एसटी महामंडळाकडून स्मारकासाठी जागा नगरपालिकेकडे हस्तांतरित; आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला यश
संगमनेर: संगमनेर शहराच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य अश्वारूढ स्मारक उभारण्याच्या अनेक वर्षांपासूनच्या प्रयत्नांना अखेर मूर्त स्वरूप आले आहे. आमदार सत्यजीत तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर एसटी महामंडळ आणि संगमनेर नगरपालिका यांच्यात जागा हस्तांतरणाचा करार आज करण्यात आला. स्मारकासाठी निश्चित करण्यात आलेली जागा एसटी महामंडळाने नगरपालिकेकडे हस्तांतरित केल्याने पुतळा उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
यावेळी नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे, राज्य परिवहन महामंडळ अहिल्यानगरचे राजेंद्र दामोधर जगताप, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्यासह नगरसेवक विश्वासराव मुर्तडक, किशोर टोकसे, शैलेश कलंत्री, किशोर पवार आदी उपस्थित होते.
या स्मारकासाठी २०१८ मध्ये तत्कालीन नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या कार्यकाळात संगमनेर नगरपालिकेने ठराव केला होता. त्यानंतर बसस्थानक परिसरात जागा मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मात्र, एसटी महामंडळाच्या धोरणात्मक अडचणींमुळे जागा हस्तांतरणास विलंब झाला.
२०२३ मध्ये आमदार सत्यजीत तांबे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन संगमनेर बसस्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत ६ मीटर बाय ४ मीटर जागा स्मारकासाठी देण्यास मान्यता देण्यात आली. तसेच स्मारक परिसरात गार्डनसह इतर सुविधा विकसित करण्यासही परवानगी देण्यात आली.
आमदार सत्यजीत तांबे म्हणाले, “२०१८ पासून या स्मारकासाठी पाठपुरावा सुरू आहे. अतिरिक्त जागेचा प्रस्ताव एसटी महामंडळाच्या विचाराधीन असल्याने आणखी किती काळ प्रतीक्षा करायची, हा प्रश्न होता. त्यामुळे उपलब्ध झालेल्या जागेत स्मारकाचे काम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नगरपालिकेने निविदा प्रक्रिया पूर्ण केली असून पुतळ्याची निविदा प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आहे. संगमनेरकरांच्या मतानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या करारामुळे या ऐतिहासिक कामाला प्रत्यक्ष सुरुवात होत आहे.”
जागा नगरपालिकेकडे हस्तांतरित झाल्याने चौथरा, पुतळा आणि इतर प्राथमिक कामांना आता सुरुवात करता येणार आहे. पुतळ्याच्या अंतिम मान्यतेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अश्वारूढ पुतळा उभारणीच्या कामालाही गती मिळणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकांसाठी ५० लाखांचा निधी
संगमनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांच्या कामासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या माध्यमातून ५० लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. दोन्ही महापुरुषांच्या स्मारकांचे काम दर्जेदार आणि भव्य स्वरूपात व्हावे, यासाठी आवश्यक सहकार्य करण्याची भूमिका आमदार तांबे यांनी जाहीर केली आहे.
अतिरिक्त २२०० चौरस फूट जागेसाठी पाठपुरावा सुरूच
स्मारक परिसराच्या विकासासाठी संगमनेर नगरपालिकेने एसटी महामंडळाकडे अतिरिक्त २२०० चौरस फूट जागेची मागणी केली आहे. या जागेचा प्रस्ताव सध्या महामंडळाच्या विचाराधीन आहे. गार्डनसह परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अतिरिक्त जागा मिळावी, यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांचा पाठपुरावा सुरू राहणार आहे. मात्र, अतिरिक्त जागेची प्रतीक्षा न करता उपलब्ध जागेत स्मारकाचे काम पुढे नेण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नव्या…
अहिल्यानगर : अहिल्यानगर-मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या कामाला…
मुंबई : रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांना दोन महिन्यांचे हप्ते…
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून विविध घडामोडींना वेग आलेला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मुंबई : अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे. रायगडच्या…
जन्माबरोबर प्रत्येक माणसाचा मृत्यूही ठरलेला असतो. कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह जाळला जातो किंवा त्यावर…