मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढून मुंबईत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस कार्यालय टिळक भवन येथे विश्रांती घेत असलेल्या विद्यार्थ्यांची पोलिसांनी धरपकड केल्याचा आरोप करत, संबंधित पोलिसांवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य तथा ज्येष्ठ नेते नसीम खान यांनी केली.
टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत नसीम खान यांनी सांगितले की, आदिवासी विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून शांततेच्या आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहेत. नाशिक ते मुंबई लाँग मार्च केल्यानंतर त्यांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, पोलिसांनी अचानक ही परवानगी रद्द केली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी काँग्रेस नेत्यांशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्या राहण्याची व्यवस्था टिळक भवन येथे करण्यात आली.
मात्र, विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपण्यासाठी मुंबई पोलिस टिळक भवनमध्ये दाखल झाले आणि विद्यार्थ्यांसह NSUI चे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे, प्रद्युम्न यादव, कार्यालयीन कर्मचारी आणि इतरांना ताब्यात घेतल्याचा आरोप नसीम खान यांनी केला. ताब्यात घेतलेल्या व्यक्तींना ८ ते १० पोलीस ठाण्यांमध्ये फिरवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
‘१५-१६ वर्षांच्या विद्यार्थिनींनाही ताब्यात घेतले’
पोलिसांनी १५ ते १६ वर्षांच्या विद्यार्थिनींनाही ताब्यात घेऊन त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप नसीम खान यांनी केला. पोलिसांच्या कारवाईमुळे काही मुली बेशुद्ध पडल्याचेही त्यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकाराचा काँग्रेस पक्ष तीव्र शब्दांत निषेध करत असून, विद्यार्थ्यांचा नाहक छळ करणाऱ्या पोलिसांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
लोकशाही मार्गाने आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार संविधानाने नागरिकांना दिला आहे, असे सांगत नसीम खान यांनी आंदोलनासाठी आझाद मैदानाची जागा निश्चित करण्यात आल्याचा दावा केला. असे असताना पोलिसांकडून आंदोलनाला परवानगी नाकारली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
राहुल गांधींकडेही मांडल्या होत्या विद्यार्थ्यांनी व्यथा
आदिवासी विद्यार्थ्यांनी महिनाभरापूर्वी नाशिक येथे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेऊन आपल्या समस्या आणि व्यथा मांडल्या होत्या. काँग्रेस पक्ष या विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असून, त्यांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्या संघर्षाला साथ दिली जाईल, असे नसीम खान यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, टिळक भवन येथे आदिवासी विद्यार्थ्यांची विचारपूस केल्यानंतर नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने दादर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. टिळक भवनमध्ये पोलिसांनी बेकायदेशीरपणे प्रवेश करून आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड केल्याचा आरोप करत संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील, सिंगल सेलचे प्रमुख ॲड. रविप्रकाश जाधव, प्रदेश सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर, मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन, महाराष्ट्र NSUI अध्यक्ष सागर साळुंखे, मुंबई NSUI अध्यक्ष प्रद्युम्न यादव, ब्रिज दत्त, अनंत मोहोड, श्रीरंग बर्गे, प्रशिक्षण विभागाचे प्रमुख आशुतोष शिर्के यांच्यासह प्रदेश पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…
मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…
मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…
नागपूर, वर्धा, हिंगोली आणि जालना जिल्ह्यांतील शेतकऱ्यांशी साधणार संवाद मुंबई: महाराष्ट्र लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती, निवडणूक आयोगाच्या कारभारातील कथित अनियमितता आणि MPSC अध्यक्षांच्या कार्यकाळातील गैरप्रकारांच्या चौकशीवरून…
कारेगाव (तेजस फडके) येथील साईनगर परिसरातील पाण्याच्या प्लॅन्टमध्ये काम करणाऱ्या हामजा उस्मान शेख यांच्या डोक्यात…