राजकीय

रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला; गोगावलेंच्या नावावर शिक्कामोर्तब, तटकरेंचा नवा डाव?

मुंबई : अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी मंत्री भरत गोगावले यांच्याकडे सोपवण्यात आली असून, नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी मंत्री गिरीश महाजन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी रस्सीखेच सुरू होती. मंत्री आदिती तटकरे या रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही होत्या, तर भरत गोगावले यांनीही या पदावर आपला दावा कायम ठेवला होता.

रायगडच्या पालकमंत्रिपदाचा हा संघर्ष केवळ मंत्रिपदापुरता मर्यादित नव्हता, तर जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वाचा मुद्दाही त्यामागे असल्याचे चित्र होते. रायगडमध्ये तटकरे कुटुंब आणि शिवसेना यांच्यातील राजकीय संघर्ष गेल्या काही काळात अधिक तीव्र झाला आहे.

अनिकेत तटकरे यांच्या आमदारकीनंतर चर्चांना उधाण

स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत आदिती तटकरे यांचे बंधू अनिकेत तटकरे रायगडमधून निवडणूक लढवत होते. त्यावेळी शिवसेनेतील काही नेत्यांकडून त्यांच्या उमेदवारीला विरोध करण्यात आला होता. आमदार महेंद्र दळवी यांनी आपल्या मुलीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते.

मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तटकरे यांना पाठिंबा दिल्यानंतर अनिकेत तटकरे यांच्या बिनविरोध आमदारकीचा मार्ग मोकळा झाला आणि महेंद्र दळवींना माघार घ्यावी लागली. त्यानंतर तटकरे कुटुंबाने आमदारकीच्या बदल्यात रायगडच्या पालकमंत्रिपदावरील दावा सोडण्याचे मान्य केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आली नव्हती.

दरम्यान, या घडामोडीनंतर भरत गोगावले यांनी आपणच रायगडचे पालकमंत्री होणार असल्याचे ठामपणे सांगितले होते. अखेर पालकमंत्रिपदासाठी गोगावले यांच्या नावाची घोषणा झाल्याने त्यांच्या भूमिकेला बळ मिळाले आहे.

पालकमंत्रिपद शिवसेनेकडे; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

रायगडच्या राजकारणात गेल्या काही काळापासून तटकरे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्यावर शिवसेनेचे स्थानिक नेते सातत्याने टीका करताना दिसले आहेत. आमदार महेंद्र दळवी आणि भरत गोगावले यांनीही अनेकदा तटकरेंविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

आता रायगडचे पालकमंत्रिपद शिवसेनेकडे गेल्याने शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गोगावले यांच्या समर्थकांसाठी हा निर्णय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.

पालकमंत्रिपद गेले, पण तटकरेंची ताकद कायम

पालकमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातातून गेले असले तरी रायगडमधील तटकरे कुटुंबाचे राजकीय वर्चस्व कायम असल्याचे चित्र आहे. सुनील तटकरे हे खासदार, आदिती तटकरे मंत्री, तर अनिकेत तटकरे विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यामुळे पालकमंत्रिपद हातातून गेले तरी जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर तटकरे कुटुंबाचा प्रभाव कायम राहणार आहे.

उलट, पाच वर्षांच्या कार्यकाळातील पालकमंत्रिपद पूर्णपणे शिवसेनेकडे राहण्याऐवजी सध्याच्या राजकीय समीकरणांमुळे त्यातील मोठा कालावधी राष्ट्रवादीकडे राहिला, अशीही चर्चा आहे. अनिकेत तटकरे यांची बिनविरोध आमदारकी करून घेताना तटकरेंनी राजकीयदृष्ट्या महत्त्वाची चाल खेळल्याचेही रायगडच्या राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

त्यामुळे पालकमंत्रिपद गोगावलेंकडे गेले असले तरी रायगडच्या राजकारणातील तटकरे विरुद्ध शिवसेना संघर्ष संपलेला नसून, आगामी काळात तटकरे कोणता नवा राजकीय डाव टाकतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूरचा शेतकरी दुष्काळात होरपळतोय; लोकप्रतिनिधी वाढदिवसाच्या जल्लोषात; फ्लेक्स, बॅनर अन् वाढदिवसाच्या उधळपट्टीवर शेतकऱ्यांचा संताप…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यावर दुष्काळाचे ढग दाटले आहेत. खरीप हंगामाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला…

12 तास ago

शिरूर गोळ्यांच्या आवाजाने हादरतोय; पाच घटनांमध्ये तिघांचा मृत्यू, एकाचा गंभीर मारहाणीत बळी…

शिरूर (तेजस फडके) : शांत, शेतीप्रधान तालुका म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्याची ओळख आता गुन्हेगारीच्या…

15 तास ago

शिरूर तालुक्यातील दोन हवालदारांवर एसीबीची कारवाई; एकाने घेतली लाच तर दुसरा झाला पसार…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस ठाण्याअंतर्गत टाकळी हाजी पोलिस हवालदारांनी लाच मागितल्याच्या दोन स्वतंत्र प्रकरणांवर…

15 तास ago

शिरूर तालुक्यात भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू; एक जखमी…

मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…

1 दिवस ago

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

2 दिवस ago

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी; आणखी दोन महिने वाढवा

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…

2 दिवस ago