जप्त केलेला एमडी ड्रग्जचा मुद्देमाल काळ्या बाजारात विकल्याचा गंभीर आरोप
शिरूर (अरुणकुमार मोटे): पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांनी उघडकीस आणलेल्या तब्बल २० कोटी रुपयांच्या एमडी ड्रग्ज प्रकरणाने राज्याच्या पोलीस यंत्रणेला हादरवून सोडले आहे. या प्रकरणात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारीच ड्रग्ज रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याचा धक्कादायक खुलासा झाला असून, श्यामसुंदर रामदास गुजर (वय ३९, रा. नेप्ती, ता. नगर) याला अटक करण्यात आली आहे.
शिरूर तालुक्यात जप्त झालेल्या एमडी ड्रग्जच्या तपासादरम्यान या रॅकेटचे धागेदोरे थेट अहिल्यानगरपर्यंत पोहोचले. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने सखोल तपास केल्यानंतर समोर आले की, ड्रग्जचा पुरवठा करणारा व्यक्ती कोणताही सराईत गुन्हेगार नसून, स्वतः पोलीस दलातील कर्मचारी आहे. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गुजरला अहिल्यानगर पोलिस अधीक्षक कार्यालयातील स्थानिक गुन्हे शाखेतून ताब्यात घेतले.
जप्त मुद्देमालातूनच ड्रग्ज विक्री
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्यामसुंदर गुजर हा अहिल्यानगर जिल्ह्यात विविध कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेल्या एमडी ड्रग्जच्या मुद्देमालातून काही प्रमाणात ड्रग्ज बाहेर काढत होता. हे ड्रग्ज तो काळ्या बाजारात विकत असल्याचा गंभीर आरोप आहे. विशेष म्हणजे, संशय येऊ नये म्हणून तो ड्रग्जच्या जागी तितक्याच वजनाचा मैदा भरत असल्याची क्लृप्ती वापरत होता.
मुद्देमाल कक्षाची चावी आरोपीकडेच
गुजर हा स्थानिक गुन्हे शाखेत नार्को टेस्ट आणि अंमली पदार्थांच्या मुद्देमालाशी संबंधित काम पाहत होता. अहिल्यानगर पोलिस अधीक्षक कार्यालयात असलेल्या मुद्देमाल कक्षाची चावी अधिकृतपणे मुख्यालयात असणे अपेक्षित असताना, ती प्रत्यक्षात गुजरकडेच असल्याचे तपासात उघड झाले आहे. याचबरोबर संबंधित पत्रव्यवहार, नोंदी आणि हालचालींचे नियंत्रणही त्याच्याकडे होते.
संयुक्त तपास सुरू
अटक केल्यानंतर पुणे ग्रामीण आणि अहिल्यानगर पोलिसांकडून संयुक्त चौकशी सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक तपासातच गुजरचा सहभाग स्पष्ट करणारे अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत.
यापूर्वी किती वेळा ड्रग्ज बाहेर काढले?
किती प्रमाणात विक्री झाली?
ड्रग्ज कोणाला विकले गेले?
या रॅकेटमध्ये आणखी कोणी सहभागी आहे का?
या सर्व बाबींचा सखोल तपास सुरू आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कडक कारवाईचे संकेत
या घटनेमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाल्याची भावना व्यक्त होत असून, अहिल्यानगर पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुजरविरोधात कठोर विभागीय व फौजदारी कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. गरज भासल्यास त्याला सेवेतून बडतर्फ करण्याची प्रक्रिया राबवली जाईल, असेही सूत्रांनी सांगितले.
वादग्रस्त कारकीर्दीची पार्श्वभूमी
श्यामसुंदर गुजर यापूर्वी पारनेर पोलिस ठाण्यात कार्यरत असताना त्याची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. त्याच्याविरोधात सामाजिक संघटनांनी तक्रारी व निवेदने दिली होती. श्रीरामपूर आणि संगमनेरमधील कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणांशीही त्याचे संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पारदर्शक तपासाची मागणी
ड्रग्जविरोधी मोहिमांवर जनतेचा विश्वास असतो. मात्र, याच मोहिमांचा गैरवापर करून पोलीस कर्मचारीच ड्रग्ज रॅकेटचा भाग बनत असल्याने ही बाब संपूर्ण यंत्रणेवरचा काळा डाग मानली जात आहे. या प्रकरणात पूर्णपणे पारदर्शक तपास होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…