helpata-book
‘हेलपाटा’ ही तानाजी बबन धरणे (मु.आंबळे, ता.शिरूर, जि.पुणे) यांची वास्तव जीवनावर आधारीत ग्रामीण कादंबरी. लेखक ग्रामविकास अधिकारी म्हणून पं.स.रोहा,रायगड येथे कार्यरत आहेत. ते गीतकार, कवी,लेखक आहेत. त्यांची अनेक गीते यु ट्यूबवर आहेत. ‘शेताच्या बांधावर’, ‘सांजवेळ’, ‘सवप्नचित्र’ हे तीन कवितासंग्रह प्रकाशीत असून ‘चांदणं पेरीत जाऊ’ हा प्रकाशनाच्या वाटेवर आहे. ते अनेक पुरस्काराने सन्मानीत आहेत.
‘हेलपाटा’ ही कादंबरी तसे स्वकथन आहे.ती पी.आर.ग्रुप ऑफ पब्लिकेशन,वरुड जि.अमरावती यांनी प्रकाशीत केली असून प्रस्तावना दत्तात्रय पांडुरंग मानुगडे यांनी लिहीली असून , पाठराखण बाबाराव मडावी,आकांतकार, यवतमाळ यांनी केली आहे. सदर कादंबरी तळागाळातील असंख्य विद्यार्थी मित्रांना व पालकांना समर्पीत केली आहे. काही प्रतिक्रियांचाही यात समावेश केलेला आहे.
ग्रामीण भागातील मागील पिढीतील बहुतांश विद्यार्थ्यांच्या वाट्याला संघर्षच आलेला आहे. त्यांनी शून्यातून आपलं विश्व उभं केलं आहे. आतासारखी सर्व सुख सोई, अद्यावत साधने त्याकाळी अस्तीत्वात नव्हती. आई-वडील अशिक्षीत, दारिद्र्य पाचवीला पुजलेलं, पावलोपावली जगण्यासाठी करावा लागणारा संघर्ष. आज तेवढी बिकट परिस्थिती नाही. सर्व सोईसवलती, साधने, उपलब्ध आहेत. बालपणापासून मोबाईल,टी.व्ही.,वाहणे, पैसा,पुस्तके ,चैनीच्या वस्तू सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे सद्याच्या मुला/मुलींना जगण्यातला जीवघेणा संघर्ष फारसा वाट्याला येत नाही. अपवाद असू शकेल. पण चार-पाच दशकापूर्वी मात्र जगण्यासाठी भाकरी आणि भाकरीसाठी कष्ट,उपासमार,हेळसांड,कोसो दूर करावी भटकंती, अपमान सहन करीत या गावातून त्या गावात भटकंती करावी लागायची. त्याकाळी वंचितांसाठीचे शिक्षणाचे वारे जेमतेम वाहू लागले होते. गावातील लोक जास्त शिकलेले नसायचे. त्यामुळे मार्गदर्शन अभाव होता. शिक्षण घ्यायचे ठरविले तरी जगण्यासाठी कुटुंबाचा खर्च आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवितांना पालकांना कसरत करावी लागायची. मोजक्या पैशात कसेतरी दिवस काढावे लागायचे. पोटाला चिमटा घेऊन, प्रसंगी उपाशी राहून,रोजमजूरी करून विद्यार्थ्यांना स्वत:चे शिक्षण पूर्ण करावे लागायचे. शिक्षणासाठी शहरात वस्तीगृहात राहून किंवा रुम करून किंवा नातेवाईकांकडे राहावे लागायचे. त्यामुळे अवास्तव खर्चाला वाव नव्हता. गावातील कुणीतरी एखादा नोकरीत असला की त्याच्या सहा-याने,मार्गदर्शनातून जीवनाचा गाडा पुढे रेटायचा. असं हे जीवन होतं. ब-याच गोष्टीसाठी कार्यालयाचे,महाविद्यालयाचे,नोकरीसाठी मुलाखतीसाठी ‘हेलपाटे’ खावे/घ्यावे लागायचे.
एकूण अशीच परिस्थिती लेखकाच्याही जीवनात होती. लेखकाच्या घरी शेत नाही. खाणारे सात-आठ जीव.एका गावात कधीच काम मिळत नसल्याने वडील जेथे मिळेल तेथे साल धराचे. जेथे साल धरलं, तेच त्यांचं गाव असायचं. पुढील वर्षी दुस-या गावात पायी वारी करावी लागायची. परिस्थितीमुळे लेखकाचे वडील हुशार असूनही सातवीपर्यंतही शाळा शिकू शकले नाही. याची खंत लेखक व कुटुंबाला सतत वाटत राहायची. लेखकाचे वडील सातवी पास झाले असते तर ते कोणत्या तरी नोकरीत असते. जगण्यासाठी असा संघर्ष,पायपीट कुटुंबाच्या वाट्याला आली नसती, असे लेखक नमूद करतात. त्या काळात सामाजीक,आर्थीक विषमता होती. लेखक चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊनही चांगल्या शिक्षणासाठी परिस्थितीमुळे प्रवेश घेऊ शकत नाही. मग कमी पैशात ,कमी शिक्षणात लवकर नोकरी लागेल असे शिक्षण घ्यावे लागायचे. दहावी झाल्यावर डी.एड्. व्हायचे असे लेखक ठरवितो. पण दहाविचा निकाल लागताच शासनाचं शैक्षणिक धोरण बदलतं आणि डी.एड्. आता बाराविच्या पात्रतेवर केल्या गेलं. मग लेखक डी.एड्.चा मार्ग सोडून कृषी पदविकेसाठी प्रवेश अर्ज दाखल करतो. पण अकराविचे वर्ग सुरू होऊनही कृषी पदविका अभ्यासक्रमाची निवड यादी लागत नाही. त्यामुळे त्याची चिंता वाढते. तो शहरातील त्या महाविद्यालयात लीस्ट बघण्याकरीता बरेच ‘हेलपाटे’ मारतो. पण काही दिवसांनी यादी लागते आणि प्रथम क्रमांकावरच त्याचे नाव असते. त्यामुळे त्याला आनंद होतो. लोक विचारतात हुशार असून पाॅली, इंजीनीअरींगला का गेला नाही? तेव्हा तो सांगतो की, माझी आर्थीक परिस्थिती बरी नसल्याने मला तेथे प्रवेश घेता येत नाही.
लेखक कृषी पदविकेचे दोन वर्षे हलाखीच्या परिस्थितीत पूर्ण करतो. नंतर नोकरीसाठी प्रयत्न करतो. त्यावेळी जिल्हा निवड मंडळ असायचे. तो ग्रामसेवक या नोकरीसाठी आपली निवड व्हावी म्हणून ब-याच लोकांकडे ‘हेलपाटे’ मारतो. पण त्याचं कुणीही ऐकूण घेत नाही. तो स्वत: लेखी,तोंडी परीक्षा देतो. आणि एक दिवस त्याचे सर्व प्रयत्न फळास येतात. त्याला निवडीचं काॅल लेटर पोष्टाने घरी येतं. त्याला व कुटुंबाला अत्यानंद होतो.
त्याच्या भाऊ (वडील), बाई (आई), अण्णा(मोठा भाऊ),वहिणी, बहिणी या सर्वांचे स्वप्न लेखकाने पूर्ण केले असते. समाजात वडीलांचा व कुटुंबाचा मान सन्मान वाढतो. एरव्ही समाजातील लोक त्यांना मुद्दाम डिवचायचे,लागली का नोकरी म्हणून ?
मानवी जीवनात निश्चितच चढ-उतार, खाच-खडगे, वळणं येत असतात. पण आयुष्यात जर प्रयत्न,चिकाटी ,आत्मविश्वास असेल तर त्या परिस्थितीवर वर मात करीत आपले ध्येय गाठता येते. हेच या कादंबरीच्या लेखकाला आजच्या पिढीला सांगायचे असावे. असे वाटते. ही कादंबरी शोषीत,वंचीत,भटके,पिडीत,गरीब या लोकांची जीवनपद्धती व जीवनसंघर्ष अधोरेखीत करते. आजची परिस्थितीही नोकरीसाठी सोपी नाही.विविध शासकीय विभागांचे/आस्थापनांचे खाजगीकरण झाले आहे. शासकीय नोकर भरती बंद आहे . खरडेघासी बंद होऊन सर्व कामे संगणकावर होत असल्याने तेवढ्या माणसांची गरज भासत नाही. त्यामुळे नोकरी कुणा कुणाला मिळणार? चिकार पैसा खर्च करून आजच्या पिढीने उच्च शिक्षण घेतले आहे पण नोक-या नाही. कोटी युवक-युवती बेरोजगार आहेत. त्यामुळे त्यावेळची शिक्षणासाठी परिस्थितीही कठीणच आणि आज देखील नोकरीसाठी कठीणच आहे. ‘हेलपाटा’ ही कादंबरी ग्रामीण लोक जीवनाचा परिचय करून देते. ही लेखकाच्या वास्तव जीवनावर आधारीत कादंबरी आहे. लेखकाने आपल्या जडणघडणीचा खरतड प्रवास हुबेहुब वाचकांच्या समोर उभा केला आहे. त्यांनी जे भोगलं, पाहिलं, जगलं, अनुभवलं तेच यात शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. ही वास्तवस्थितीवर आधारलेली कादंबरी असून सामाजीक व्यवस्थेचं चित्र जसंच्या तसं उभं केलं आहे. त्यात लेखक ब-यापैकी यशस्वीही होतांना दिसतात. ही कादंबरी वाचताना प्रत्येकालाच असं वाटून जातं की, या घटना आपल्याच जीवनातील वास्तव आहे. आणि जेव्हा कोणतीही साहित्यकृती त्या लेखकाच्या,कविच्या हातून वाचकांच्या हाती जाते तेव्हा ती त्याची न राहाता ती सर्वांची होऊन जाते. आणि यातच लेखक व कविची खरी यशस्वीता असते. ही कादंबरी प्रत्येक ग्रामीण,गरीब विद्यार्थ्यांच्या खरतड जीवनाचं प्रतिनिधीत्व करते. नव्या पिढीला दिशा देण्याचं काम करते.लेखकाचा हा पहिलाच प्रयत्न यशस्वी झाल्यासारखा वाटतो. त्याबद्दल कौतुक आणि पुढील सकस लेखनासाठी तानाजी धरणे यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो.
◾कादंबरी : हेलपाटा
◾लेखक : तानाजी धरणे मो.९९७५३७०९१२
◾प्रकाशन:पी.आर.ग्रुप आॅफ पब्लिकेशन
◾प्रस्तावना: दत्तात्रय पांडुरंग मानुगडे
◾पाठराखण : बाबाराव मडावी,यवतमाळ
◾पृष्ठसंख्या : २४०
◾किंमत : ३००/- ₹
– अरुण हरिभाऊ विघ्ने, रोहणा, आर्वी, वर्धा
मुंबई: देशातील प्रतिष्ठित पत्रकार संघटनांपैकी एक असलेल्या Mumbai Press Club ने आपल्या तीन सदस्यांची हकालपट्टी…
मुंबई: राज्यातील पर्यटन क्षेत्र अधिक सक्षम, परिणामकारक आणि पर्यटकाभिमुख करण्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करणे, सेवांचा…
सोशल मीडियातून मैत्री करून लॉजवर नेऊन अत्याचार; अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल केल्याचा आरोप, १५ हून अधिक…
मुंबई: राज्यातील कामगार क्षेत्रातील कायदे अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण…
मुंबई: छत्रपती संभाजीनगर येथून कुटुंबासह मुंबईत पर्यटनासाठी आलेली ८ वर्षीय अनाबिया सुलतान मुस्ताक शेख ही…
मुंबई: गोरेगावमधील पत्रा चाळ रहिवाशांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात…