मुख्य बातम्या

चासकमान डाव्या कालव्यातुन ६०० क्युसेकचा विसर्ग; खाली पोहचते १८० क्युसेकने पाणी मग ४२० क्युसेक पाणी नक्की जाते कुठे…?

धरणापासून अस्तरीकरण करण्याऐवजी टेलकडून काम सुरु करण्याचा घाट; प्रशासन आणि राजकीय नेतृत्वाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह…?

शिरूर (तेजस फडके) : शिरुर आणि खेड तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी जीवनवाहिनी ठरणाऱ्या चासकमान डाव्या कालव्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, धरणातून सुमारे ६०० क्यूसेक वेगाने सोडण्यात येणाऱ्या पाण्यापैकी शिरुर तालुक्यातील मुखईपर्यंत अवघे १८० क्यूसेक पाणी पोहोचत असल्याचा गंभीर दावा कालव्याच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर करण्यात आला आहे.

धरणापासुन मुखईपर्यंतच्या सुमारे ६८ किलोमीटरच्या अंतरात तब्बल ४२० क्यूसेक पाणी गळती, झिरपणे, कालव्यातील मलबा आणि व्यवस्थापनातील त्रुटींमुळे नष्ट होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. न्हावरे येथील सामाजिक कार्यकर्ते सागर खंडागळे यांनी त्यांचे सहकारी तात्यासाहेब सोनावणे, आशुतोष बेंद्रे, विशाल झेंडे आणि बाळासाहेब बेंद्रे यांच्यासह मंगळवारी चासकमान धरणापासुन ७२ किलोमीटरपर्यंत डाव्या कालव्याची कालवा मार्गाने प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान कालव्याची दुरवस्था, पाण्याची मोठ्या प्रमाणात होणारी गळती, कालव्यात साचलेला माती-दगडांचा मलबा आणि पाणीवाटपातील गंभीर विसंगती निदर्शनास आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

६०० पैकी ४२० क्युसेक पाण्याचा हिशेब कोण देणार…?
चासकमान धरणातुन डाव्या कालव्यात सुमारे ६०० क्युसेक पाणी सोडले जात असताना ६८ किलोमीटरवरील मुखई परिसरात केवळ १८० क्युसेक पाणी पोहोचत असल्याचा दावा पाहणी पथकाने केला आहे. त्यानंतर टेलपर्यंत पोहोचेपर्यंत पाण्याची पातळी आणखी घटून सुमारे १०० क्युसेकपर्यंत येत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे धरणातुन सोडण्यात आलेले उर्वरित पाणी नेमके कुठे जाते. कालव्याच्या कोणत्या भागात किती गळती होते, किती पाणी अनधिकृतरीत्या उचलले जाते आणि किती पाणी व्यवस्थापनातील त्रुटींमुळे वाया जाते, याचा तपशीलवार आणि पारदर्शक हिशेब प्रशासनाने जनतेसमोर मांडावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

टेल भागातील शेतकऱ्यांची कायम पाण्यासाठी ओढाताण…
कालव्याच्या सुरुवातीच्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्यामुळे टेल भागापर्यंत अपेक्षित प्रमाणात पाणी पोहोचत नाही. परिणामी निमोणे, इनामगावसह टेल परिसरातील अनेक गावांतील शेतकऱ्यांना प्रत्येक आवर्तनात पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. चासकमान धरणात पाणी उपलब्ध असतानाही कालव्याच्या दुरवस्थेमुळे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत ते पोहोचत नसेल, तर ही केवळ तांत्रिक चूक नसून प्रशासनाच्या निष्क्रियतेची आणि नियोजनशून्य कारभाराची शोकांतिका असल्याची संतप्त प्रतिक्रिया पाहणी करणाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

कालव्यात दगड, माती आणि मलब्याचे साम्राज्य…
पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी कालव्यात मोठ्या प्रमाणात दगड, माती, गाळ आणि मलबा साचल्याचे निदर्शनास आले. काही भागांत कालव्याच्या भिंती आणि तळाची झीज झाल्याने पाणी मोठ्या प्रमाणात झिरपत असल्याचेही दिसून आल्याचा दावा करण्यात आला आहे. अनेक वर्षे नियमित देखभाल, गाळ काढणे, दुरुस्ती आणि गळती रोखण्याची कामे प्रभावीपणे झाली नसल्याने कालव्याची वहनक्षमता मोठ्या प्रमाणात घटली आहे. दोन तालुक्यांची जीवनवाहिनी असलेल्या या कालव्याच्या दुरवस्थेला चासकमान प्रशासनाचा गलथान कारभार आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अस्तरीकरणाची खरी गरज धरणापासून मुखईपर्यंत…
कालव्यामधून वाया जाणारे सुमारे ४२० पाणी वाचवायचे असेल, तर अस्तरीकरणाचा पहिला टप्पा धरणापासून मुखईपर्यंतच्या सर्वाधिक गळती असलेल्या भागात राबविणे अत्यावश्यक असल्याचे पाहणी करणाऱ्यांचे म्हणणे आहे.

प्रशासनाने प्रथम संपूर्ण कालव्याचे तांत्रिक आणि जललेखापरीक्षण करावे. कोणत्या किलोमीटरमध्ये किती गळती होते, कालव्याची मूळ वहनक्षमता किती आहे, प्रत्यक्ष वहन किती आहे आणि कोणत्या भागाला सर्वप्रथम अस्तरीकरणाची आवश्यकता आहे, हे वैज्ञानिक पद्धतीने निश्चित करावे. त्यानंतरच प्राधान्यक्रमानुसार निधी खर्च केला पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे.

जिथे पाणीच पोहोचत नाही, तिथून अस्तरीकरण कशासाठी…?
कालव्याच्या सुरुवातीच्या भागात सर्वाधिक गळती होत असताना अस्तरीकरणाची कामे टेलकडील निमोणे परिसरापासून सुरु करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित कामांची निविदा प्रक्रियाही पुर्ण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

मात्र, धरणातुन निघालेले पाणी टेलपर्यंत अपेक्षित क्षमतेने पोहोचतच नसेल, तर सर्वाधिक गळती असलेला सुरुवातीचा भाग सोडून शेवटच्या टप्प्यात अस्तरीकरण करण्यामागील तांत्रिक निकष काय आहेत, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. “अस्तरीकरण करायचे म्हणून कुठेही करू नका. जिथे सर्वाधिक गळती आहे, तिथे प्रथम काम करा. त्यानंतर टेल भागातील अस्तरीकरणही करा,” अशी स्पष्ट भूमिका पाहणी पथकाने मांडली आहे.

निधी खर्च करण्यासाठी काम की पाणी वाचविण्यासाठी…?
शासनाने मंजूर केलेला निधी केवळ खर्च करण्यासाठी वापरायचा आहे की प्रत्यक्षात पाणी वाचवून शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यायचा आहे, हा मूलभूत प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. गळतीच्या तांत्रिक अभ्यासाशिवाय, कालव्याच्या प्रत्यक्ष स्थितीचे सर्वेक्षण न करता आणि पाण्याच्या प्रवाहाचा वैज्ञानिक अभ्यास न करता अस्तरीकरणाची कामे निश्चित केली जात असतील, तर ती प्रक्रिया संशयास्पद ठरते. कोणाच्या दबावाखाली किंवा कोणाच्या हितासाठी प्राधान्यक्रम ठरविण्यात आला, याची चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी करण्यात आली आहे.

आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय…
चासकमान धरणापासुन मुखईपर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी गळतीमुळे वाया जात असताना प्रशासन मात्र टेलकडील भागात अस्तरीकरणाची कामे करण्याच्या तयारीत असल्याने, “आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय,” अशी परिस्थिती निर्माण झाल्याची टीका संतप्त शेतकरी करत आहेत. प्रशासनाची सुमार नियोजनपद्धती आणि काही राजकीय नेत्यांचा ठेकेदारी व टक्केवारीकडे झुकलेला दृष्टिकोन यामुळे शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी वाया जात असल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला.

आमदार माऊली कटके आणि अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घ्यावी…
शिरुर-हवेलीचे आमदार माऊली कटके आणि चासकमान प्रकल्पाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रश्नाची तातडीने दखल घ्यावी. अस्तरीकरणाच्या मंजूर कामांचा प्राधान्यक्रम पुन्हा तपासावा आणि धरणापासून टेलपर्यंत संयुक्त तांत्रिक पाहणी करून सर्वाधिक गळती असलेल्या भागात प्रथम काम सुरु करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. एक चुकीचा प्रशासकीय किंवा राजकीय निर्णय हजारो शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त करु शकतो. त्यामुळे अस्तरीकरणाचा निर्णय ठेकेदार, राजकीय दबाव किंवा निधी खर्चाच्या निकषावर नव्हे, तर प्रत्यक्ष गळती, पाण्याची बचत आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या आधारावर घेण्यात यावा, असेही स्पष्ट करण्यात आले.

टेलच्या भागातील शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या…
1) चासकमान डाव्या कालव्याचे धरणापासून ७२ किलोमीटरपर्यंत तातडीने जललेखापरीक्षण करावे.
2) प्रत्येक किलोमीटरवरील पाण्याचा प्रवाह आणि गळती मोजून अहवाल जाहीर करावा.
3) धरणापासून मुखईपर्यंतच्या सर्वाधिक गळती असलेल्या भागाला अस्तरीकरणात प्रथम प्राधान्य द्यावे.
4) अस्तरीकरणाच्या निविदा आणि प्राधान्यक्रमामागील तांत्रिक निकष सार्वजनिक करावेत.
5) कालव्यातील दगड, माती, गाळ आणि मलबा तातडीने काढावा.
6) अनधिकृत पाणीउपसा होत असल्यास त्यावर कठोर कारवाई करावी.
7) कालव्याच्या देखभाल-दुरुस्तीतील निष्काळजीपणाची जबाबदारी निश्चित करावी.
8) धरणातुन सोडलेले आणि टेलपर्यंत पोहोचलेले पाणी याचा दैनंदिन तपशील सार्वजनिक करावा.

चासकमान प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला नाही, तर धरणात पाणी असूनही टेल भागातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी झगडावे लागेल. त्यामुळे आता केवळ आश्वासने नकोत, तर पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब आणि प्रत्यक्ष कृती आवश्यक आहे.
सागर खंडागळे

(सामाजिक कार्यकर्ते) 

चासकमानला जमिनी जाऊनही सणसवाडीकर पाण्यापासून वंचित

शिरुर; ‘हेड टू टेल’ आणि ‘टेल टू हेड’ समजायला विद्यमान आमदारांना अजुन काही दिवस लागतील”; अशोक पवार

शिरुरमध्ये माऊली कटके यांच्याविरोधात नाराजीचा सुर…? सोशल मीडियापासून कार्यकर्त्यांपर्यंत असंतोषाची चर्चा

शिरुर तालुक्यासाठी 1100 कोटींच्या सिंचन प्रकल्पाला गती; सिंचन भवनात महत्त्वपूर्ण आढावा बैठक

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘महिला आरक्षण, मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा’च्या चर्चा अफवा; शिंदे ‘चोरीचा माल’ घेऊन शाहांकडे गेले; संजय राऊत

रामरक्षा आंदोलन, राष्ट्रवादी-एनडीए चर्चांपासून ते शिंदे-शाह भेटीपर्यंत अनेक मुद्द्यांवर राऊतांची सडेतोड प्रतिक्रिया   नागपूर: 18…

3 मिनिटे ago

Video: शिरूर तालुक्यात स्वीट होममधील कामगाराला बेदम मारहाण…

शिरूर (तेजस फडके): समोसे देण्याच्या कारणावरुन झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना कारेगाव (ता.…

43 मिनिटे ago

जि.प. शाळा सोनेसांगवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेत यशाची भरारी…

शिरूर (नितीन थोरात) : सन 2025 -26 या शैक्षणिक वर्षात झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी चमकदार…

4 तास ago

अमित शाह-शिंदे भेटीत विकासावर भर; शिवसेनेच्या ६ खासदारांच्या मतदारसंघांना केंद्राकडून गतीचे आश्वासन

नवी दिल्ली : 'उबाठा' गटातून शिवसेनेत प्रवेश केलेल्या सहा खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली…

14 तास ago

राज्यातील १९ महाविद्यालयांत १८ महिन्यांत सौरऊर्जा प्रकल्प; चंद्रकांत पाटील यांचे कामांना गतीचे निर्देश

मुंबई: राज्यातील छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि नांदेड जिल्ह्यातील १९ महाविद्यालयांमध्ये पुढील १८ महिन्यांत सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात…

14 तास ago

अकरावी प्रवेशाची नवी संधी; 16 जुलैपासून पुढील फेरी, सुधारित वेळापत्रक जाहीर

मुंबई: अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील नियमित तीन आणि विशेष दोन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरही प्रवेश…

14 तास ago