मुंबई: अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील फळे, भाजीपाला व इतर शेतमालाची उपलब्धता तसेच खरेदी-विक्री संदर्भातील प्रत्येक क्षणाची अद्ययावत माहिती शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने पोहचण्यासाठी सक्षम यंत्रणेसाठी येणाऱ्या काळात आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले. शेतकऱ्यांना देशातील व आंतरराष्ट्रीय बाजारातील माहितीच्या आधारे शेतमाल विक्रीबाबत अचूक आकलन होऊन स्पर्धात्मक दरात शेतमाल विक्री करता येईल. त्यासाठी जागतिक पणन व्यवस्थेचा अभ्यास करून आवश्यक यंत्रणा उभारणीसाठी कार्यवाही करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ संचालक मंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. यावेळी मंडळाचे संचालक आ. चरणसिंग ठाकूर, संचालक सर्वश्री नारायण पाटील, संजय काजळे पाटील, प्रवीण कुमार नहाटा, कृषी पणन संचालक तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे व महाराष्ट्र राज्य पणन मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, शेतकऱ्यांच्या शेतमालाला स्पर्धात्मक दर मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील त्या क्षणाची स्थिती, शेतमालाची आवक आणि शेतमालाला मिळत असलेला भाव आदींची अद्ययावत माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तंत्रज्ञानाधारित सक्षम पणन व्यवस्था निर्माण करण्यासाठी विभाग प्रयत्नशील आहे. यासाठी जागतिक पणन व्यवस्थेचा अभ्यास करून यंत्रणा उभारली जाणार आहे. प्रत्येक क्षणाच्या बाजारभावाची माहिती उपलब्ध झाल्यास शेतमाल कोणत्या बाजारपेठेत स्पर्धात्मक दरात विकता येईल याबाबत शेतकऱ्याला निर्णय घेणे अधिक सुलभ होईल, असे त्यांनी सांगितले.
देशांतर्गत शेतमालाची उपलब्धता तसेच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दर यासंदर्भातील माहितीच्या उपलब्धतेअभावी अनेकदा अफवा पसरवून शेतमालाचे भाव पाडले जातात. त्यामुळे शेतकरी आणि ग्राहक दोघांचेही नुकसान होते. या पार्श्वभूमीवर राज्याची पणन व्यवस्था सक्षम करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक क्षणाची माहिती अद्यावत ठेवणे व ती प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने जगातील सर्वोत्कृष्ट व अद्यावत तंत्रज्ञानाने युक्त प्रकल्प बनवण्यासाठी आराखडा तयार करावा. आशियाई विकास बँकेच्या साहाय्याने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. प्रत्येक फळ व भाजीपाला पिकाच्या हंगामातील उपलब्धता आणि बाजारभावाची माहिती समाजमाध्यमे व इतर प्रसिद्धी माध्यमांतून व्यापकपणे प्रसारित करावी. भौगोलिक मानांकनानुसार ब्रॅण्डिंग करून त्या उत्पादनांचा प्रभावी प्रचार-प्रसार करावा, असेही त्यांनी सांगितले.
फळे, भाजीपाला व इतर शेतमाल विक्री व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मार्गदर्शन मेळावे आयोजित करावेत. या माध्यमातून उत्पादक, विक्रेते व निर्यातदारांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांची माहिती देऊन मार्गदर्शन करावे. ज्या भौगोलिक परिसरात जे पीक घेतले जाते, त्या ठिकाणीच संबंधित मेळावे घ्यावेत. आंबा महोत्सव, संत्रा महोत्सव, मिलेट महोत्सव असे विविध विभागनिहाय महोत्सव आयोजित करून प्रत्येक पिकाच्या बाजारपेठेबाबत सविस्तर माहिती उपलब्ध करून द्यावी. कृषी प्रदर्शनांमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यावरही भर द्यावा, असे मंत्री रावल यांनी सांगितले. राज्यातील काजू उत्पादनाला चालना देण्यासाठी ठाणे जिल्ह्यासह काजू उत्पादक क्षेत्रात १० हजार मेट्रिक टन क्षमतेचे जास्तीत जास्त काजू साठवणूक गोदाम उभारण्याबाबत कार्यवाही करावी, असे निर्देश पणनमंत्री रावल यांनी दिले.
बैठकीत बापगाव (ठाणे) व काळडोंगरी (नागपूर) येथील सुधारित प्रकल्प अहवाल शासनास सादर करण्याबरोबरच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजना, अत्याधुनिक संत्रा केंद्र उभारणी, अंशदान व कर्ज वसुली, प्रशिक्षण योजना, देशांतर्गत व्यापार विकास, बाजार समिती बळकटीकरण, काजू प्रक्रिया प्रकल्प आदी विषयांवर सविस्तर चर्चा करुन आवश्यक निर्देश देण्यात आले.
हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…
कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…
1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…
मुंबई : कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळावे आणि नोकरी सोडल्यानंतर देय रक्कम मिळण्यासाठी होणारा विलंब टाळावा,…
मुंबई: प्रसिद्ध नाटककार प्रदीप कबरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या 'खिडकी' या पुस्तकातील निवडक अनुभवांवर आधारित…
बारामतीत विकासकामांच्या पाहणीदरम्यान थांबवला ताफा; जखमी तरुणीच्या उपचारासाठी अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना बारामती: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित…