फलटण: वाठार निंबाळकर येथील शिव लॉजिस्टिक कंपनीचे मालक व ट्रान्स्पोर्ट व्यावसायिक रवींद्र लालासाहेब खोपडे (वय ४२) यांनी सावकाराचा तगादा, वाहन खरेदी व्यवहारातील फसवणूक आणि फायनान्स व बँक अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तसेच बेकायदेशीर सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत खोपडे यांच्या पत्नी कोमल खोपडे (वय ३३) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयितांमध्ये सूरज हिंदुराव कदम (रा. रविवार पेठ, फलटण), दिगंबर भिवरकर (रा. चिंचवड, पुणे), प्रीतेश चोपडा (पूर्ण पत्ता उपलब्ध नाही), कृष्णा ऊर्फ रमेशचंद्र केशवदेव गुप्ता (रा. भोपाळ, मध्य प्रदेश), चोलामंडलम फायनान्सचे व्यवस्थापक कोरडे (रा. फलटण) आणि आयडीएफसी बँकेचे व्यवस्थापक स्वप्नील बालगुडे (रा. फलटण) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खोपडे यांचा ट्रान्स्पोर्ट व्यवसाय होता. त्यांनी सूरज कदम याच्याकडून ५ लाख रुपये १० टक्के व्याजाने घेतले होते. त्यापैकी ३.५० लाख रुपये परत करूनही उर्वरित रकमेवरून त्यांना सतत त्रास दिला जात होता. तसेच पैशांच्या बदल्यात एका कंटेनरचा बेकायदेशीर ताबा घेतल्याचा आरोप आहे.
याशिवाय, दिगंबर भिवरकर आणि प्रीतेश चोपडा यांनी दोन वाहने प्रत्येकी २१.५० लाखांना खरेदी करण्याचे ठरवून त्यावरील बँक कर्ज (प्रत्येकी १७.८५ लाख) न भरता तसेच उर्वरित रक्कमही न देता फसवणूक केल्याचे नमूद करण्यात आले आहे. कृष्णा गुप्ता याने १४ लाखांच्या वाहनासाठी केवळ ३.५० लाख रुपये देऊन उर्वरित रक्कम थकवली होती.
तसेच चोलामंडलम फायनान्सचे व्यवस्थापक कोरडे यांनी मुद्दाम वाहने जप्त करून मानसिक त्रास दिला, तर आयडीएफसी बँकेचे व्यवस्थापक स्वप्नील बालगुडे यांनी शेजारी व नातेवाईकांना फोन करून शिवीगाळ करत बदनामी केल्याचा आरोप आहे.या सर्व प्रकाराला कंटाळून रवींद्र खोपडे यांनी १७ एप्रिल रोजी राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. त्यांना फलटण येथील लाइफ लाईन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान १८ एप्रिल रोजी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, मृत्यूपूर्वी खोपडे यांनी लिहून ठेवलेल्या दोन चिठ्ठ्या पोलिसांना मिळाल्या असून, त्यामध्ये संबंधित संशयितांनी दिलेल्या त्रासाचा सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे.या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे), ३(५) तसेच महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ च्या कलम ३९ अन्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक पवार करीत आहेत.
मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…
ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…
मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…
शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…
मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…
मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…