शिरुर (तेजस फडके): शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील उमेदवारी वाटपावरुन भारतीय जनता पक्षातील अंतर्गत नाराजी आता उघडपणे समोर येऊ लागली आहे. भाजप युवा मोर्चाचे माजी प्रदेश सचिव दिलीप हिंगे यांनी पक्षाच्या स्थानिक नेतृत्वावर अप्रत्यक्षपणे गंभीर प्रश्न उपस्थित करत “बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे खरे निष्ठावान कोण…?” असा थेट सवाल केला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे तालुक्यातील भाजपच्या राजकारणात खळबळ उडाली असून, उमेदवारी वाटपावरुन पक्षातील असंतोष चव्हाट्यावर आला आहे.
पुढे बोलताना हिंगे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष म्हणुन देशभर ओळखला जातो. मात्र, शिरुर तालुक्यातील बाजार समिती निवडणुकीत याच्या अगदी उलट चित्र पाहायला मिळाले. पक्षासाठी अनेक वर्षे राबणाऱ्या, संघर्ष करणाऱ्या आणि कठीण काळातही पक्षाची पताका खांद्यावर घेऊन उभ्या राहिलेल्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आले, तर ऐनवेळी राजकीय सोयीसाठी आणलेल्या ‘आयात’ उमेदवारांना संधी देण्यात आली, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
महायुतीकडून बाजार समितीची निवडणूक एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय झाल्यानंतर अनेक भाजप कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी तयारी केली होती. मात्र, स्थानिक पातळीवरील काही नेत्यांनी पक्ष संघटना, कार्यकर्त्यांचे योगदान आणि निष्ठा यांना बाजूला ठेवत परस्पर निर्णय घेतल्यामुळे अनेक पात्र इच्छुकांना उमेदवारीपासून वंचित राहावे लागल्याचा आरोप हिंगे यांनी केला.
माजी आमदार स्व बाबुराव पाचर्णे यांच्या नेतृत्वाखाली गेली दोन दशके हिंगे यांनी पक्षासाठी सातत्याने काम केले. पक्ष अडचणीत असताना संघटना वाढविणे, युवकांना भाजपशी जोडणे, गावागावात पक्षाची ताकद निर्माण करणे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणे ही जबाबदारी त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडली. त्यामुळे उमेदवारी देताना अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांचा प्रथम विचार होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात निष्ठेपेक्षा स्थानिक राजकीय समीकरणांनाच अधिक महत्त्व देण्यात आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. “राहुल गवारी यांचा अपवाद वगळता बहुतांश उमेदवार आयात करण्यात आले आहेत.
मग या उमेदवारांची निवड नेमक्या कोणत्या निकषावर झाली…? पक्षनिष्ठा, संघटनात्मक काम की केवळ राजकीय सोय…?” असा परखड सवालही त्यांनी उपस्थित केला. या निर्णयामुळे तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असून, पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चर्चा सुरु असल्याचे त्यांनी नमूद केले.
विशेष म्हणजे, उमेदवारी न मिळाल्याबद्दल हिंगे यांनी पक्षश्रेष्ठींवर कोणताही ठपका ठेवला नाही. हा निर्णय स्थानिक पातळीवरील राजकारणाचा परिणाम असल्याचे सांगत त्यांनी, “मी आजही भारतीय जनता पक्षाचाच निष्ठावान कार्यकर्ता आहे आणि पुढेही पक्षाच्या विचारांसाठी तितक्याच ताकदीने काम करत राहणार,” असा ठाम निर्धार व्यक्त केला.
राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण…
दिलीप हिंगे यांच्या या परखड भुमिकेमुळे शिरुर तालुक्यातील भाजपमधील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा उघड झाली आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारी वाटपावरुन सुरु झालेला हा वाद बाजार समितीच्या निवडणुकांवरही परिणाम करु शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. निष्ठावंतांना डावलून ‘आयात’ उमेदवारांना संधी दिल्याच्या आरोपांमुळे स्थानिक नेतृत्वावर दबाव वाढला असून, यावर संबंधित पदाधिकाऱ्यांची भूमिका काय असेल, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
मुंबई : कुर्ल्यातील चिराग नगर परिसरातील गौशिया चाळीजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण भूस्खलनाच्या दुर्घटनेत ६…
मुंबई : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांचे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि कागदरहित करण्यासाठी सुरू…
मुंबई : उच्च शिक्षणातील विविध योजना, शिक्षणातील पारदर्शकता, करिअर मार्गदर्शन, परीक्षा सुरक्षा आणि सामाजिक जबाबदारी…
मुंबई: भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.…
शिरूर : शिरूर तालुक्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी शासनस्तरावर हालचालींना…
मुंबई : विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध विकासकामे…