महाराष्ट्र

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत लाँगमार्च करत आलेल्या आणि दादर येथील काँग्रेस कार्यालयात रात्री विसावा घेत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या घटनेवरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. मध्यरात्री विद्यार्थ्यांना अटक करण्याची गरज काय, असा सवाल करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विद्यार्थ्यांसह NSUIचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंके आणि मुंबई NSUIचे अध्यक्ष प्रद्युम यादव यांची तत्काळ सुटका करण्याची मागणी केली. तसेच सुटका न झाल्यास काँग्रेसचे राज्यातील नेते आणि कार्यकर्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी घेराव घालतील, असा इशारा सपकाळ यांनी दिला.

आदिवासी विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईचा निषेध करत सपकाळ यांनी सरकारवर जोरदार टीका केली. काँग्रेसच्या टिळक भवन कार्यालयात पोलिसांना पाठवून विद्यार्थ्यांसह NSUIच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्याची कारवाई दंडेलशाही असल्याचा आरोप त्यांनी केला.

“आंदोलनासाठी आलेले हे विद्यार्थी काही गुन्हेगार आहेत का? आंदोलन करणे गुन्हा आहे का? अति तेथे माती हे लक्षात ठेवा. काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात मध्यरात्री पोलीस पाठवता, आमच्या कार्यालयात घुसलात; आता आम्ही वर्षा बंगल्यावर चाल करून जाऊ,” असा इशारा सपकाळ यांनी दिला.

आदिवासी विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा कोणताही प्रयत्न काँग्रेस सहन करणार नाही. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असेही सपकाळ यांनी स्पष्ट केले.

‘टिळक भवनभोवती बॅरिकेड्स, हे जंगलराज आहे का?’

मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनीही पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. टिळक भवनमध्ये पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, काँग्रेस कार्यालयात पोलिसांना पाठवून आदिवासी विद्यार्थ्यांवर कारवाई करणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शोभणारे नाही.

विद्यार्थी आपल्या हक्कांसाठी आणि न्यायाच्या मागणीसाठी मुंबईत आले असताना त्यांच्यावर पोलिस कारवाई करणे योग्य नाही. टिळक भवन हे काँग्रेसचे कार्यालय असून येथे कोणीही येऊ शकते. मात्र, पोलिसांनी कार्यालयाभोवती बॅरिकेड्स लावून नाकाबंदी केली आहे. “हे जंगलराज आहे का?” असा सवाल गायकवाड यांनी केला.

भाई जगतापांचा पोलिसांवर हल्लाबोल

आमदार भाई जगताप यांनीही टिळक भवन येथे भेट देऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी काँग्रेस कार्यालयात पोलिसांनी घुसून केलेली कारवाई निषेधार्ह असल्याचे म्हटले.

मध्यरात्री ताब्यात घेण्यासाठी आदिवासी विद्यार्थी काही गुन्हेगार नाहीत. पोलिसांनी काही विद्यार्थ्यांना येलो गेट पोलिस ठाण्यात, तर काहींना ठाण्याच्या दिशेने नेले. यामध्ये मुलींचाही समावेश असल्याचा दावा भाई जगताप यांनी केला. काही विद्यार्थ्यांना तीन तास पोलिस ठाण्याबाहेर उभे ठेवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

NSUIच्या अध्यक्षांना ताब्यात घेऊन शहरभर फिरविण्यात आल्याचा आरोप करत “हे काय चालले आहे?” असा सवाल त्यांनी केला. पोलिसांची दंडेलशाही आणि गुंडगिरी काँग्रेस खपवून घेणार नाही, असा इशाराही भाई जगताप यांनी दिला.

दरम्यान, काँग्रेस कार्यालय टिळक भवनमध्ये मध्यरात्री पोलिसांनी केलेल्या कारवाईचा काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी निषेध केला आहे. सरकारच्या या कारवाईला काँग्रेस घाबरणार नाही आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी पक्ष खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा राहील, अशी भूमिका काँग्रेस नेत्यांनी घेतली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

1 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

1 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

1 तास ago

दुष्काळग्रस्त भागाच्या पाहणीसाठी विजय वडेट्टीवार दोन दिवसांच्या दौऱ्यावर

नागपूर, वर्धा, हिंगोली आणि जालना जिल्ह्यांतील शेतकऱ्यांशी साधणार संवाद मुंबई: महाराष्ट्र लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा…

2 तास ago

दुष्काळावर सरकारचा ‘तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा’ कारभार; विजय वडेट्टीवारांचा घणाघात

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती, निवडणूक आयोगाच्या कारभारातील कथित अनियमितता आणि MPSC अध्यक्षांच्या कार्यकाळातील गैरप्रकारांच्या चौकशीवरून…

2 तास ago

शिरुर; मालकाला संपवण्यासाठी रचलेल्या कटात कामगाराचा बळी; LCB आणि रांजणगाव पोलिसांकडुन सुपारीच्या कटाचा उलगडा

कारेगाव (तेजस फडके) येथील साईनगर परिसरातील पाण्याच्या प्लॅन्टमध्ये काम करणाऱ्या हामजा उस्मान शेख यांच्या डोक्यात…

8 तास ago