महाराष्ट्र

खारघरमध्ये गुरु तेग बहादुर यांच्या ३५०व्या शहीद समागमात शिंदे यांचा धार्मिक स्वातंत्र्याचा बुलंद संदेश

खारघर: “धर्मासाठी शिर दिले पण तत्त्वांशी तडजोड केली नाही, हा आदर्शच आजच्या भारताला दिशा देणारा आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. खारघर, नवी मुंबई येथे आयोजित ‘हिंद-दी-चादर’ गुरु तेग बहादुर यांच्या ३५०व्या शहीद समागम सोहळ्यात मार्गदर्शन करताना त्यांनी धार्मिक स्वातंत्र्य, मानवतेचे रक्षण आणि राष्ट्रीय एकात्मता यांचा ठाम संदेश दिला.

हा समारंभ केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विविध धर्मगुरू, मंत्रीमंडळातील सदस्य, आमदार आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. मोठ्या संख्येने शीख बांधव-भगिनींनी सहभाग नोंदवला.

यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, “आज आपण नववे शीख गुरु, हिंद-दी-चादर गुरु तेग बहादुर साहेब यांच्या ३५०व्या शहीद दिनानिमित्त एकत्र आलो आहोत. हा दिवस केवळ शीख इतिहासाचा नाही, तर संपूर्ण मानवतेच्या इतिहासातील गौरवाचा दिवस आहे.”

१७व्या शतकात मुघल सम्राट औरंगजेब यांच्या कारकिर्दीत धार्मिक अत्याचार वाढले. काश्मिरी पंडितांवर जबरदस्ती धर्मांतराचे संकट ओढवले असताना त्यांनी गुरु साहेबांकडे मदतीसाठी धाव घेतली. “मी माझा धर्म सोडणार नाही आणि कोणालाही त्याचा धर्म सोडू देणार नाही,” अशी ठाम भूमिका घेत गुरु तेग बहादुर यांनी दिल्लीतील चांदणी चौकात शिरच्छेद स्वीकारला; पण अन्यायासमोर झुकले नाहीत, असे शिंदे यांनी सांगितले.

“त्यांच्याकडे सेना नव्हती, ताज नव्हता, खजिना नव्हता; पण अपार साहस, अढळ सत्य आणि असीम करुणा होती. म्हणूनच त्यांना ‘हिंद-दी-चादर’ म्हटले जाते — जी चादर वादळांपासून संरक्षण करते, थंड रात्रीत उब देते आणि दुर्बलांना बळ देते,” असे ते म्हणाले.

शिंदे पुढे म्हणाले की, गुरुजी असम आणि बंगालच्या दौर्‍यावर असताना एका जमीनदाराच्या अन्यायाविरुद्ध त्यांनी शांततेच्या बळावर आवाज उठवला आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. “खरी ताकद बंदुकीत नसून सत्य आणि न्यायाच्या आवाजात असते,” असे त्यांनी अधोरेखित केले.

“गुरुजींचे विचार जन-जनांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. ६००० हून अधिक गावांमध्ये डिजिटल रथांच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबवले जात आहे. शीख, बंजारा, वाल्मीकी, लबाना आणि सिकलीगर समाजांना एका सूत्रात बांधण्याचे कार्य सुरू आहे,” असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र-पंजाब ऐतिहासिक नातेसंबंध अधोरेखित करताना त्यांनी नमूद केले की, नांदेड ही भूमी शीख धर्माचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंह यांची कर्मभूमी आहे. याच ठिकाणी त्यांनी ‘सब सिखन को हुकुम है, गुरु मान्यो ग्रंथ’ असा संदेश दिला. तसेच संत संत नामदेव यांनी भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत नेली, असेही त्यांनी सांगितले.

१९८४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या शीखविरोधी दंगलींचा उल्लेख करत शिंदे म्हणाले की, त्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत शीख समाजाच्या संरक्षणासाठी पुढाकार घेतला होता. “महाराष्ट्राने नेहमीच बंधुभाव जपला आहे,” असे ते म्हणाले.

भाषणाच्या शेवटी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांना आवाहन केले की, श्रद्धा कधीही कमकुवत होऊ देऊ नका. “कोणाच्याही धर्मावर किंवा ओळखीवर हल्ला सहन करणार नाही. एकमेकांचे संरक्षण करू — जसे हिंद-दी-चादरने संपूर्ण हिंदुस्थानाचे रक्षण केले,” असे ते म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भांबर्डेतील मंदिर परिसर आणि जुना दहिवडी रस्ता चिखलमय; तातडीने मुरुम टाकण्याची ग्रामस्थांची मागणी

रांजणगाव गणपती (अक्षय टेमगिरे): भांबर्डे (ता. शिरुर) गावातील मंदिर परिसरातील तळ्याच्या भरावावर तसेच जुन्या दहिवडी…

6 मिनिटे ago

‘कमळी’ मालिकेत आषाढी विशेष भाग; महाजन कुटुंबातील मोठं सत्य उघड होणार?

मुंबई: झी मराठीवरील लोकप्रिय 'कमळी' मालिकेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत असून,…

3 तास ago

मक्याचे कणीस खाणे आरोग्यासाठी फायदेशीर

मक्याचे कणीस खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मक्यात पोषकतत्वांचा खजिना असल्याने याचे अनेक फायदे शरीरास होतात.…

3 तास ago

वाल्मीक कराड तुरुंगात; परळीच्या राखेतून महाजनकोला वर्षभरात ₹35 कोटींचे उत्पन्न

निविदा प्रक्रियेमुळे अवैध राख माफियांना लगाम; तीन वर्षांतील सर्वाधिक महसूल महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या तिजोरीत…

3 तास ago

पुणे-नगर महामार्गावर भरधाव टँकरची दुचाकीला धडक; ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू; दिड महिन्यानंतर गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके): अहिल्यानगर-पुणे महामार्गावर सरदवाडी गावाजवळ भरधाव पेट्रोल-डिझेल टँकरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने…

3 तास ago

शिरूर Video ! दोन डॉक्टरांचे प्रसंगावधान, दोन तासांची मृत्यूशी झुंज; ४५ मिनिटे अखंड CPR मुळे रुग्णाला जीवदान…

शिरूर (तेजस फडके) : वैद्यकीय क्षेत्रात रुग्णालयांमधील स्पर्धा, उपलब्ध सुविधा आणि रुग्णसंख्या यांची नेहमीच चर्चा…

6 तास ago