महाराष्ट्र

पाचव्या प्रयत्नात यश; पाटणेच्या धनश्री अहिरेला यूपीएससीत ४८९ वा क्रमांक, आयपीएस पदावर झेप

मालेगाव: तालुक्यातील पाटणे येथील धनश्री जिभाऊ अहिरे हिने संघ लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत देशातून ४८९ वा क्रमांक मिळवत आयपीएस पदावर झेप घेतली आहे. पाचव्या प्रयत्नात मिळवलेल्या या यशामुळे तिच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. गावकऱ्यांनी तिचा सत्कार करून अभिनंदन केले.

धनश्रीचे प्राथमिक शिक्षण पाटणे येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण पाटणे येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात झाले. अकरावी व बारावीचे शिक्षण सटाणा येथील महाविद्यालयात घेत असताना तिने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला. त्यानंतर पदवी शिक्षणासाठी पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. पुण्यात सुरुवातीची दोन वर्षे तिने स्पर्धा परीक्षेची तयारी केली.

धनश्रीने २०२१ मध्ये प्रथमच यूपीएससीची परीक्षा दिली. त्यानंतरच्या तीन प्रयत्नांमध्ये ती मुलाखतीपर्यंत पोहोचली होती. अखेर २०२५ मध्ये दिलेल्या पाचव्या प्रयत्नात तिने देशात ४८९ वा क्रमांक मिळवत आयपीएस पद मिळवले. यापूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेतही ती यशस्वी झाली होती. चार महिन्यांपूर्वी लागलेल्या निकालात तिची सहाय्यक वनसंरक्षक या पदासाठी निवड झाली होती.

धनश्रीच्या कुटुंबात कोणीही उच्चशिक्षित नाही. तिचे आई-वडील शेती करतात. बारावीपासूनच तिने आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते. आयपीएस अधिकारी भरत आंधळे आणि विश्वास नागरे-पाटील यांच्या कार्याची पुस्तके व व्हिडिओ पाहून तिला प्रेरणा मिळाली. बारावीनंतर तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.

धनश्री ही घरातील मोठी मुलगी असून तिची लहान बहीण अकरावीमध्ये तर भाऊ नववीमध्ये शिक्षण घेत आहे. मालेगावपासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या पाटणे गावातील बहुतांश नागरिक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. शेतकरी कुटुंबातील मुलगी आयपीएस अधिकारी झाल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे.

दरम्यान, धनश्रीचे वडील जिभाऊ जगन्नाथ अहिरे हे शेतकरी असून त्यांनी शेती करून मुलीचे शिक्षण पूर्ण केले. गावातील पहिली महिला आयपीएस अधिकारी ठरल्याने ग्रामस्थांनी तिचा सत्कार केला.

धनश्री म्हणाली, “मी पाच वेळा यूपीएससीची परीक्षा दिली. दररोज आठ ते नऊ तास अभ्यास केला. निवडलेल्या क्षेत्रात जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणत्याही क्षेत्रात यश मिळू शकते. आई-वडील आणि कुटुंबीयांचे मोठे पाठबळ लाभले. कोणताही क्लास न लावता यूपीएससी उत्तीर्ण झाल्याचा मला अभिमान आहे.”

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago