महाराष्ट्र

अल्पवयीन मुलांना ऑनलाइन जाळ्यात ओढून ब्लॅकमेलिंग; नीलम गोऱ्हेंचे राज्यपालांना निवेदन

मुंबई: राज्यातील अल्पवयीन मुला-मुलींना ऑनलाईन गेमिंग, सोशल मीडिया आणि चॅटिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जाळ्यात ओढून ब्लॅकमेलिंग, लैंगिक शोषण तसेच अमली पदार्थांच्या विळख्यात ओढण्याच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर समन्वित राज्यस्तरीय उपाययोजना करण्याची मागणी शिवसेना नेत्या तथा विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी १५ ऑगस्ट रोजी राज्यपालांना निवेदन देत त्यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विभागांची विशेष बैठक आयोजित करण्याची विनंती केली आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील मुकुंदवाडी परिसरात ‘Roblox’ या ऑनलाईन गेमच्या माध्यमातून अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढून ब्लॅकमेल केल्याच्या घटनेचा उल्लेख डॉ. गोऱ्हे यांनी निवेदनात केला आहे. तसेच नागपूर येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणाच्या तपासाचा ९ ऑगस्ट रोजी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष आढावा घेतल्याचेही त्यांनी नमूद केले.

सायबर गुन्हे, बाल लैंगिक शोषण आणि अमली पदार्थांचा गैरवापर या घटनांकडे स्वतंत्रपणे न पाहता बालसुरक्षा, सायबर सुरक्षा, अमली पदार्थ प्रतिबंध आणि सार्वजनिक आरोग्याशी संबंधित एकत्रित आव्हान म्हणून पाहण्याची गरज आहे, असे डॉ. गोऱ्हे यांनी म्हटले आहे.

राज्यातील अनधिकृत स्मोकिंग सेंटर, हुक्का पार्लर तसेच पान-सिगारेट आणि स्नॅक्स दुकानांच्या आडून अमली पदार्थांची विक्री किंवा सेवन होत असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. विशेषतः शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहांच्या परिसरात विशेष तपासणी मोहीम राबविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

संशयास्पद केंद्रांची माहिती नागरिक आणि लोकप्रतिनिधींना गोपनीय पद्धतीने देता यावी, यासाठी प्रभावी हेल्पलाईन किंवा डिजिटल तक्रार व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणीही डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे.

“ऑनलाईन ग्रूमिंग, बाल लैंगिक शोषण आणि अमली पदार्थांचे आंतरजिल्हा स्वरूप लक्षात घेता विविध यंत्रणांमध्ये अधिक प्रभावी समन्वय आवश्यक आहे. महाराष्ट्रातील मुला-मुलींची सुरक्षितता ही त्यांच्या सुरक्षित भवितव्याशी निगडित सामाजिक जबाबदारी आहे,” असे डॉ. गोऱ्हे यांनी म्हटले आहे.

राज्यपालांच्या मार्गदर्शनाखाली गृह, पोलीस, महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, सायबर पोलीस आणि अमली पदार्थविरोधी यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेण्यात यावी. या बैठकीत कालबद्ध राज्यस्तरीय कृती आराखडा निश्चित करावा तसेच बालसुरक्षेसाठी काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींनाही बैठकीस आमंत्रित करावे, अशी विनंती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूरचा शेतकरी दुष्काळात होरपळतोय; लोकप्रतिनिधी वाढदिवसाच्या जल्लोषात; फ्लेक्स, बॅनर अन् वाढदिवसाच्या उधळपट्टीवर शेतकऱ्यांचा संताप…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यावर दुष्काळाचे ढग दाटले आहेत. खरीप हंगामाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला…

13 तास ago

शिरूर गोळ्यांच्या आवाजाने हादरतोय; पाच घटनांमध्ये तिघांचा मृत्यू, एकाचा गंभीर मारहाणीत बळी…

शिरूर (तेजस फडके) : शांत, शेतीप्रधान तालुका म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्याची ओळख आता गुन्हेगारीच्या…

16 तास ago

शिरूर तालुक्यातील दोन हवालदारांवर एसीबीची कारवाई; एकाने घेतली लाच तर दुसरा झाला पसार…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस ठाण्याअंतर्गत टाकळी हाजी पोलिस हवालदारांनी लाच मागितल्याच्या दोन स्वतंत्र प्रकरणांवर…

16 तास ago

शिरूर तालुक्यात भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू; एक जखमी…

मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…

1 दिवस ago

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

2 दिवस ago

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी; आणखी दोन महिने वाढवा

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…

2 दिवस ago