चासकमानला जमिनी जाऊनही सणसवाडीकर पाण्यापासून वंचित

शिरूर तालुका

सणसवाडी पाझर तलावासह विहिरी देखील कोरड्या ठणठणीत

शिक्रापूर (शेरखान शेख): चासकमान कळव्यासाठी ज्या ज्या गावातील शेतकऱ्यांच्या व गावच्या जमिनी गेल्या आहे. त्या गावांना व शेतकऱ्यांना चासकमानचे पाणी मिळणे गरजेचे असताना देखील सणसवाडीत शेकडो एकर जमिनी चासकमान साठी जाऊन देखील सणसवाडीकर चासकमानच्या हक्काच्या पाण्यापासून वंचित राहत आहे.

सणसवाडी (ता. शिरुर) येथे सन १९६२ साली शासनाच्या रोजगार हमी योजनेतून तलाव बांधण्यात आलेला असून सदर तलावातंर्गत तब्बल 60 विहिरी असून त्यामाध्यमातून शेजारील शेतकऱ्यांच्या शेतींचे सिंचन होते, तर जवळच नागरिकांना पाणी पुरवठा करणारी सहकारी पाणी वाटप संस्था आहे.

सणसवाडी गावातील शेकडो एकर जमिनी चासकमान प्रकल्पासाठी संपादित झालेल्या आहेत, चासकमानला जमिनी गेल्याने सणसवाडी ग्रामस्थांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळणे गरजेचे आहे. सध्या उन्हाळा वाढत असल्याने गावात पाणी टंचाई वाढलेली असताना शेतकऱ्यांची पिके जळून चाललेली आहे. त्यामुळे येथील तलावाला चासकमानचे पाणी सोडण्याची मागणी माजी उपसरपंच नवनाथ हरगुडे यांसह आदी ग्रामस्थांनी चासकमान विभागाकडे केली असून सणसवाडीच्या तलावात पाणी येणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

चासकमान धरणात साठा नसल्याने पाणी देणे शक्य नाही…

सणसवाडी (ता. शिरुर) येथील ग्रामस्थांच्या पाणी मागणी बाबत चासकमान विभागाचे शाखा अभियंता महेंद्र गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता सणसवाडी ग्रामस्थांनी पंधरा दिवसांपूर्वी पाण्याची मागणी करणे गरजेचे होते मात्र त्यांनी दोन दिवसात मागणी केली असून सध्या धरणात फक्त दहा टक्के पाणीसाठा असल्याने आता कोणाला पाणी देणे शक्य नसल्याचे चासकमान विभागाचे शाखा अभियंता महेंद्र गायकवाड यांनी सांगितले.