मुख्य बातम्या

शिरुर; बैलगाडा शर्यतीतील वादातून तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न; बाप-लेका विरुद्ध गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके): बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या वादाचा राग मनात धरून सणसवाडी येथील एका २७ वर्षीय तरुणाच्या दुचाकीला भरधाव महिंद्रा थार गाडीने समोरून धडक देत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या घटनेत चेतन गणपत हरगुडे आणि त्यांचा चुलत भाऊ अथर्व नवनाथ हरगुडे हे दोघे जखमी झाले असून, त्यांच्यावर वाघोली येथील लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी चेतन गणपत हरगुडे, (वय २७) रा. गव्हाळे वस्ती, सणसवाडी, ता. शिरूर, जि. पुणे यांनी शिक्रापुर पोलिस ठाण्यात संतोष मोडक आणि त्यांचा मुलगा प्रज्वल मोडक, दोघे (रा. वडकी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी संगनमत करुन जिवे मारण्याच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

चेतन हरगुडे हे सन २०२२ पासून जॉन डिअर कंपनीत नोकरी करीत असून, त्यांच्याकडे बैलगाडा शर्यतीत धावणारे बैल आहेत. हे बैल चेतन आणि त्यांचे मामा महेंद्र कुटे, रा. आव्हाळवाडी, ता. हवेली, जि. पुणे हे दोघे मिळून सांभाळतात.

माळशिरस येथील बैलगाडा शर्यतीतून वादाची ठिणगी…

दि. १० जुलै २०२६ रोजी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील ६१ फाटा, देशमुख पट्टा परिसरात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीसाठी चेतन हरगुडे यांचे मामा महेंद्र कुटे हे बैल घेऊन गेले होते. मात्र, शर्यतीमध्ये अपेक्षित क्रमांक न मिळाल्याने ते तेथून निघून आले.

दरम्यान, बैलगाडा मालक संतोष मोडक यांनी शर्यतीच्या स्टेजवरून हरगुडे यांच्या बैलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा प्रकार यूट्यूबवरील थेट प्रक्षेपणात पाहिल्यानंतर चेतन यांनी संतोष मोडक यांचा मोबाईल क्रमांक मिळवून त्याच दिवशी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांना फोन केला. “आमच्या बैलांबाबत चुकीचे वक्तव्य करणे योग्य नाही,” अशी विचारणा केली असता संतोष मोडक यांनी फोनवरून शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचे चेतन यांनी जबाबात म्हटले आहे.

“आता हा आपला वैयक्तिक वाद” म्हणत धमकी…

दि. ११ जुलै २०२६ रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास संतोष मोडक यांनी पुन्हा फोन करून, “काल झाले ते झाले; येथून पुढे हा आपला वैयक्तिक वाद आहे,” असे म्हणत शिवीगाळ केली आणि मारहाण करण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यतीतील वाद हा केवळ शाब्दिक चकमकीपुरता मर्यादित न राहता वैयक्तिक भांडणात बदलल्याचे तक्रारीतून दिसून येत आहे.

आजोबांच्या निधनाच्या दुःखात असतानाच काळ्या थारच्या संशयास्पद फेऱ्या…

दि १२ जुलै २०२६ रोजी चेतन हरगुडे यांच्या आजोबांचे निधन झाल्याने कुटुंबीय आणि नातेवाईक त्यांच्या घरी जमले होते. त्याचवेळी घरासमोरील रस्त्यावरून काळ्या रंगाची, नंबरप्लेट नसलेली महिंद्रा थार गाडी वारंवार ये-जा करीत असल्याचे निदर्शनास आले. मात्र, कुटुंब दुःखात असल्यामुळे सुरुवातीला त्या वाहनाकडे विशेष लक्ष दिले नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दुपारी सुमारे २ वाजून २० मिनिटांनी सोनू घुले यांनी चेतन यांचे मामा महेंद्र कुटे यांना संतोष मोडक यांच्यासोबत कॉन्फरन्स कॉलवर घेतले. या संभाषणात संतोष मोडक यांनी, “माझा मुलगा प्रज्वल घरी नाही. तो माझी थार गाडी घेऊन गेला असून त्याचा फोनही बंद आहे. चेतनला घरातच थांबायला सांगा. त्याने मला बोलल्याचा प्रज्वलला राग आहे,” असे सांगितल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. या संभाषणानंतर अवघ्या काही मिनिटांतच हि दुर्घटना घडल्याने संपुर्ण प्रकरण अधिक गंभीर आणि संशयास्पद बनले आहे.

औषधे घेऊन परतताना समोरून जोरदार धडक…

दुपारी सुमारे २ वाजून २५ मिनिटांनी चेतन हरगुडे हे आपली ॲक्टिव्हा स्कूटर घेऊन चुलत भाऊ अथर्व नवनाथ हरगुडे यांच्यासह सणसवाडी येथे औषधे आणण्यासाठी गेले होते. औषधे घेऊन घराकडे परतत असताना डोंगरवस्ती रोड चौकात समोरून भरधाव वेगात आलेल्या काळ्या रंगाच्या महिंद्रा थार गाडीने त्यांच्या स्कूटरला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की चेतन आणि अथर्व हे दोघेही रस्त्यावर फेकले गेले.

धडक दिलेली थार गाडी प्रज्वल मोडक चालवत असल्याचे आपण पाहिल्याचा दावा चेतन हरगुडे यांनी आपल्या जबाबात केला आहे. अपघातानंतर थार चालकाने थांबून मदत न करता वाहनासह तेथून पळ काढल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दोघांनाही गंभीर दुखापत; वाघोलीत उपचार

या धडकेनंतर चेतन आणि अथर्व हे दोघेही जखमी अवस्थेत रस्त्यावर पडले होते. घटनास्थळी जमा झालेल्या नागरिकांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर दुखापती गंभीर असल्याने दोघांनाही पुढील उपचारासाठी वाघोली येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी चेतन हरगुडे यांचा रुग्णालयात उपचार सुरु असताना जबाब नोंदवला.

पूर्वनियोजित कटाचा संशय…

या घटनेपूर्वी झालेली फोनवरील धमकी, नंबरप्लेट नसलेल्या थार गाडीच्या घराजवळ सुरू असलेल्या संशयास्पद फेऱ्या, प्रज्वल मोडक थार घेऊन घराबाहेर पडल्याची माहिती आणि त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत चेतन यांच्या स्कूटरला समोरून दिलेली धडक, या सर्व घटनाक्रमामुळे हा साधा रस्ता अपघात नसून पुर्वनियोजित हल्ला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. संतोष मोडक आणि प्रज्वल मोडक यांनी संगनमत करून बैलगाडा शर्यतीतील वादाचा राग मनात धरला आणि प्रज्वलने जिवे मारण्याच्या उद्देशाने थार गाडी स्कूटरवर घातल्याचा स्पष्ट आरोप चेतन हरगुडे यांनी केला आहे.

पोलिसांच्या तपासाकडे लक्ष…

या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक भोसले करीत आहेत. फोन कॉलचे रेकॉर्डिंग, कॉल डिटेल्स, यूट्यूबवरील बैलगाडा शर्यतीचे थेट प्रक्षेपण, घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, थार गाडीची ओळख आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब हे पुरावे तपासासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

बैलगाडा शर्यतीतील वादातून एखाद्या तरुणाला वाहनाने चिरडण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे पोलिसांनी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जखमींच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कवठे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

शिरूर (अरुणकुमार मोटे): अष्टविनायक महामार्गावरील कवठे येमाई येथील घोडे वस्ती नजीक वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यूमुखी पडल्याची…

6 तास ago

रांजणगाव MIDC मधील कंपन्यांची तातडीने सुरक्षा तपासणी करा; नानासाहेब लांडे

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC परिसरातील हजारो कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला…

9 तास ago

शिरुर पोलिसांचा आलेगाव पागा येथे अवैध गावठी दारु अड्डयावर छापा; एकावर गुन्हा दाखल

न्हावरे (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील आलेगाव पागा येथे राहत्या घरासमोरील पत्र्याच्या शेडच्या आडोशाला बेकायदेशीरपणे गावठी…

9 तास ago

शिक्रापुर पोलिसांनी आठवडा बाजारात चोरट्यांचा डाव उधळला; दोन सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात

शिक्रापुर (ओमकार भोरडे) कोरेगाव भीमा येथील आठवडा बाजारातील गर्दीचा फायदा घेत चोरी करण्याच्या तयारीत असलेल्या…

12 तास ago

शिक्रापुरात खाकीतील माणुसकीचा झरा! पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांनी तीन वर्षीय चिमुकलीला दिले जीवदान

शिक्रापुर (अरुणकुमार मोटे) शिक्रापुर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांनी दाखविलेल्या प्रसंगावधान आणि संवेदनशीलतेमुळे…

1 दिवस ago

घोड धरणात 82 टक्के पाणीसाठा, उजव्या आणि डाव्या कालव्यातुन शेतीसाठी पाणी सोडल्याने शेतकऱ्यांना दिलासा

शिंदोडी (तेजस फडके): शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतीला वरदान ठरलेल्या चिंचणी (ता. शिरुर) येथील घोड…

1 दिवस ago