मुंबई: राजकारणात काही गोष्टी इतक्या उघडपणे घडतात की त्यावर भाष्य करण्यासाठी दुर्बिणीची गरज नसते; फक्त डोळे उघडे ठेवण्याची गरज असते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही महिन्यांपासून प्रसारमाध्यमांतून एक चित्र रंगवले जात होते—एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि दुसरीकडे प्रफुल पटेल व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यातील कथित संघर्ष. पक्षात अंतर्गत गटबाजी उसळली आहे, सत्ताकेंद्रे बदलत आहेत, निर्णय प्रक्रियेत संघर्ष सुरू आहे, अशी चर्चा रंगवली गेली.
मात्र राजकारणात शब्दांपेक्षा नियुक्त्या अधिक बोलक्या असतात.
विधान परिषदेच्या निवडणुकीतील उमेदवारी वाटप असो किंवा राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी राजेंद्र जैन यांना देण्यात आलेली उमेदवारी असो, या निर्णयांनी पक्षातील वास्तविक सत्तासमीकरणांचे संकेत दिले आहेत. माध्यमांमध्ये संघर्षाच्या कथा रंगवल्या गेल्या; पण उमेदवारीच्या यादीत मात्र वेगळीच कथा लिहिली गेली.
राजकारणात ज्यांच्या नावावर निर्णय होतात ते नेते मोठे असतात; पण ज्यांच्या सांगण्यावर निर्णय होतात ते खरे सत्ताधीश असतात. राष्ट्रवादीतील अलीकडच्या घडामोडींकडे पाहिले तर प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांचा प्रभाव अद्याप कायम असल्याचे चित्र दिसते. जर एखाद्या गटाची पकड कमी झाली असती, तर त्याचे प्रतिबिंब उमेदवारीच्या निर्णयांत दिसले असते. तसे मात्र घडलेले दिसत नाही.
सुनील तटकरे यांच्या राजकीय घराण्याकडे पाहिले तर ते आता स्वतंत्र राजकीय प्रकल्पासारखे वाटू लागते. घरात खासदार, मंत्री, आमदार आणि विधान परिषदेतही प्रतिनिधित्व—हे चित्र पाहून सामान्य कार्यकर्त्याला प्रश्न पडणे स्वाभाविक आहे की पक्ष कार्यालय कुठे संपते आणि कौटुंबिक बैठक कुठे सुरू होते?
एकेकाळी पक्ष संघटनेच्या बळावर उभे राहत होते. आज अनेक पक्षांमध्ये संघटना ही कुटुंबाच्या विस्ताराची शाखा बनत चालल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होत आहे. कार्यकर्त्यांनी झेंडे उचलायचे, सभा भरवायच्या, घोषणाबाजी करायची आणि शेवटी पदांची फळे मात्र ठरावीक घरांच्या अंगणात पडायची—ही भारतीय राजकारणातील जुनी परंपरा नव्या रंगाने पुन्हा रंगवली जात असल्याचे चित्र दिसते.
घराणेशाहीविरोधात भाषणे करणारे नेते जेव्हा स्वतःच्या घरातील सदस्यांना एकामागून एक महत्त्वाची पदे मिळवून देतात, तेव्हा लोकशाहीचा चेहरा थोडासा संकोचून खाली पाहतो. कारण पक्षातील हजारो निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधीचे आश्वासन मिळते; पण प्रत्यक्षात संधीचा मार्ग अनेकदा एका घराच्या दरवाजातूनच जातो.
आज राष्ट्रवादीत खरा संघर्ष विचारांचा आहे की प्रभावाचा, हा मूलभूत प्रश्न आहे. माध्यमांसमोर दाखवला जाणारा संघर्ष आणि प्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेत दिसणारे समीकरण यांच्यातील तफावत अनेक प्रश्न निर्माण करते. लोकशाहीत पदे मिळणे हा गुन्हा नाही; पण पदांचे वितरण पाहून जर कार्यकर्त्यांना पक्षाऐवजी कुटुंबच दिसू लागले, तर तो नक्कीच चिंतेचा विषय ठरतो.
कारण पक्ष हा कार्यकर्त्यांचा असतो, वारसाहक्काचा नव्हे.आणि म्हणूनच राष्ट्रवादीच्या कार्यालयावर आता एखादा नवा फलक लावण्याची वेळ आली आहे की काय, असा प्रश्न पडतो.“येथे लोकशाहीचे स्वागत आहे; मात्र प्रवेश फक्त घरातील सदस्यांसाठी!”
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…