महाराष्ट्र

आंबेनळी घाट ४ दिवसांसाठी पूर्णपणे बंद; दरड, भूस्खलनाच्या धोक्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

रायगड (प्रतिनिधी): सह्याद्रीच्या कुशीत वसलेला पोलादपूर–महाबळेश्वर (आंबेनळी घाट) मार्ग मुसळधार पाऊस, दरड कोसळणे आणि भूस्खलनाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर ३ जुलै ते ६ जुलै २०२६ या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रायगड जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. याबाबतचे आदेश रायगड जिल्हाधिकारी किशन ना. जावळे यांनी अधिकृत अधिसूचनेद्वारे जारी केले आहेत.

राज्यातील अतिधोकादायक घाटांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा आंबेनळी घाट हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर आणि सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर यांना जोडणारा एक प्रसिद्ध आणि धोकादायक घाट आहे. हा घाट सह्याद्रीच्या डोंगररांगांमधून जातो आणि येथील तीव्र वळणे व खोल दऱ्यांसाठी ओळखला जातो. सुरक्षिततेच्या कारणास्तव, अनेकदा रात्रीच्या वेळी किंवा खराब हवामानात या घाटातून प्रवास करणे टाळण्याचा सल्ला दिला जातो.

सुरक्षेला प्राधान्य देत प्रशासनाचा निर्णय…

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (MSIDC), रायगड पोलीस, पोलादपूर तहसील कार्यालय आणि संबंधित यंत्रणांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित विभागांनी आंबेनळी घाटातील परिस्थिती अत्यंत धोकादायक असल्याचे नमूद करत सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्याची शिफारस केली होती.

आंबेनळी घाट का आहे धोकादायक…?

अधिसूचनेत नमूद केल्यानुसार, आंबेनळी घाट हा सह्याद्री पर्वतरांगेतील भूस्खलनप्रवण (Landslide Prone) आणि दरड कोसळण्यास प्रवण (Rockfall Prone) क्षेत्रात मोडतो.

1) घाट परिसरात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळण्याचा धोका.

2) उंच कड्यांवरुन मोठे दगड रस्त्यावर पडण्याची शक्यता.

3) झाडे मुळासकट उन्मळून रस्त्यावर पडण्याचा धोका.

4) नैसर्गिक नाले आणि ओढ्यांना पूर आल्याने रस्त्यावरुन पाण्याचा वेगवान प्रवाह.

5) भरावाची माती वाहून जाऊन रस्ता खचण्याची शक्यता.

6) दाट धुके आणि कमी दृश्यमानतेमुळे अपघाताचा धोका.

7) अतिवृष्टीमुळे अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता दुर्घटना घडण्याची शक्यता.

अशा अनेक गंभीर बाबींचा विचार करून प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

यापुर्वीही घडल्या आहेत दुर्घटना…

आंबेनळी घाटात पावसाळ्यात दरवर्षी दरड कोसळणे, झाडे पडणे आणि रस्ता वाहतुकीस अयोग्य होण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने यंदाही प्रतिबंधात्मक उपाय म्हणून घाट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

घाटात सुरु आहेत सुरक्षा सुधारणा…

सध्या घाट परिसरात विविध सुरक्षा कामे सुरू आहेत. त्यामध्ये

संरक्षक भिंती (Retaining Structures), क्रॅश बॅरिअर्स, ड्रेनेज सुधारणा, उतार स्थिर करण्याची कामे

इतर सुरक्षाविषयक उपाययोजना

यांचा समावेश आहे. मात्र प्रतिकूल हवामानामुळे या कामांवरही परिणाम होण्याची शक्यता असल्याने वाहतूक बंद ठेवण्यात येत आहे.

वाहतुकीसंदर्भातील महत्त्वाचे आदेश…

३ जुलै ते ६ जुलै २०२६ या कालावधीत आंबेनळी घाट सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. रायगड जिल्ह्यात ऑरेंज किंवा रेड अलर्ट जाहीर झाल्यास हलकी वाहनांची वाहतूकही पूर्णपणे बंद राहील. पावसाळ्यात रात्रीच्या वेळेत घाटातील सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीवर बंदी लागू राहणार.

आदेशाची अंमलबजावणी पोलीस, महसूल व संबंधित यंत्रणांमार्फत केली जाणार आहे.

असा असेल पर्यायी मार्ग…

घाट बंद असल्यामुळे वाहनचालकांनी पुढील पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे प्रशासनाने सांगितले आहे.

माणगाव–ताम्हिणी–पुणे–सातारा मार्ग

पोलादपूर–चिपळूण–पाटण–सातारा

–कोल्हापूर मार्ग

नागरिकांना प्रशासनाचे आवाहन…

रायगड जिल्हा प्रशासनाने पर्यटक, स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांना घाट परिसरात अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. हवामान विभागाच्या सूचना, पोलीस प्रशासनाचे निर्देश आणि वाहतूक व्यवस्थेचे पालन करुनच प्रवास करावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पत्रकार सन्मान योजना बंद नको; जाचक नियम हटवा, पात्र पत्रकारांना न्याय द्या!

राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…

7 तास ago

१८ लाख उमेदवारांच्या स्वप्नांना मिळणार आधार; ‘मिशन खाकी’चा शुभारंभ

मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…

7 तास ago

सामान्य कार्यकर्त्यापासून सत्ताकेंद्रापर्यंत; एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा वेध

संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…

7 तास ago

काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका; बीडसह खान्देशातील नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…

7 तास ago

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर मीनाक्षी शिंदेंचा पलटवार

ठाणे: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येशी माझा आणि माझ्या कुटुंबाचा कोणताही संबंध नाही. केवळ शिवसेना मुख्य नेते…

7 तास ago

ग्रामसभेत युवकाने प्रश्न विचारल्यावर माजी सरपंच संतापले अन् थेट भिडले…

जळगाव : जळगावच्या पाचोरा तालुक्यातील जारगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत धूर फवारणी यंत्राच्या मुद्द्यावरून वाद झाला. यावेळी…

18 तास ago