पर्श करुन दर्शन घेता येणार असल्याने भाविकांची मोठी गर्दी होणे अपेक्षितच होते. मात्र, एवढ्या मोठ्या गर्दीचे नियोजन करताना सर्वसामान्य भाविकांसाठी लांबच लांब रांगा लावण्यात आल्या. उन्हात आणि गर्दीत अनेक भाविक तासन्‌तास दर्शनाच्या प्रतीक्षेत उभे होते. दुसरीकडे व्हीआयपी, द्वारकरी गावकरी व विशेष व्यक्तींसाठी स्वतंत्र दर्शन व्यवस्था करण्यात आली होती. स्वतंत्र व्यवस्था असणे ही बाब व्यवस्थापनाच्या दृष्टीने समजण्यासारखी असली, तरी या व्यवस्थेचा नेमका लाभ कोणाला आणि कोणत्या निकषांवर दिला जात आहे…? हा प्रश्न पहिल्याच दिवशी उपस्थित झाला.

‘आम्ही तासन्‌तास रांगेत, त्यांना थेट दर्शन!’
यंदा एक तिथी घटल्यामुळे चार दिवसांऐवजी तीनच दिवस मुक्तद्वार दर्शन सुरु होते. त्यामुळे सर्वसामान्य भाविक तासनतास रांगेत उभे असताना मंदिराच्या मागच्या दारातून तसेच बागेतून काही लोकांना ‘व्हीआयपी’ दर्शनाच्या रांगेतून प्रवेश दिला जात असल्याचे पाहून सर्वसामान्य भाविकांनी आक्षेप घेतला. देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी तसेच कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना या मार्गातून प्रवेश दिला जात असल्याच्या तक्रारी भाविकांनी केल्या.

‘आम्ही दूरवरुन दर्शनासाठी आलो. तासन्‌तास रांगेत उभे आहोत. आमच्यासारख्या भाविकांना दर्शनासाठी प्रतीक्षा करावी लागत असताना ओळखीच्या व्यक्तींना थेट पुढे नेले जाते,’ अशी नाराजी काही भाविकांनी व्यक्त केली. या तक्रारींची वस्तुस्थिती ट्रस्टने स्पष्ट करणे आवश्यक आहे. व्हीआयपी दर्शनासाठी नेमके निकष काय आहेत…? त्याची अधिकृत यादी किंवा प्रवेश नियम काय आहेत…? आणि या नियमांचे पालन कोण करणार…? या प्रश्नांची उत्तरे भाविकांना मिळणे गरजेचे आहे.

‘व्हीआयपी’ रांगेवरुन पोलिसही भाविकांच्या निशाण्यावर…
‘व्हीआयपी’ मार्गातून कोणाला प्रवेश द्यायचा आणि कोणाला थांबवायचे, यावरुन वारंवार वादाचे प्रसंग निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. काही भाविकांनी पोलिसांकडे याबाबत नाराजी व्यक्त केली. परिणामी मंदिर परिसरात काही ठिकाणी शाब्दिक बाचाबाचीचे प्रसंगही घडले.

पुणे-नगर रस्त्यावर होणारी गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्था आणि भाविकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळताना पोलिसांना अशा वादांमध्येही हस्तक्षेप करावा लागत होता. त्यामुळे आधीच मोठ्या गर्दीचा ताण असलेल्या पोलिस यंत्रणेवर अतिरिक्त भार पडला. दर्शन व्यवस्थेतील अस्पष्टतेचा त्रास पोलिसांना का सहन करावा लागावा…? हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे.

ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव…?
भाद्रपद गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर भाविक रांजणगावात येणार, हे प्रशासन आणि देवस्थान ट्रस्टला आधीपासूनच माहीत होते. त्यामुळे दर्शन व्यवस्था, व्हीआयपी प्रवेश, स्थानिक गावकरी, द्वारकरी, ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग तसेच इतर विशेष श्रेणींसाठी स्वतंत्र आणि स्पष्ट नियोजन अपेक्षित होते. मात्र, पहिल्याच दिवशी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आणि व्यवस्थापन यंत्रणेमध्ये पुरेसा समन्वय आहे का…? असा प्रश्न उपस्थित झाला. व्हीआयपी दर्शनाची नक्की व्याख्या काय…? कोणाला व्हीआयपी मानायचे..? प्रवेशासाठी कोणते निकष आहेत…? कोणाला कोणत्या रांगेतून प्रवेश द्यायचा आणि त्या प्रवेशावर नियंत्रण कोणाचे…? या बाबी स्पष्ट नसतील तर त्याचा परिणाम थेट सर्वसामान्य भाविकांच्या दर्शन व्यवस्थेवर होतो.

‘देवाच्या दारी ओळख मोठी की भक्ती…?’
श्री महागणपतीच्या दर्शनासाठी येणारा भाविक हा कोणत्याही राजकीय, आर्थिक किंवा सामाजिक ओळखीपेक्षा आधी ‘भक्त’ असतो. त्यामुळे मंदिर व्यवस्थापनाने दर्शन व्यवस्थेत पारदर्शकता आणि समानतेला प्राधान्य देणे अपेक्षित आहे. व्हीआयपींसाठी स्वतंत्र व्यवस्था ठेवायची असेल तर त्याचे नियम स्पष्ट असावेत. त्या नियमांचा वापर केवळ अधिकृत निकषांनुसार व्हावा. अन्यथा सर्वसामान्य भाविकांच्या मनात असंतोष निर्माण होणे स्वाभाविक आहे.
एकीकडे सामान्य भाविक उन्हात तासन्‌तास रांगेत उभा आणि दुसरीकडे ओळखीच्या व्यक्तींना सहज प्रवेश असे चित्र यावर्षी मोठ्या प्रमाणात दिसले.

कारण प्रश्न केवळ दर्शनाचा नाही; प्रश्न आहे विश्वासाचा…
श्री महागणपतीच्या चरणी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला आपण समान आहोत, असा अनुभव मिळायला हवा. अन्यथा ‘मुक्तद्वार दर्शन’ हि संकल्पना कागदावर मुक्त आणि प्रत्यक्षात ‘ओळखीच्या दाराने’ अशी टीका होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आता देवस्थान ट्रस्ट या तक्रारींची दखल घेऊन पुढच्या वर्षी तरी ‘मुक्तद्वार’ दर्शन व्यवस्थेत सुधारणा करणार का…? ‘व्हीआयपी’ दर्शनासाठी नेमके निकष जाहीर करणार का…? आणि सर्वसामान्य भाविकांना समान व सुलभ दर्शनाची हमी देणार का?या प्रश्नांची उत्तरे भाविकांना अपेक्षित आहेत.

दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही भाद्रपद गणेशोत्सवाची मोठ्या प्रमाणात तयारी केली होती. भाविकांना मुक्तद्वार दर्शन सहज घेता यावे म्हणून पोलिस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला होता. परंतु यावर्षी एक तिथी घटल्यामुळे चार दिवसांऐवजी तीन दिवसच मुक्तद्वार दर्शन सुरु होते. त्यामुळे सर्वच यंत्रणावर ताण आल्यामुळे काही प्रमाणात भाविकांची गैरसोय झाली. परंतु आमच्यावर होत असलेले आरोप पुर्णपणे चुकीचे आहेत.
– स्वाती पाचुंदकर पाटील (अध्यक्षा)
श्री क्षेत्र रांजणगाव देवस्थान ट्रस्ट, रांजणगाव गणपती

श्री महागणपती: रांजणगाव गणपती

महागणपती मुक्तद्वार दर्शनाचा भाविकांनी लाभ घ्यावा: स्वाती पाचुंदकर

संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

Video; रांजणगावच्या महागणपती मंदिरात पाच दिवसांत ४.५ लाख भाविकांनी घेतले दर्शन

रांजणगाव गणपती मंदिर आवारातील पाणपोई ऐन उन्हाळ्यात बंद; भाविकांची नाराजी…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

5 दिवस ago