शिरुर (तेजस फडके) सध्या शिरुर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर विद्यमान आमदार माऊली कटके आणि माजी आमदार अशोक पवार हे आमनेसामने आले असुन चासकमान कालव्याच्या पाणीवाटप आणि अस्तरीकरणाच्या मुद्द्यावर “हेड टू टेल आणि टेल टू हेड समजायला विद्यमान आमदारांना अजून काही दिवस लागतील” अशी घणाघाती टिका माजी आमदार अशोक पवार यांनी कटके यांच्यावर केली.
पिंपरी दुमाला (ता.शिरुर) येथे प्रचारासाठी आल्यानंतर पवार यांनी ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ शी बोलताना सांगितले की विद्यमान आमदारांनी शिरुर तालुक्यात चासकमानच्या आवर्तनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे टेलच्या भागात असलेल्या अनेक गावात पाण्याअभावी ऐन उन्हाळ्यात उभी पिके जळून गेली. तसेच चासकमान धरणातुन म्हणजेच खेड तालुक्यातील सुरवातीच्या ज्या भागात 500 क्युसेसने चासकमान कालव्याला पाणी सोडले जाते. त्या ठिकाणी पाण्याची गळती जास्त आहे. अस्तरीकरणाची खरी गरज तिथे आहे. परंतु विद्यमान आमदार टेलच्या भागात अस्तरीकरण करणार असे म्हणतं आहेत त्यामुळे त्यांना हेड अन टेल कळायला अजुन काही दिवस जातील असा टोला पवार यांनी लगावला.
टेलच्या भागात अस्तरीकरणाला शेतकऱ्यांचा विरोध…
चासकमान कालव्याच्या टेल (शेवटच्या) भागात अस्तरीकरण करण्यास अनेक शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, ज्या भागात पाण्याचा अपव्यय, गळती किंवा तांत्रिक अडचणी गंभीर आहेत, त्या हेड (सुरुवातीच्या) भागाकडे प्रथम लक्ष देणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत टेल भागातील अस्तरीकरणाचा आग्रह धरणे म्हणजे “जखम शेंडीला आणि मलम मांडीला” लावण्यासारखे असल्याची प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
आमदार माऊली कटके यांच्या भुमिकेकडे लक्ष…
दरम्यान, या विषयावर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु असतानाच शेतकऱ्यांची मुख्य अपेक्षा मात्र स्पष्ट आहे. कोणाचे श्रेय आणि कोणाचा आरोप यापेक्षा शेतात वेळेवर व पुरेसे पाणी पोहोचणे अधिक महत्त्वाचे असल्याचे अनेक शेतकरी सांगत आहेत. आता या वादावर विद्यमान आमदार माऊली कटके काय भुमिका मांडतात, तसेच प्रशासन या अस्तरीकरणाबाबत कोणता निर्णय घेते, याकडे संपुर्ण शिरुर तालुक्याचे लक्ष लागले आहे.
(क्रमश:)
शिरुर बाजार समिती निवडणुक; अशोक पवारांवर टिका करणाऱ्या माऊली कटकेंनी दिड वर्षात काय केले…?
रांजणगाव पोलिसांची संवेदशीलता; जबरी चोरीनंतर अपघाती मृत्यू झालेल्या महिलेला दिला न्याय