शिक्रापुर (ओंकार भोरडे) “माझे वडील तलवार घेऊन आई आणि मला मारण्यासाठी धावत आहेत… लवकर या…” डायल ११२ वर आलेल्या या आर्त मदतीच्या कॉलने शिक्रापुर पोलिसांची यंत्रणा क्षणार्धात सतर्क झाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत पोलिसांनी तातडीने धानोरे (ता.शिरुर) येथे धाव घेत हातात तलवार घेऊन पत्नी व मुलाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसांच्या या तत्पर आणि धाडसी कारवाईमुळे संभाव्य रक्तरंजित घटना टळली असून मायलेकरांचा जीव वाचला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्रापुर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल सुनील यशवंत शेंडगे हे ६ जुलै रोजी डायल ११२ कर्तव्यावर कार्यरत होते. मंगळवारी सकाळी सुमारे १०:१६ वाजण्याच्या सुमारास साहिल खराबे याचा डायल ११२ वर मदतीसाठी फोन आला. “माझे वडील तलवार घेऊन आई आणि माझ्या अंगावर धावत आहेत, आम्हाला मारण्याची धमकी देत आहेत,” अशी माहिती त्याने पोलिसांना दिली.
हा कॉल मिळताच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी घटनेचे गांभीर्य ओळखत तातडीने पथकाला घटनास्थळी रवाना होण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल सुनील शेंडगे यांनी वरिष्ठांना माहिती देत पोलीस कॉन्स्टेबल नितीन साळवे यांच्यासह धानोरे येथे तात्काळ धाव घेतली.
शिक्रापुर पोलिसांचे पथक अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचले असता, बाबासाहेब नामदेव खराबे (वय ४३) हा पत्नी व मुलाला शिवीगाळ व दमदाटी करत हातातील तलवार घेऊन त्यांच्या अंगावर धावत असल्याचे दिसून आले. परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण होती. मात्र, पोलिसांनी प्रसंगावधान राखत क्षणाचाही विलंब न करता त्याला शिताफीने ताब्यात घेतले.
यानंतर पोलिसांनी आरोपीची झडती घेतली असता त्याच्या पँटच्या खिशात धारदार चाकू आढळून आला. पोलिसांनी आरोपीकडून सुमारे ३० इंच लांबीची तलवार आणि धारदार चाकू असा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुनील शेंडगे यांच्या फिर्यादीवरुन बाबासाहेब नामदेव खराबे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम तसेच भारतीय हत्यार कायदा कलम अन्वये शिक्रापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिक्रापूर पोलीस करीत आहेत.
डायल ११२ मुळे मोठा अनर्थ टळला…
घरगुती वाद कधी जीवघेण्या स्वरुपात बदलू शकतो, याची जाणीव करुन देणारी हि गंभीर घटना आहे अशा परिस्थितीत नागरिकांनी घाबरुन न जाता तत्काळ डायल ११२ वर संपर्क साधल्यास पोलिसांची मदत वेळेत मिळू शकते, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. तसेच डायल ११२ यंत्रणा केवळ आपत्कालीन क्रमांक नसून संकटसमयी नागरिकांसाठी जीवनरक्षक आधार ठरत असल्याचे शिक्रापूर पोलिसांच्या या कारवाईतून अधोरेखित झाले आहे.
सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, शिवाजी भोसले, हनुमंत गिरी, पोलीस अंमलदार सुनील शेंडगे, नितीन साळवे, उद्धव भालेराव, प्रशांत गायकवाड, बापू हदगले, रोहिदास पारखे, मयूर कुंभार यांनी केली आहे.
करडे-कारेगाव रस्त्यावरील विजेचे खांब बनले जाहिरातींचे केंद्र; प्रशासनाचे दुर्लक्ष…?
शिरुर तालुक्यात लोकप्रतिनिधींची विकासकामे कमी ;पण सोशल मीडियावर प्रसिद्धीचा भडिमार जास्त
आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…
मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…
मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…
मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…
मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…
मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…