महाराष्ट्र

महाराष्ट्र-हेसनमध्ये उद्योग, तंत्रज्ञान आणि कौशल्य विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : महाराष्ट्र आणि जर्मनीतील हेसन राज्य यांच्यात उद्योग, सेवा, माहिती-तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ आणि सीमापार गतिशीलता या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढविण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हेसन राज्याचे अध्यक्ष बोरीस ऱ्हेइन यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

या भागीदारीमुळे महाराष्ट्रासाठी हेसन हे जर्मनी आणि युरोपचे, तर हेसनसाठी महाराष्ट्र हे भारत आणि इंडो-पॅसिफिक प्रदेशाचे प्रवेशद्वार ठरणार आहे. गुंतवणूक, नवोन्मेष, रोजगार आणि कौशल्य विकासाला या करारामुळे चालना मिळून नागरिकांसाठी नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

भारत-जर्मनी भागीदारी विश्वास, ज्ञान, व्यापार, नवोन्मेष आणि लोकांमधील संबंधांवर आधारित असून, राष्ट्रीय स्तरावरील सहकार्याला आता राज्यस्तरीय आर्थिक भागीदारीची जोड मिळत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. महाराष्ट्र आणि हेसनचे आर्थिक सामर्थ्य, औद्योगिक प्रगती आणि नवोन्मेषाची क्षमता लक्षात घेता ही भागीदारी अधिक मजबूत होईल, असेही त्यांनी नमूद केले.

मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी, तर फ्रँकफर्ट हे युरोपमधील प्रमुख वित्तीय केंद्र आहे. वित्त, उद्योग, तंत्रज्ञान, संशोधन आणि कुशल मनुष्यबळाच्या माध्यमातून मुंबई आणि फ्रँकफर्ट परस्परांच्या अर्थव्यवस्थांसाठी महत्त्वाचे प्रवेशद्वार ठरू शकतात, असे मुख्यमंत्री म्हणाले.

औषधनिर्मितीपासून AIपर्यंत सहकार्य

या करारांतर्गत औषधनिर्मिती, आरोग्यसेवा, अभियांत्रिकी, वाहन उद्योग, वित्तीय सेवा, लॉजिस्टिक्स, डिजिटल अर्थव्यवस्था आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या संधी निर्माण होणार आहेत. हेसनमधील उद्योगांनी महाराष्ट्रात गुंतवणूक वाढवावी, तर महाराष्ट्रातील उद्योगांनी जर्मनी आणि युरोपियन बाजारपेठेत प्रवेशासाठी हेसनचा उपयोग करावा, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

नवी मुंबईजवळ उभारण्यात येत असलेल्या एज्युकेशन सिटीमध्ये हेसनमधील अग्रगण्य विद्यापीठांनी सहभागी व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. जर्मनीतील कुशल मनुष्यबळाची वाढती गरज आणि महाराष्ट्रातील मोठा युवा वर्ग लक्षात घेता कौशल्य विकास आणि रोजगारनिर्मितीसाठी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

संयुक्त कार्यगटाची स्थापना

कराराच्या अंमलबजावणीसाठी संयुक्त कार्यगट स्थापन करण्यात येणार आहे. तसेच मुंबई आणि हेसन येथे नियमित ‘महाराष्ट्र-हेसन बिझनेस डायलॉग’ आयोजित करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडला.

हेसनचे अध्यक्ष बोरीस ऱ्हेइन यांनी महाराष्ट्रातील वेगाने होणाऱ्या पायाभूत सुविधा विकासाचे आणि जागतिक उद्योग व तंत्रज्ञान गुंतवणुकीसाठी निर्माण झालेल्या अनुकूल वातावरणाचे कौतुक केले. महाराष्ट्र-हेसन संबंध केवळ आर्थिक आणि औद्योगिक सहकार्यापुरते मर्यादित नसून लोकशाही, कायद्याचे राज्य, बहुपक्षीय सहकार्य आणि नियमाधिष्ठित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या समान मूल्यांवर आधारित असल्याचे त्यांनी सांगितले.

या सामंजस्य करारामुळे उद्योग, गुंतवणूक, कौशल्य विकास, व्यावसायिक प्रतिनिधीमंडळांची देवाणघेवाण, गुंतवणूकदारांना सहाय्य आणि नव्या व्यावसायिक संधींना चालना मिळणार असल्याचे ऱ्हेइन यांनी नमूद केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

6 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

6 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

10 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

10 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

10 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

10 तास ago