नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती, निवडणूक आयोगाच्या कारभारातील कथित अनियमितता आणि MPSC अध्यक्षांच्या कार्यकाळातील गैरप्रकारांच्या चौकशीवरून काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. कोरोनापेक्षाही दुष्काळाची परिस्थिती गंभीर असल्याचे सरकारमधील मंत्री सांगत असतील, तर परिस्थिती इतकी गंभीर होईपर्यंत सरकारने काय केले, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.
‘तहान लागल्यावर विहीर खोदायची’ हीच सरकारची कार्यपद्धती
अल निनोमुळे पावसावर परिणाम होण्याची आणि पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता सरकारला आधीपासूनच माहीत होती. असे असताना पाणी, चारा आणि शेतीच्या प्रश्नांवर वेळीच उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत? असा प्रश्न उपस्थित करत, “तहान लागली की विहीर खोदायची, ही सरकारची कार्यपद्धती आहे,” अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
राज्यातील परिस्थिती गंभीर झाल्याने सरकारने १६ ऑक्टोबरपासून किमान १० टक्के पाणी कपातीचे आदेश दिले आहेत. मात्र, ही वेळ येण्यापूर्वीच आवश्यक नियोजन करणे गरजेचे होते. दुष्काळामुळे जनतेचे होत असलेले हाल हे सरकारच्या नियोजनशून्यतेमुळे असल्याचा आरोपही त्यांनी केला.
३८ हजार कोटींच्या जलसंधारण खर्चाचे काय झाले?
जलसंधारणावर तब्बल ३८ हजार कोटी रुपये खर्च केल्याचे सांगितले जाते. एवढा मोठा खर्च करूनही महाराष्ट्राला दुष्काळाच्या संकटाला सामोरे का जावे लागत आहे? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. या खर्चाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या घोषणा करण्यात आल्या होत्या. मग आज राज्यातील जनतेला पाणीटंचाईचा सामना का करावा लागत आहे, याचे उत्तर सरकारने द्यावे, असेही ते म्हणाले.
Form 6 च्या बदलांवरून निवडणूक आयोगावर निशाणा
इंडिया आघाडीच्या खासदारांनी निवडणूक आयोगाविरोधात काढलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरही टीका केली. SIR आणि Form 6 संदर्भातील निर्णयांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने Form 6 मधील बदलांना मान्यता दिलेली नसल्याचे स्पष्ट झाले असल्याचा दावा करत, हे बदल कोणाच्या अधिकाराने करण्यात आले, असा सवाल त्यांनी केला.
“ज्ञानेश कुमार यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. त्यामुळे त्यांना निवडणूक आयुक्तपदावर एक मिनिटही राहण्याचा अधिकार नाही. मोदी सरकारला जनाची नाही तर मनाची असेल तर त्यांनी ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेतला पाहिजे,” अशी घणाघाती टीका वडेट्टीवार यांनी केली.
मतदार यादी आणि मतदान प्रक्रिया ही लोकशाहीची अत्यंत महत्त्वाची व्यवस्था आहे. त्यामुळे त्यामध्ये पारदर्शकता आणि निष्पक्षता असणे आवश्यक आहे. SIR प्रक्रियेबाबत विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाने स्पष्ट उत्तरे द्यावीत, अशी मागणी त्यांनी केली.
‘हा लढा व्यक्तीविरोधात नाही, मतदारांच्या अधिकारांसाठी’
ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, भाजपने त्यांचा वापर करून बिहार आणि पश्चिम बंगालच्या निवडणुका जिंकल्या, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. इंडिया आघाडीचा लढा हा एखाद्या व्यक्तीविरोधात नसून मतदारांचे अधिकार आणि निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता टिकवण्यासाठी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.दिल्लीमध्ये विरोधी पक्षांच्या खासदारांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे मोर्चा काढून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले.
MPSC अध्यक्षांवर कारवाईची मागणी
MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या कार्यकाळातील कथित गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने राज्यपालांकडे शिफारस केली आहे. मात्र, चौकशी सुरू होऊन त्यात पुन्हा बराच वेळ जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळकाढूपणा न करता संबंधित अध्यक्षांवर तातडीने कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
विद्यार्थी अनेक दिवसांपासून रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. त्यांच्या आंदोलनाकडे राजकीय आकसाने न पाहता त्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा. MPSC चौकशीला वेळ लागणार असेल, तर विद्यार्थ्यांचा सरकारवरील विश्वास कसा टिकणार, याचाही सरकारने विचार केला पाहिजे, असे वडेट्टीवार म्हणाले.
मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…
मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…
मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…
मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…
नागपूर, वर्धा, हिंगोली आणि जालना जिल्ह्यांतील शेतकऱ्यांशी साधणार संवाद मुंबई: महाराष्ट्र लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा…
कारेगाव (तेजस फडके) येथील साईनगर परिसरातील पाण्याच्या प्लॅन्टमध्ये काम करणाऱ्या हामजा उस्मान शेख यांच्या डोक्यात…