sandeep-gill-ranjangaon

Video: शिरूर तालुक्यात गोळीबार, डोक्यात गोळी लागल्याने एकाचा मृत्यू; गुन्हा दाखल…

क्राईम मुख्य बातम्या

शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी पाण्याच्या प्लांटमध्ये झालेल्या गोळीबारात हमजा उस्मान शेख (वय ३९) यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हमजा शेख यांच्या डोक्यात गोळी लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, या प्रकरणी रांजणगाव MIDC पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हमजा शेख हे कारेगाव येथील साईनगर परिसरात कुटुंबासह भाड्याच्या घरात राहत होते. ते विकास नवले यांच्या इमारतीलगत असलेल्या ‘समु इंटरप्रायजेस अ‍ॅक्वा रिच’ या पाण्याच्या प्लांटमध्ये काम करत होते. तसेच परिसरातील दुसऱ्या इमारतीमध्ये साफसफाई व पाणी सोडण्याचे कामही ते करत होते.

आज सकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास हमजा शेख हे नेहमीप्रमाणे पाण्याच्या प्लांटमध्ये कामासाठी गेले. त्यानंतर सुमारे ६:४५ वाजण्याच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या एका महिलेने त्यांच्या पत्नीला पाण्याच्या प्लांटमध्ये हमजा हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी हमजा शेख यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याचे दिसून आले. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांपैकी एका महिलेने काही वेळापूर्वी फटाक्यासारखा मोठा आवाज ऐकू आल्याचे सांगितले. त्यानंतर इमारत मालक विकास नवले यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावली. त्यानंतर हमजा शेख यांना त्यांच्या कुटुंबीयांनी शिरुर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, सुरुवातीला या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. मृतदेह शवविच्छेदनासाठी शिरुर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. वैद्यकीय तपासणीदरम्यान हमजा यांच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर जखम असल्याचे आढळले. डोक्यास आरपार छिद्र असल्याचे निदर्शनास आल्याने पुढील शवविच्छेदनासाठी मृतदेह पुण्यातील ससून रुग्णालयात पाठविण्यात आला.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

दरम्यान, रांजणगाव MIDC पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता पाण्याच्या प्लांटमध्ये गोळीची पुंगळी आढळून आल्याची माहिती समोर आली. त्यामुळे हमजा शेख यांच्या डोक्यात पिस्तुलातून गोळी झाडून त्यांचा खून करण्यात आल्याचा संशय बळावला. या प्रकरणी हमजा शेख यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरुन रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच शस्त्र अधिनियम अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोपी कोण आहे, गोळीबार नेमका कोणत्या कारणातून झाला आणि आरोपीने कोणत्या शस्त्राचा वापर केला, याचा तपास पोलीस करीत आहेत. घटनास्थळावरील पुरावे, सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक बाबींच्या आधारे रांजणगाव MIDC चे पोलिस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरडे हे या घटनेचा पुढील अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे कारेगाव परिसरात खळबळ उडाली असून, दिवसाढवळ्या पाण्याच्या झालेल्या या गोळीबाराचा तपास करुन आरोपीला तातडीने अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

पोलिस अधिक्षक संदीप सिंह गिल्ल याची घटनास्थळी भेट…
कारेगाव येथील गोळीबाराच्या घटनेनंतर पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक डॉ शुभम कुमार, शिरुरचे उपविभागीय अधिकारी रविंद्र भोसले, रांजणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कुमार कदम, शिक्रापुरचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरडे तसेच पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरुरमध्ये गोळीबार करुन दहशत माजविणाऱ्या कुख्यात टोळीवर मोक्का; ११ जणांचा सहभाग, २२ गंभीर गुन्ह्यांची नोंद

व्यावसायिकावर गोळीबार करणारे उज्जैन येथून जेरबंद…

शिरूर तालुक्यात गोळीबार करुन दहशत माजविणाऱ्या योगेश मचाले टोळीवर ‘मोक्का’…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत