सोलापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करत जोरदार हल्लाबोल केला आहे. गोरे यांच्यावर सुमारे १९ गुन्हे दाखल असल्याचा दावा करत, “एखाद्यावर चार-पाच गुन्हे दाखल झाले तर मोक्काची कारवाई होते. मग दाखल गुन्हे पाहता मोक्काची कारवाई होऊ नये म्हणून गोरे भाजपमध्ये दाखल झाले का?” असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला.
सुषमा अंधारे गेल्या दोन दिवसांपासून सोलापूर दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत जयकुमार गोरे यांच्यावर विविध प्रकरणांचा उल्लेख करत गंभीर आरोप केले. “गोरे कोण आहेत, हे मला चांगले माहिती आहे. मी त्यांची कुंडली वाचत आहे,” असा दावा त्यांनी केला.
अंधारे यांनी एका महिलेला कथितरीत्या आक्षेपार्ह फोटो पाठवल्याच्या प्रकरणाचाही उल्लेख केला. तसेच गोरे यांच्याकडे एक कोटी रुपये कुठून आले, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केल्याचा दावा त्यांनी केला. “संबंधित महिला पैसे घेताना कुठेही दिसत नाही. मात्र गोरेंकडे एक कोटी रुपये कुठून आले, याचे उत्तर त्यांनी द्यावे,” असे त्या म्हणाल्या.
दलित व्यक्तीची जागा नावावर केल्याचा आरोप
मृत व्यक्तीला जिवंत दाखवून एका दलित व्यक्तीची जागा नावावर करून घेतल्याचा आरोपही अंधारे यांनी केला. या प्रकरणात ६ मार्च २०२५ रोजी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्याचा आणि ८ मे २०२६ रोजी नॉन-बेलेबल वॉरंट जारी झाल्याचा दावा त्यांनी केला. “या सगळ्यावर गोरे कधी बोलणार आहेत?” असा सवाल त्यांनी केला.
दहिवडी, मिरज आणि इस्लामपूर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या विविध गुन्ह्यांचाही अंधारे यांनी पत्रकार परिषदेत उल्लेख केला. “गोरेंना उत्तर द्यायचे असेल तर त्यांच्यासाठी दुसरा एपिसोड लवकरच ओपन करेन,” असा इशाराही त्यांनी दिला.
‘१९ गुन्हे असलेल्या व्यक्तीला मंत्री करण्याची फडणवीसांची काय मजबुरी?’
“१९ गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीला मंत्री म्हणून घ्यावे लागले, यात देवेंद्र फडणवीस यांची काय मजबुरी होती? भाजपच्या जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी दिली जात नाही; मात्र काँग्रेसमधून आलेल्या व्यक्तीला मंत्री केले जाते,” असा आरोप अंधारे यांनी केला.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप करत अंधारे यांनी २२३ बिलांचा उल्लेख केला. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि चार्जशीट दाखल झाली, मात्र त्यातून गोरे यांचे नाव वगळण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
‘विश्रामगृहातील दोन सूट नेहमी बंद का?’
सोलापूर विश्रामगृहातील पालकमंत्र्यांसाठी असलेल्या दोन विशेष सूटचा मुद्दाही अंधारे यांनी उपस्थित केला. या दोन सूटच्या सुशोभीकरणासाठी सुमारे १० कोटी रुपये खर्च झाल्याचा दावा करत, “हे सूट कशासाठी वापरले जातात? त्यांचे दरवाजे नेहमी बंद का असतात?” असा सवाल त्यांनी केला.
ग्रामविकास खात्यावरही गंभीर आरोप
ग्रामविकास खात्याच्या कारभारावरूनही अंधारे यांनी सरकारला लक्ष्य केले. विजय चौधरी यांच्या नावाचा उल्लेख करत त्यांनी एक कथित ऑडिओ क्लिप पत्रकार परिषदेत ऐकवली. या क्लिपमध्ये जयकुमार गोरे त्यांच्या कामासाठी १० टक्के मागत असल्याचे सांगितले जात असल्याचा दावा अंधारे यांनी केला.“हा भाजपचाच माणूस आहे. त्याच्या ऑडिओ क्लिपमधून ग्रामविकास खात्याचा कारभार कसा चालतो, हे समोर येत आहे,” असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शिवसेना नेत्यांविषयी केलेल्या वक्तव्यावरूनही अंधारे यांनी टीका केली. “शिवसेनेच्या लोकांबाबत जपून बोलायचे. तुम्ही एक वाक्य बोललात तर मी अख्खी बखर बाहेर काढेन,” असा इशारा त्यांनी दिला.
सुषमा अंधारे यांच्या या आरोपांमुळे सोलापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा जयकुमार गोरे विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, अंधारे यांनी केलेल्या आरोपांवर जयकुमार गोरे यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
सोलापूर : अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर हल्ला करण्यासाठी त्यांच्या वाहनचालकाला पैशांचे…
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या…
पुणे : काकडेवस्ती परिसरात खासगी ट्रॅव्हल्समधून अमली पदार्थांचा साठा येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांच्या…
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि भांडूपमधील मनसेच्या बंडखोर नेत्या अनिशा माजगावकर यांची आज…
चाकण : मर्सिडीज-बेंझ, फोक्सवॅगन, स्कोडा, ह्युंदाई यांसारख्या जागतिक कंपन्यांमुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक नकाशावर महत्त्वाचे स्थान निर्माण…
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडींना वेग आलेला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आठ…