विजय वडेट्टीवारांचा केंद्र सरकारवर घणाघात; राहुल गांधींवरील गुन्ह्यावरही संताप
नागपूर: केंद्रातील मोदी सरकारची ओबीसीविरोधी मानसिकता पुन्हा एकदा समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी विद्यार्थ्यांच्या हक्काच्या नियुक्त्यांबाबत स्पष्ट आदेश दिल्यानंतरही त्याची अंमलबजावणी करण्याऐवजी केंद्र सरकारने न्यायालयात जाऊन या निर्णयाला आव्हान दिले आहे. त्यामुळे यूपीएससी उत्तीर्ण झालेल्या सुमारे ९८० ओबीसी उमेदवारांचे IAS, IPS आणि इतर केंद्रीय सेवांमध्ये जाण्याचे स्वप्न धोक्यात आले आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
११ मार्च २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर पात्र ओबीसी उमेदवारांना न्याय देण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेणे अपेक्षित होते. मात्र, सामाजिक न्यायाची भूमिका घेण्याऐवजी मोदी सरकारने पुन्हा न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. ‘ओबीसी तरुणांना प्रशासनात येऊ द्यायचे नाही, त्यांना IAS-IPS होऊ द्यायचे नाही, अशीच सरकारची भूमिका दिसत आहे,’ अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
क्रीमी लेयर निश्चित करताना पालकांच्या पगाराबाबत १९९३ च्या शासन निर्णयातील तरतुदी स्पष्ट असतानाही २००४ च्या DoPT पत्रामुळे PSU आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांवर अन्याय झाला. या उमेदवारांना न्याय देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने अतिरिक्त जागा निर्माण करून पात्र उमेदवारांना सामावून घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र, सहा महिन्यांत आदेशाची अंमलबजावणी करण्याऐवजी सरकारच त्याला विरोध करत असेल, तर हा ओबीसी समाजाचा उघड विश्वासघात आहे, असा आरोप त्यांनी केला.
‘मोदी सरकारने ओबीसींचा गळा घोटण्याचे काम केले आहे. या सरकारला ओबीसींच्या मुलांनी प्रशासनात यावे, IAS-IPS व्हावे, हेच नको आहे. हजारो मुलांचे भविष्य टांगणीला लावून सरकार सामाजिक न्यायाच्या विरोधात उभे राहिले आहे. ही मनुवादी विचारसरणीची मानसिकता आहे,’ असा घणाघात वडेट्टीवार यांनी केला.
खरगेंच्या सभास्थळाच्या शुद्धीकरणावरून भाजपवर निशाणा
उत्तराखंडमध्ये काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सभा घेतलेल्या ठिकाणाचे शुद्धीकरण करण्यात आल्याच्या घटनेवरूनही वडेट्टीवार यांनी भाजपवर निशाणा साधला. या प्रकरणात स्टेजचे शुद्धीकरण करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
‘राहुल गांधी दलित, आदिवासी आणि वंचितांचा आवाज उठवतात म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. ही सत्तेची मस्ती आहे. म्हणूनच भाजप मनुवादी आहे,’ अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
‘भागवतांनी भारतातही समान भूमिका मांडावी’
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अमेरिकेतील वक्तव्याचे स्वागत करताना वडेट्टीवार यांनी त्यांना भारतातही त्याच भूमिका मांडण्याचे आवाहन केले. देशात जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करणाऱ्या मंत्र्यांनाही भागवत यांनी त्याच भूमिकेने रोखले पाहिजे, असे ते म्हणाले.
‘विदेशात एक आणि भारतात दुसरी भूमिका का? मोहन भागवतजी यांनी देशात येऊन आपली ही भूमिका मांडावी. भाजपचे नेते दिवस-रात्र हिंदू-मुस्लिम, मंदिर-मशीद वाद उकरून वातावरण खराब करत आहेत,’ अशी टीका त्यांनी केली.
समृद्धी महामार्गावरील दरोड्यावरून सरकारला सवाल
समृद्धी महामार्गावरील दरोड्याच्या घटनेवरूनही वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला धारेवर धरले. वाहन अडवणे, टायर फोडणे, प्रवाशांना मारहाण करून लुटणे अशा घटना घडत असतील, तर हा महामार्ग सुरक्षित कसा म्हणायचा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
‘समृद्धी महामार्गावर आधी अपघातांमध्ये शेकडो लोकांचे जीव गेले. आता दरोडेखोरांकडून जीव जाण्याची वेळ आली आहे. दिवसाढवळ्या वाहनं थांबवून लोकांना लुटण्याची हिंमत गुन्हेगारांची वाढत असेल तर कायद्याचा धाक कुठे आहे? सरकारचा वरदहस्त असल्याशिवाय एवढी हिंमत वाढते का?’ असा संतप्त सवाल वडेट्टीवार यांनी केला.महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न गंभीर असून सरकारने गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून प्रवाशांच्या सुरक्षेची हमी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…
मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…
मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…
मुंबई: सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सुनावणी निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, आजपासून शिंदे…
Pपुणे : महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेत अष्टविनायक यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रीगणेशाची आठ…
नवी दिल्ली: “बाळासाहेब ठाकरे यांना धनुष्यबाण प्राणाहून प्रिय होता. ते देव्हाऱ्यात धनुष्यबाणाची पूजा करायचे. मात्र, २०१९…