‘विकासाला विरोध नाही, विनाशाला विरोध’; कर्जत-भीमाशंकरमधील वृक्षतोडीची उद्या सपकाळ करणार पाहणी
मुंबई: कर्जत-भीमाशंकर परिसरात प्रस्तावित टोरंट विद्युत प्रकल्पावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. हजारो झाडांची कत्तल करून कोणता विकास साधणार? उद्योगपतींचे हित जपण्यासाठी पर्यावरणाचा बळी दिला जात आहे. झाडे तोडून दुसरीकडे लावण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा हास्यास्पद असून, महाराष्ट्राला ‘झाडखाऊ’ मुख्यमंत्री नको, अशा घणाघाती शब्दांत सपकाळ यांनी सरकारवर टीका केली.
टिळक भवन येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सपकाळ म्हणाले की, विकासाला काँग्रेसचा विरोध नाही; मात्र विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा विनाश आम्हाला मान्य नाही. सह्याद्रीच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडे लावण्याची भाषा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी राज्यात ३३ कोटी झाडे लावण्याचा संकल्प केला होता. त्या वृक्षलागवडीचे नेमके काय झाले, झाडे कुठे लावली गेली, याचा हिशेब जनतेसमोर मांडावा, असे आव्हानही त्यांनी दिले.
वसुंधरेचे संरक्षण आणि जंगलांचे संवर्धन करणे आवश्यक असताना खासगी कंपनीच्या फायद्यासाठी वृक्षतोड सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. झाडे तोडल्यानंतर दुसरीकडे वृक्षलागवड करण्याची घोषणा म्हणजे हातचलाखी असल्याची टीका करत, विकास हा शाश्वत असला पाहिजे, असे सपकाळ यांनी स्पष्ट केले.
‘चौथी-पाचवी मुंबई उभारण्याच्या हालचाली’
टोरंट प्रकल्पासाठी राज्यात इतर अनेक पर्यायी जागा उपलब्ध असताना पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील परिसरातच प्रकल्प का उभारला जात आहे, असा सवाल सपकाळ यांनी उपस्थित केला. मुंबईच्या विस्ताराच्या नावाखाली चौथी-पाचवी मुंबई उभारण्याची चाचपणी सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
फडणवीस सरकारच्या काळात राज्यातील ४० हजार उद्योग बंद पडल्याचा दावा करताना सपकाळ म्हणाले की, फॉक्सकॉन आणि बल्क ड्रग पार्कसारखे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेले, तेव्हा काँग्रेसने विकासाला विरोध केला नव्हता. वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांच्या अधिकारांवर गदा येत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, शक्तिपीठ महामार्गाची मागणी नसतानाही हा प्रकल्प जनतेवर लादला जात असल्याचे ते म्हणाले.
उद्या कर्जत-भीमाशंकर परिसराचा दौरा
टोरंट विद्युत प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता कर्जत येथे पोहोचणार आहेत. त्यानंतर ते भीमाशंकर अभयारण्य परिसरातील वृक्षतोडीची पाहणी करून स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पाविरोधातील आंदोलनाला काँग्रेसकडून राजकीय पाठबळ मिळण्याची शक्यता आहे.
विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला तीन जागांची अपेक्षा
विधान परिषदेच्या पाच जागांच्या निकालाबाबत बोलताना सपकाळ यांनी महाविकास आघाडीला तीन जागांवर विजय मिळण्याची शक्यता व्यक्त केली. नागपूरच्या जागेवरही काँग्रेसचा उमेदवार विजयी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैशांचा वापर झाल्याचा आरोपही त्यांनी केला. मतदारांना भेटवस्तू देणे, जेवणावळी आयोजित करणे, लिफाफे आणि पैठणी देण्याचे प्रकार घडल्याचे सपकाळ म्हणाले. निकाल काहीही लागला तरी तो स्वीकारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पूर्णेकर हत्या प्रकरणात सरकार कोणाला वाचवत आहे?
ठाण्यातील पूर्णेकर हत्या प्रकरणावरूनही सपकाळ यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले. ठाणे शहराची ओळख गुंडांचे शहर म्हणून होऊ लागली असून, या प्रकरणातील आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
या प्रकरणाची विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) माध्यमातून उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. पूर्णेकर कुटुंबाने दिलेले पुरावे आणि माहिती यांच्या आधारे तपास झाला पाहिजे, असेही ते म्हणाले.
ज्यांच्यावर आरोप होत आहेत, तेच आरोपींना वाचवत असल्याचा दावा करत सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. फडणवीस नेमके कोणाला वाचवत आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यांना काय मिळवायचे आहे, असा सवाल उपस्थित करत त्यांनी या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीची मागणी केली.
शिरूर (अरुणकुमार मोटे) : आंबळे (ता. शिरूर) येथील अखंड हरिनाम सप्ताहातील खोले महाराज यांचा कीर्तनाचा…
कारेगाव (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात गुन्हेगारीचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नसतानाच कारेगाव येथे एका…
मुंबई: महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेल्या गणेशोत्सवाला युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत स्थान मिळवून…
पोटादुखी, अपचन, डिहायड्रेशनची समस्या यांसारखे आजार उद्भवतात. उन्हामुळे त्वचा टॅन होणे, सतत तहान किंवा लघवीला…
जसं वय वाढतं तसं गुडघेदुखी ही एक सामान्य पण त्रासदायक समस्या बनते. आजकाल ही समस्या…
मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा माझ्याकडे; निष्पक्ष चौकशीचे पोलिस आयुक्तांना निर्देश ठाणे: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येची घटना…